Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ४४

श्रीरुक्मिणी स्वयंवर ४४

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
   

कृष्ण कृष्ण कृष्णच केवळ
आता भावे या मनाला 
कृष्ण रुक्मिणी व्हावे मीलन 
काळही क्षणभर थिजला

रुक्मिणी कृष्णांकीत झाली
अगणित वेळा नामाने
कृष्ण जपाचा अभिषेक ती
करते अर्पण या मनाने 

नकोच ऐश्वर्याचा डौल मज
श्रीकृष्णाचे नयन मनोहर
त्या नयनांचे व्हावे दर्शन 
आता भावे केवळ यदुवीर

भवतापाचे झाले ओझे 
हरिरूपाचे औषध घ्यावे
हरीविना या देहमनाला 
अन आता काही न भावे 

या विलक्षण भाव स्थितीत रुक्मिणी केवळ आणि केवळ हरीचेच चिंतन करते आहे. दुसरे काहीही स्वीकारण्यास मनाची तयारी नाही, देह हरीविना जगणे अशक्य झाले. अश्या स्थितीला ज्या वेळी एखादा प्राणी पोहोचतो, त्याचवेळी त्या प्राण्याच्या मनाची साद हरी पर्यंत पोहोचते आणि हरी कोणत्याही रुपात सुटकेसाठी धावून येतो, नव्हे यावेच लागते. 

गेले कित्येक दिवस फक्त श्रीकृष्णाचाच विचार तिने केलाय. 

एकही क्षण असा गेला नाही रिता
या देहाचा हरिविण चालला भाता

इतुके करूनही कष्ट देह झिजला
हरीवीण जल मी अस्पर्श मानला

ऐशा स्थितीप्रत हरीनेच आणला
मग आज हरी येऊन जाईल मला

जितुके वेचले क्षण तितुके नामकण
मन भ्रांती विभ्रांती भटकले वणवण

आता स्वरूप भेटेल मज घेऊन जाईल
जप तप सारे माझे आता व्यर्थ न जाईल

विचार करा  की, श्रीकृष्णाला पत्रिका पाठवणं तेही त्या काळात , किती व्याकुळता असेल मनाची. इतक्या व्याकुळते शिवाय परमात्मा आत्म्याच्या सादाला प्रतिसाद देत नाही. त्याचं उत्तम उदाहरण जर काही असेल तर हे रुक्मिणीने श्रीकृष्णाला लिहिलेलं अद्भुत पत्र. 

हे पत्र म्हणजे एखाद्याला आपला मुद्दा पटवून देण्यासाठी काय काय युक्त्या , दृष्टांत, मुद्दे मांडावे याचं प्रात्यक्षिक आहे. यात आर्जव आहे , विनवण्या आहेत, आपल्या मनाच्या स्थितीचा लेखाजोखा आहे, मनाला वाटणारी आणि समोर उभी असणारी भीती आहे, अव्यक्त नव्हे तर पूर्ण व्यक्त स्वरूपातील प्रेमालाप आहे कोणतेही आढेवेढे न घेता मांडलेले, भावविभोरता आहे, प्रेमाची साद आहे. 

आपला जोडा कसा शोभणारा आहे याचं सोदाहरण स्पष्टीकरण आहे, श्रीकृष्णाचं व्यक्त रूप आणि त्याचं परमात्म स्वरूपाशी असलेलं नातं, श्रीकृष्णाची महानता त्याच्या ख्यातीची सत्यता , त्याच्या बद्दल वाटणारा आदरभाव , का प्रेम जडलं , तुला न पाहतादेखील मी कशी मोहित झाले, तुला अनेक जणी मिळतील पण मीच तुझ्या योग्यतेची कशी याचं पटेल अस सुस्पष्ट विवेचन 

आणि सर्वात शेवटी तू न मिळाल्यास काय होऊ शकतं म्हणजेच मी काय करू शकते त्याची गर्भित सुचनावजा धमकीही रुक्मिणीने पत्रात मांडली आहे. अर्थात ज्याच्यात धमक आहे तोच खऱ्या अर्थाने धमकी देण्यास पात्र असतो. ज्या पत्रातील मांडणीने मोहित झालेला आणि प्रथमदर्शनी पत्रप्रेमात पडलेला श्रीकृष्ण, आता समीप आला आहे या अद्भुत विचाराने रुक्मिणी भारावून गेली आहे. याच क्षणांची प्रतीक्षा काळदेखील करतो आहे. 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll

१४/०१/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...