Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ५९

श्रीरुक्मिणी स्वयंवर ५९

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll

जरासंध आणि यादववीर गद समोरासमोर आले आणि जणू दोन महापर्वत , दोन महाशिला वा दोन महावादळे एकमेकां समक्ष आल्यावर जशी भीतीदायक स्थिती निर्माण होते तशीच स्थिती निर्माण झाली.  समोर पाहून विकट हास्य करत जरासंध क्रोधवश बोलला.

"अरे बुद्धीमंदा माझ्याशी स्वतः गोविंद लढू शकत नाही आणि तू विचार तरी कसा केलास युद्धाचा. अरे मुढा एकवेळ सूर्य अंधारात बुडेल, डिंभक (छोटी पांढरी अळी) भिंत चढून जाईल, पण तुझे माझे युद्ध अशक्य आहे.  एखाद्या मशकाच्या प्रहाराने मेरूपर्वत चूर्ण होईल, एकवेळ एखादा मूषक इंद्राशी युद्ध करू शकेल, परंतु तुझे माझे युद्ध ही कल्पना तरी कशी केलीस तू. 

अरे एखाद्या घटात समुद्र बुडेल , एका जांभईत आकाश सामावले जाईल, एखाद्या छोट्या हरळीने वारा अडेल पण माझं आणि तुझं युद्ध त्रिवार अशक्य.  एखादा क्षुद्र कीटकाच्या पोटात समुद्र मावेल, एखादवेळी मुंगी गजास गिळंकृत करेल, आकाशात अधांतरी टाकी बांधता येईल पण महामुढा तुझ्यासवे माझा संघर्ष निव्वळ अशक्य आहे. 

चित्रातला सर्प पाहून एखादा गरुड ज्याप्रमाणे शौर्य दाखवतो तद्वत तुझी गत झाली आहे. परंतु मी प्रत्यक्ष समोर येताच तुझी भीतीने गाळण उडणार आहे. सूर्याच्या जवळ पृथ्वी जाऊ शकणार नाही , नवग्रहांचे शौर्य घटांवर फक्त , परंतु त्यांचा पाषणांवर काही परिणाम होत नाही तसाच हे यादवा तुझा पराक्रम छूटपुट लोकांपुढे माझ्या समोर तुझा काय पाडाव. ससा कितीही सिंहाच्या माथ्यावर नाचला तरी तो सिंहाची बरोबरी करू शकेल का 

अरे यादवांना काय दुष्काळ पडला की काय वीरांचा म्हणून गदाला आज रणात धाडलाय माझ्याशी खेळायला. अरे गदा तुझं नाव हे गदू नावाच्या एखाद्या औषधाचे नाव आहे असे वाटते. त्यामुळे तू एखाद्या वैदूकडे जा, तोही तुला झोळीत घालून काखोटीला बांधून दिवसभर गावात फिरेल. इथे युद्धभूमीत तुझं काय काम. तू रोगीयांमध्ये श्रेष्ठ असशील पण हि युद्धभूमी आहे इथे युद्धाचा ज्वर पचवू शकणारेच टिकू जाणतील. तू तर रोगी वाटतोस त्यामुळे तू निघालास तर आताच जीव तरी वाचवशील. तुला अजूनही पळून जाण्याची धर्मवाट उपलब्ध आहे. त्यायोगे आणि मार्गे तू पळून जाणे इष्ट आहे.

यावर गद हसून बोलला अरे तुझा जराने सांधा वाढला  आहे आणि तो सांधा सांधायचा  सोडून तू येथे निबंध झाडावयास आला आहेस. अरे मी गदा हे शस्त्र मारीन ज्यायोगे तुझा अभिमानाचा रेंद बाहेर काढीन आणि तुझा जरामरणाचा कंद तोडून तुझं हृदय शुद्ध करून देईन.

हे बोल ऐकून मगधनरेश खवळला आणि गदास वदता झाला कि, उगाच गप्पा न हाणता युद्धास सिद्ध हो. असे म्हणून आठ बाण धनुष्यास जोडून गदाच्या  दिशेने जरासंधाने सोडले. त्या आठही बाणांना गदाने परास्त करत, चपळाईने आपल्या धनुष्यास शर जोडून जरासंधाच्या रोखाने सोडले. 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll

३०/०१/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...