Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ५३

श्रीरुक्मिणी स्वयंवर ५३ 

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll

 केशिक आणि बलराम यांच्यात घनघोर युद्ध सुरू झाले. दोघेही शक्तीवान युद्धशास्त्रात निपुण , महारथी , महावीर म्हणून ख्यात होते. आज युद्धात त्याचा प्रत्यय येत होता. हलधर आपले हल हे आयुध , गदा आणि मुसळ यांनी युद्ध करत होता. तर केशिक धनुष्यबाण, गदा आदी अस्त्रांनी युद्ध करत होता. 

याचदरम्यान राजा गवेषण मगधाचे सैन्य घेऊन यादवांवर तुटून पडला. महाबलवान गवेषण युद्धात निपुण आणि शत्रुसैन्याचा निःपात करण्यात प्रवीण होता. अनेक राजे महाराजे युद्धात जरासंधाच्या बाजूने तुंबळ युद्ध करत होते. मुकुटांचा, रथाच्या सांगाड्यांचा, अगणित शस्त्रांचा, मृत सैनिकांच्या देहाचा नुसता खच पडला होता. यादववीर अनेक आघाड्यांवर एकाच वेळी तीव्र प्रतिकार आणि तीव्र प्रतिहल्ला यांनी जरासंधाच्या नेतृत्वाखालील सैन्याला क्षती पोचवण्यात यशस्वी होत होते.

समस्त आकाश बाणांनी आच्छादून गेले होते, इतके की दिवसाची मध्यान्ह असूनसुद्धा सायं समय असल्याचा भास होत होता. सर्वत्र अग्नीचा धुराळा उडाला होता. वीर वीरांवर तुटून पडले होते. कोणीच मागे हटायला तयार नव्हते. अश्वांना फिरण्यास मार्गच मिळत नव्हता, इतके सर्वजण एकमेकांत मिसळले होते. प्रत्येकाचे लक्ष समोरच्या शत्रूचे सैन्य आणि सैनिक हेच होते. जो तो प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता. 

देहापासून कर , मुकुटासह शीर , हत्तीसह वीर धरणीवर पडत होते. गजांचे पाय , अश्वांचे खुर, नरमुंडकी यांचा पाऊस पडत होता. घायळांची तर गणनाच नव्हती. रथांनी रथ भेदले जात होते. गजांनी गज पाडले जात होते. त्या गजाच्या भाराने कित्येक सैनिक क्षतीग्रस्त होत होते. मोठे तुंबळ आणि महा घनघोर युद्धाची सुरवात झाली होती. गवेषण मोठ्या आवेशात कापाकापी करत पुढे निघाला होता.  त्याने श्र्वफल्क , सात्त्यकी, कंक यांना बाणांच्या माऱ्याने जायबंदी केले.  गवेषण एक क्रूर योद्धा होता. शत्रुसैन्याला निष्ठुरपणे चिरडत पुढे पुढे निघाला होता. 

त्याचा हा आवेग पाहून चक्रदेव त्याच्या दिशेने झेपावला. त्या दोघांत तुंबळ युद्ध सुरू झाले. बाणांचे स्वागत बाणांनी झाले. एके क्षणी क्रूर गवेषणाने वीस बाण एकत्र लावून चक्रदेवाला मूर्च्छित करून रथातून विरथ केले.  ते पाहताच अतिदांत हा यादववीर त्वेषाने पुढे झेपावला आणि चक्रदेवाची जागा त्याने घेतली. त्याला पाहून क्रोधाने आठ बाण एकत्र लावून गवेषणाने अतिदांताचा सारथी खाली पडला आणि रथासह अतिदांत आकाशाकडे झेपावला. रणभूमिस गिरक्या घेऊन तो रथासह पडला. गवेषणाने पुढं एक एक करत बाण सोडून एका बाणाने मुकुट, एका बाणाने एक एक करत दोन्ही भुजा देहापासून विलग केल्या आणि अतिदांत धरणीवर कोसळला. 

रणांगणी मध्यात उभे राहून विकट हास्य करत गवेषणाने यादववीरांना युद्धास आव्हानीत केले. त्याला तसे आव्हान देताना पाहून यादववीर सारण त्वरेने बाण घेऊन त्या दिशेने निघाला. 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll

२४/०१/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...