Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ३९

श्रीरुक्मिणी स्वयंवर ३९

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
   
अंबामंदिराकडे निघालेला हा सर्व लवाजमा, अभूतपूर्व होता. तुतारी, भेरी, ललकारी या बरोबरच अनेक वाद्ये, वीणा ,वेणू यांचा नादमधुर स्वरमिलाफ, माहुतांचे हत्तींना हाकतानाचे आवाज आणि मधेमधे येणारे हत्तीचे चित्कार, अश्वाचे किंखाळणे, सैनिकांना दिले जाणारे आदेश त्यानुसार होणाऱ्या सैन्याच्या हालचाली यासर्वांमध्ये पुढील घटनांचा वेध घेत, आपल्या चित्तहरत्याचे स्मरण चालू असल्यामुळे शांतपणे जात असलेली रुक्मिणी असं अलौकिक दृश्य होतं. 

तिच्या सख्या विरहाच्या कल्पनेने स्तब्ध आणि त्यातच आपल्याही भविष्यातील विवाहाची चिंता करत शांतपणे चालल्या होत्या. येणाऱ्या विरहाची व्यथा रुक्मिणीलासुद्धा होतीच, परंतु तिला आपलं कृष्णासोबत विवाहाचं मनो वांच्छित स्वप्न कसं पार पडेल हे जास्त चिंता देत होतं. म्हणून या विचित्र मानसिक स्थितीची अनुभूती आणि त्याची तिच्या चेहऱ्यावरील अभिव्यक्ती मंद वाहणारा पवन कृष्णाप्रत पोचवत होता. 

अर्थात आपल्या कार्यकुशलतेवर दृढ विश्वास असलेला जगताधीश, रुक्मिणीच्या मनातील या भावतरंगांना जाणूनही, अंतरी भावविभोर होत असूनही, बाह्यांतरी तितकाच निश्चल, निलजलावरील तरंग विरहित शांततेहून शांत राहून फक्त पुढील घटनांचा मागोवा घेत होता. अर्थात या सर्वात कोणत्याही अघटित प्रसंगाला सामोरं जायला ज्येष्ठ भ्राता श्रीहलधर अर्थात श्रीबलराम समर्थ आहेत हेही जाणून होता. 

परंतु या सर्व महोत्सवी वातावरणात स्वतःला अलिप्त ठेवून रुक्मि , जरासंध, शिशुपाल, शल्य आदी शत्रुसैन्याला चकवून , रुक्मिणीला नेण्यासाठी तो  पूर्ण एकाग्रचित्त दिसत होता. नरदेहातील नारायणाची ती जणू परीक्षाच होती. कारण जगतजननी प्रत्यक्षात जरी त्याचीच असली तरी या देही आल्यानंतरच्या मर्यादा , भोग व बंधनं त्यालाही लागू होतीच आणि म्हणूनच त्याअंतर्गत राहून कार्यसिद्धी करण्याची परीक्षा काळही, विधात्याची , घेत होता. म्हणूनच दोघेही,  कृष्ण रुक्मिणी आतून आपापल्या योजनांचा माग घेत होते तरीही जगासाठी शांत दिसत होते. 

इकडे शिशुपाल शल्य जरासंध आपापल्या धूर्त योजनेनुसार सर्व होत आहे याची सतत खातरजमा करून घेत होते. इतके सर्वजण आपल्या सोबत व स्वतःचे सैन्य असूनही कृष्णकीर्ती ज्ञात असलेला रुक्मि, कृष्णाच्या असण्याने राग, द्वेष , धास्ती या अनेकानेक व्याधींनी अंतरी चडफड व भयग्रस्त होता. आपण इतकं करूनही जर पिताश्रींच्या इच्छेनुसार कृष्ण काही अनर्थ करता झाल्यास काय ही त्याची चिंता होती. या सर्वात रुक्मिणीचे मानस काय हेदेखील  त्याच्या चिंतेचाच विषय होता. 

राजा भीमक हा पुत्राच्या राग व द्वेष या पायी हतबल होता. त्याचीही आंतरिक इच्छा अजूनही कृष्णालाच रुक्मिणी द्यावी अशीच होती. त्यामुळे अंतरी एक छटा परंतु बाह्यांतरी भिन्न व्यक्तता असा विचित्र मानसिक खेळ अंबामातेच्या मंदिराकडे चाललेल्या प्रवासात, काळ आणि ब्रम्हादीक देव वरून पहात आणि अघटित न घडो याची कामना करत होते. 

यात एक गंम्मत अशी की प्रत्येकाची अघटित न होण्याची व्याख्या ही भिन्न भिन्न होती. रुक्मि शिशुपाल आदींची कृष्णाने काही बाही करू नये ही व्याख्या तर ब्रम्हादीक देव व स्वये कृष्ण रुक्मिणी यांची, आपल्या योजनेची अयशस्वीता न होवो ही व्याख्या होती. 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll

०८/०१/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...