सुभद्राहरण १५
ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll
हनुमंताच्या बोलांनी संतुष्ट भगवंत अंतर्धान पावले. इकडे हनुमंत देखील अर्जुनाच्या रथाच्या ध्वजास्तंभावर आरूढ होऊन स्थानापन्न झाला. अर्जुनाने ततपश्चात अनेक तीर्थांचे दर्शन घेतले.
जरा आपण आता द्वारकेत पाहूया काय स्थिती आहे. इकडे द्वारकेत श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून श्रीहलधर अर्थात श्रीबलराम यांनी आपली बहीण अर्थात सुभद्रा हीचा विवाह अर्जुनाशी करण्याचे योजले होते. परंतु जवळजवळ एक तप होत आलंय अर्जुनाबाबत काहीच वार्ता येत नसल्यामुळे श्रीबलरामदादा यांच्या मनात चलबिचल होत आहे. त्यांच्या मनात हा विचार जोर धरू लागला आहे की अर्जुनास येण्यास जर विलंब होत असेल तर सुभद्रेचा विवाह दुर्योधनासोबत लावून द्यावयास हरकत नाही.
श्रीकृष्ण या चिंतेत की, या सोयरिकीमुळे सुभद्रेचं भवितव्य असुरक्षित होईलच परंतु यात अर्जुनाचासुद्धा उपमर्द होईल व त्याची कायमस्वरूपी गैरमर्जी होऊ शकेल. कारण अर्जुन हा वसुदेवांच्या बहिणीचा अर्थात कृष्णाच्या आत्याचा मुलगा आणि कृष्णाचा जिवलग सखा म्हणूनही कृष्णाच्या मनातील भीती सार्थच होती.
म्हणून श्रीकृष्ण मनात तीव्र इच्छा धरून आहे की, अर्जुन आपल्या प्रतिज्ञा बद्ध तीर्थयात्रेत द्वारकेस जर पातला तर सुभद्रा विवाहाचा योग सुंदर साधता येईल. कारण जर अर्जुन योग्य समयी म्हणजेच काही काळातच आला नाही तर दादांना अडवणं कठीण होऊन बसेल.
जगतात ज्याच्या इच्छामात्र पवन वाहे, त्याच्या दृढ इच्छा शक्तीचा इच्छित परिणाम दिसून आला आणि अनेक तीर्थांचे दर्शन घेत, पुण्य पदरी जोडत अर्जुन द्वारकेस पातला. श्रीकृष्णाच्या गुप्तचरांनी वार्ता श्रीकृष्णकानी आणली की, द्वारकेबाहेर एक महायोगी, तपस्वी, वल्कलधारी, जटाधारी आले आहेत. श्रीकृष्ण त्वरित गुप्तचर सूचनेप्रमाणे द्वारका नगरी बाहेर त्या साधू महंत यांच्या दर्शनार्थ येऊन पोचला.
साधू द्वारकेबाहेरील एका मंदिरात विश्राम करत होते. समाधिस्थ साधूनी आपले नेत्र उघडले. अर्थातच श्रीकृष्णाने पाहताच आपला प्राणसखा अर्जुन याला ओळखलं होतं. पण सोबत सेवकवर्ग असल्याकारणाने वरवर तसं न दाखवता साधूंना नमस्कार करून दोन्ही हात जोडून श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला
" हे महायोगी आपण कोणी सिद्धपुरुष दिसता. हे महात्मन, मी द्वाराकधीश, आपणास नम्रपणे विनंती करतो की, आपण चातुर्मास आमच्या द्वारकेत व्यतीत करून मगच पुढील मार्गी प्रस्थान करावं."
साधुवेशातील अर्जुनाने अर्थातच याला संमती दिली आणि श्रीकृष्ण सवेगे द्वारकेत प्रसादाकडे निघाला.
क्रमशः
भाग १५ समाप्त
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll शुभम भवतू ll
ll श्रीकृष्णार्पणामस्तु ll जय श्रीकृष्ण ll
Comments
Post a Comment