सुभद्राहरण २६
ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll
सुभद्रेला आश्वस्त करत अर्जुन वदला.
"हे प्रिये, या समयापर्यंत केशवाने दादा आणि इतर क्रुद्ध यादव वीरांना आपल्या मधुर वाणीने अबोल करून आपल्या विवाहाची योजना त्यांच्याकडून मान्य करवून घेतली असेल. कारण तसे त्याने मला वचन दिले होते. अर्थातच गोविंदाचे वचन हे अंतिम शब्द आहे, हे तू जाणतेसच."
"याचा अर्थ इतकाच कि, बंधू आणि तुम्ही मिळून हि पूर्ण योजना तडीस जाईल इतपत पूर्ण पूर्वतयारी केली होती तर. "
"अर्थात कोणतीही महत्वाची योजना पूर्णत्वास नेण्याआधी त्याची पूर्वतयारी करणे हे अत्यंत आवश्यक आहे. "
यांचे हे मधुर संवाद सुरु असताना इकडे द्वारकेत कृष्ण , बलरामदादा, अक्रूर, गद यांसह काही निवडक यादव दळभार पूर्ण तयारीनिशी अर्जुन आणि सुभद्रा यांना द्वारकेत सन्मानपूर्वक घेऊन येण्यासाठी निघाले आहेत. अर्थात त्यांच्या पाठोपाठ वसुदेव ,देवकी, देवी रेवती यांसह समस्त स्त्रिया वेशीवर स्वागताला निघणारच आहेत.
रथ , अश्व आणि अश्वदल अर्जुनाला आमंत्रित करण्यासाठी निघाले आहेत. अर्थातच निघताना माता देवकी पिता वासुदेव आणि महाराज उग्रसेन यांना बलराम आणि कृष्ण चरणवंदन करतात. त्यासमयी देखील माता देवकी म्हणते
"बलराम तुझा राग शांत झाला ना. कारण अर्जुन हा यादव कुळाचा जामात होणार आहे. याकारणे तुझे त्याच्याशी बोलणे व वागणे हे पूर्ण आदराचे आणि आपल्या व अर्जुनाच्या कुळाला साजेसेच असले पाहिजे."
बलराम आदरपूर्वक वदतो.
"माते मी ज्याक्षणी आपला निर्णय ऐकून मान्य केला, त्याच क्षणी माझा क्रोध शांत झाला. त्यामुळे आपण चिंता करू नये. मी, अर्जुन आणि सुभद्रेला उचित आदर देऊन सन्मानाने घेऊन येईन."
बलरामाच्या या वचनांनी माता समाधान पावली. सर्व दळ प्रस्थान करते झाले. एखादी घटका गेली आणि दारूक उभा होता त्या ठिकाणावरून त्वरित उतरून अति वेगाने अर्जुनाच्या दिशेने आला. अर्जुनाने त्याला पाहिले आणि तो देखील सावध झाला. त्याने त्वरित आपले गांडीव हातात घेतले. बाण कमाठ्याला लावून सज्ज स्थितीत उभा राहिला आणि दारुकाला म्हणाला.
"कोण कोण येताना दिसत आहेत."
"हे कुंतीपुत्र वीर अर्जुन , बरीचशी यादव सेना मागे घेऊन महावीर बलरामदादा आणि स्वतः श्रीकृष्ण येत आहेत. "
"कृष्ण स्वतः आहे, हे नक्की ना."
" हो दादांच्या रथात स्वतः दादा आणि श्रीकृष्ण आहेत. "
अर्जुन सुभद्रेकडे पाहून म्हणाला
"स्वतः यदुवीर येत आहे म्हणजे नक्कीच कोणतीही भीती संभवत नाही."
असं म्हणून अर्जुन तीर धनुष्यावरून काढून ठेवतो आणि धनुष्य पुन्हा खांद्याला लावतो. यादववीरांसह आलेले दोन्ही बंधू अर्जुनाच्या रथाच्या समीप येताना दिसले. अर्जुनाने रथ मार्गाच्या आड ठेवलेला असतो. परंतु त्यांना येताना पाहून अर्जुन दारुकाला आज्ञा देतो कि, रथ येणाऱ्या दोन्ही बंधूना भेटण्यासाठी सामोरा ने.
क्रमशः
भाग २६ समाप्त
२०/०४/२०२०
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll शुभम भवतू ll
ll श्रीकृष्णार्पणामस्तु ll जय श्रीकृष्ण ll
Comments
Post a Comment