देवकी - ७
त्याच्या पाठमोऱ्या आकृतीवरून आणि अविर्भावारून त्याच्या चेहऱ्याचा अंदाज येत होता. कंसदादांचा नव्हे महाराज कंसाचा संताप आणि संताप दिसत होता.त्यामुळे, जरी आता त्याने खड्ग म्यान केलं, तरी ते नवीन रुपात पुन्हा प्रकट होणार हा अंदाज होता. तो गेला आणि सारथ्याने रथ उलट मधुरेच्या महालाच्या दिशेने वळवला. मी प्रचंड हादरून गेले होते.
इतक्या वेळानंतर त्याक्षणी प्रथम वसुदेवांना पाहिलं. त्यांचा शांत धीरगंभीर चेहरा पाहून माझं थरथरणारं काळीज , धडधडणारं हृदय, सुन्न झालेलं मन, थिजलेला अंतरात्मा, स्तब्ध मेंदू आणि धमन्यांमधील गोठलेलं रुधिर एक क्षण मृत्यूच्या दारात आपण जाऊन आलोय हे सांगत होते. माझ्या चर्येवरून त्यांना आलेला अंदाज मला त्यांच्या डोळ्यातील भाव सांगून गेला. माझ्या काना मागील नसा तप्त झाल्या होत्या. घशाला कोरड पडली होती. छातीतील धडधड अजून तशीच होती.
यादवराजांनी माझ्या खाद्यावर हात ठेवला, नन्तर तो मस्तकावर ठेवला. मला भानावर यायला आणि विश्वास द्यायला एवढं पुरेसं होतं. त्यांनीच आपल्या उपरण्याने माझा घाम पुसण्यासाठी, माझ्या चेहऱ्याकडे हात नेला, त्यावेळी मला जाणवलं की मी घामाने पूर्ण भिजून गेले होते, त्या हेमंत ऋतुतल्या शीतलतेतही. त्यांच्या हातून उपरणं घेऊन मी घाम पुसला. उपरणं अर्थातच माझ्याकडेच ठेवलं. कदाचित नात्यातील देवाणघेवाण तिथेच सुरू झाली. त्यांनी मला विश्वास दिला आणि मी त्यांना माझी जबाबदारी.
काही वेळातच आम्ही राजमहालाच्या प्रांगणात पोचलो. जिथे मी खेळले, बागडले, वाढले त्याठिकाणी आज मी रथात बसून होते, असहाय्य, हतबल स्थितीत. सर्वजण बहुतेक महाराज कंस यांच्या पुढील आदेशाच्या प्रतीक्षेत होते. झाल्याप्रकाराने सर्वचजण स्तंभित अवस्थेत होते. घडला प्रकार सर्वानाच अचंबित करणारा होता. कुणीही अजून त्या धक्क्यातून सावरलं नव्हतं, हे, माझ्याकडे बघणाऱ्या नजरा मला सांगत होत्या.
प्रत्येकजण आता माझं भवितव्य काय, याच भावात माझ्याकडे आणि एकमेकांकडे पहात होते. त्या नजरेचे ते घाव मनावर असह्य वेदना आणि वार करत होते. ज्या नजरा कधी आपल्यापुढे उचलल्या जात नसत वा ज्या नजरेत एक आदर, एक सन्मान होता , त्याच नजरा आता, हिचं भविष्य सुळावर की खड्गावर याच विचारात होते. त्यांचं ते आमच्याकडे असहाय्य दाम्पत्य म्हणून बघणं मृत्यूहून अति वेदनादायी आणि क्लेशकारक होतं.
बघणाऱ्याचे भाव किती सहज एका क्षणात बदलू शकतात आणि ते इतक्या सहजी जाणवतात. परंतु आपली असहाय्यता इतकी विवश करते की आपण ती नजर ते नजरेचे घाव बघूही शकत नाही आणि त्याक्षणी नेत्र बंद देखील करू शकत नाही. या विवशतेचे क्रूर करपाश हळू हळू आमच्या भोवती गुंडाळले जाऊन त्यात आम्ही पुरते जखडले जातोय हे जाणवत होतं. ती विवशतेची भयाण सावली आपल्या अक्राळविक्राळ जबड्यात ओढताना, मात्र आपण पहात राहायचं.
त्या विवशतेचे भेसूर हास्य, चहुबाजूंनी मनावर, मस्तिष्कावर आणि आत्म्यावर खोल वळ उठवतानादेखील तग धरून राहायचं, त्यांचं ते भयाण हसू कधीतरी आवरेल किंवा यमपाश आपले अंकुश आपल्याभोवती गुंडाळून आपल्याला या देहातूनच सोडवून हे विवशतेचे भेसूर हास्य कायमचं बंद करेल, या प्रतीक्षेत. त्या यातना आत असह्य होत होत्या, ती प्रतीक्षा आता जीवघेणी झाली होती. वसुदेव शांतपणे, राजप्रसादातून महाराज कंस यांची आज्ञा येण्याची, प्रतीक्षा करत होते. त्यांच्या चर्येवर कसलीच भीती, उदासीनता, हतबलता, निराशेच्या अंध:काराची छाया यांचा मागमूसही नव्हता. त्यांना पाहून मी स्वतःच्या मनःस्थितीवर अजूनच खजील होत होते.
इतक्यात आतून कोणीतरी महाराजांची आज्ञावजा संदेश घेऊन येतोय असं वाटलं आणि सुरक्षेसाठी नेमलेल्या सेनेचा मुख्य त्या संदेशवाहकाच्या दिशेने निघाला.
भाग ७ समाप्त .......
क्रमशः
वसुदेवसुतं देवम कंसचाणूर मर्दनम ll देवकी परामानंदम कृष्णम वंदे जगतगुरुम ll
संकल्पना मांडणी व लेखन : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment