सुभद्राहरण १७
ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll
पिताश्री आणि दादा यांची अनुमती मिळताच कृष्णाने त्वरित दोन रथ मागवून पिताश्री आणि दादा यांना संदेश पाठवून आपण रथासमीप प्रतीक्षेत उभा राहिला. थोड्याच वेळात पिताश्री वसुदेव आणि दादा बलराम आले आणि दोन्ही रथ निघाले. एका रथात स्वतः पिताश्री आणि एका रथात दादा आणि श्रीकृष्ण.
रथ अर्थातच द्वारकेच्या वेशीवर असलेल्या आश्रमात जाऊन थांबला. विस्तीर्ण जागेत वनवेली, झाडं, मोठमोठे वृक्ष घनदाट झाडी यांच्या मध्ये अनेक पर्णकुटी उभारून पांथस्थ योगी, सिद्धपुरुष, ऋषी, मुनिवर यांच्या विश्रामासाठी उत्तम व्यवस्था , उत्तम सेवकवर्ग, शांत परिसर, पशुपक्षी यांचा मुक्त वास असलेला हा आश्रम एक आदर्श ठिकाण होतं.
येथे आल्यावर सिद्धयोगी महर्षी यांना ध्यानधारणेसाठी अत्युत्तम ठिकाण असलेल्या त्या आश्रमात तिघांनी प्रवेश केला. त्या काळच्या प्रथेनुसार व परंपरेनुसार आपल्याच राज्यात असलेल्या या आश्रमात प्रवेश करून त्यांनी त्या सिद्धयोगीच्या पर्णकुटीत येण्याची अनुमती मिळवण्यासाठी सेवकांकरवी निरोप पाठवला. अर्थात तपस्विनी त्यांना भेटण्याची अनुमती दिली.
तिघांनी कुटीच्या बाहेर आपल्या मोजड्या काढून अत्यंत आदरपूर्वक कुटीत प्रवेश केला. वसुदेवांनी सर्वात पुढे होत योगीना प्रणाम केला.
" हे महातपस्वी , योगीराज आपण द्वारकेत येऊन आमच्या द्वारकेची शोभा वाढवलीत आणि कृष्णाच्या विनंतीचा मान ठेवलात. त्याबद्दल समस्त द्वारकावासीयांतर्फे आपले आभार. आता चतुर्मासाचे चार महिने आपण आमच्या अतिथ्याचा स्वीकार करावा."
तपस्वी वेशातील अर्जुनाने अर्थातच याचा स्वीकार करून संतोष व्यक्त केला. अर्जुनाला या तापसी वेशात कृष्णाशिवाय अन्य कोणीही ओळखलं नसल्याकारणे कृष्ण व अर्जुन दोघेही मनात आनंदी होते. आश्रमातील व्यवस्था पाहून व स्वामींच्या आदरातिथ्यात काही कमतरता राहणार नाही याची पूर्ण पाहणी करून सेवकांना उपयुक्त सूचना देऊन आणि कृष्णाला विशेष दायित्व देऊन तिघे पुनः राजप्रासादी परतले.
ठरल्याप्रमाणे कृष्ण स्वतः येऊन आश्रमाची आणि स्वामींची व्यवस्था नियमित पाहत होता. याचदरम्यान चातुर्मासातील इतर उत्सवांप्रमाणे द्वारकाविसीयांचा आवडता व त्यांचा उत्साह व उल्हास वर्धित करणारा रैवतक पर्वतावरील महाशक्तीच्या यात्रेचा उत्सव सुरू होणार होता. त्याकारणे समस्त द्वारकावासी त्याच्या तयारीला लागले. यात्रेला जाण्याची धामधूम सुरू झाली.
क्रमशः
भाग १७ समाप्त
११/०४/२०२०
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll शुभम भवतू ll
ll श्रीकृष्णार्पणामस्तु ll जय श्रीकृष्ण ll
Comments
Post a Comment