सुभद्राहरण २८
ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll
यथावकाश सर्वजण द्वारकेच्या वेशीवर येऊन पोचतात. त्याआधीच तिथे श्रीउग्रसेन, श्रीवसुदेव व माता देवकी यांसह समस्त राजपरिवार आणि यादवजन उपस्थित आहेत, अर्जुनाच्या स्वागताला. अर्जुनाला मोठ्या मिरवणुकीने घेऊन आलेले बलरामदादा व कृष्ण, अर्जुन व सुभद्रा यांना रथातून उतरवून घेऊन येतात.
सुभद्रा अर्थातच अजूनही यजमानगृही असल्याने तिला माता देवकी आपल्या समीप उभी करते. स्वतः माता देवकी अर्जुनाचं औक्षण करण्यासाठी पुढे होते. अर्थातच यथाविधी त्याला ओवाळून त्याची दृष्ट काढून त्याला विधिवत द्वारकेत आमंत्रित केलं जातं. अर्जुन सर्व ज्येष्ठांना चरणस्पर्श करून वंदन करतो आणि आशीर्वाद प्राप्त करतो.पिताश्री वसुदेव अर्जुनाला आत घेऊन येतात.
एका सजलेल्या मोठ्या रथात स्वतः श्रीवसुदेव, कृष्ण आणि बलराम हे अर्जुनासह बसतात. समस्त स्रीवर्ग रथारुढ झाल्यानन्तर सर्वजण राजप्रासदाच्या दिशेने निघतात. मार्गामध्ये सर्वत्र दुतर्फा जनसमुदाय आपल्या सुभद्रेला आणि जावयाला पाहायला जमा झालेला आहे. नानाविध पुष्पे, पाकळ्या, गुलाल यांची मुक्तहस्ते उधळण, अर्थात सुभद्रा व अर्जुन यांच्यावर, जनसमुदायाकडून सुरू आहे.
वाद्यांचा गजर साथीला असलेले यादवजन, वृष्णी, भोज आणि अंधक वंशाचे लोक नृत्यात मग्न आहेत. ढोल ताशे यांचा निनाद आसमंतात पोहोचला आहे. मार्गात रांगोळ्यांची सजावट, चौकाचौकात आकर्षक पुष्परचना व पुष्पांनी सजलेल्या कमानी अशी वर्षोत्सवाची धामधूम आहे. चौका चौकात नरनारी फेर धरून अर्थात गोकुळचे पारंपरिक नृत्य रासलीला करण्यात दंग आहेत.
प्रत्येक चौकात अर्थातच , कृष्ण बलराम यांना त्यांच्या अर्धांगी सह उतरवून त्या नृत्यात सहभागी करून घेतलं जातं आहे. अर्थातच कृष्ण ज्याच्या रक्तातच नृत्य आणि रासलीला आहे, जो उत्तम नृत्य कलाकार आहे, तो आपल्या भगिनीच्या जमवून आणलेल्या विवाहाच्या आनंदाप्रीत्यर्थ या नृत्याचा मनमुराद आनंद प्रत्येक चौकात लुटून मगच पुढे मार्गस्थ होत आहे.
सुभद्रेसह अर्जुनालादेखील उतरवून आग्रह करून नृत्य करण्यास भाग पाडलं जात आहे. अर्थात तेही आनंदाने यात सामील होत आहेत. प्रत्येक चौकात थोडावेळ नृत्य करून झाल्यावर सर्व लवाजमा पुढे निघत आहे. रथातील प्रौढ व वृद्ध देखील खाली उतरून यात सामील होऊन याचा आनंद घेऊनच पुढे जात आहेत. मागे गेलेल्या प्रत्येक चौकात अजूनही हजारो नरनारी नृत्यातच मग्न आहेत, जणूकी, स्वतः कृष्ण त्यांच्यासोबत नाचत आहे.
अर्थात या आनंदाचं महत्वाचं कारण सुभद्रेचा अर्जुनाशी योजलेला विवाह आणि त्यानिमित्ताने द्वारकेत पुढील चार दिवस सुरू राहणार असलेली उत्सवाची धामधूम. या आनंद पर्वाने सर्व नरनारी अत्यंत धुंदीत आहेत,जल्लोषात आहेत. प्रत्येकाच्या घरातील कार्य आहे. अर्थात गोकुळ व मथुरेपासून ही परंपरा आहे कृष्णाच्या घरचं कार्य ते समस्त राज्याचं कार्य.
कारण कृष्ण हा जनसामान्यांच्या हृदयातील हिरा आहे आणि त्या कृष्णाच्या हृदयातील त्याची लाडकी भगिनी सुभद्रा पूर्ण द्वारकेचीच पुत्री आहे आणि अर्थातच अर्जुन समस्त द्वारकेचा जावई.
क्रमशः
भाग २८ समाप्त
२२/०४/२०२०
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll शुभम भवतू ll
ll श्रीकृष्णार्पणामस्तु ll जय श्रीकृष्ण ll
Comments
Post a Comment