Skip to main content

भोग आणि ईश्वर ६२५

भोग आणि ईश्वर ६२५
   
वास्तविक प्रत्येक मनाला एकाग्र करून, अंतिम उद्देशा साठी तयार केल्यानंतर, त्या शांत झालेल्या मनाला, साधनेचा परिसस्पर्श देऊन, त्या एकमात्र ईश्वरी नामाला स्मरण्याची पायरी गाठली की, सर्व उद्देशांची पूर्तता झालीच असं म्हणता येईल. पण... आणि हा पणच, हे उद्देश आणि आपला निर्धार, यामधील मुख्य अडथळा होतो. कारण मनाची एकाग्रता साधण्यासाठी, अनेक खटपटी लटपटी करूनही, मन कोणत्या गोष्टीने, भरकटेल आणि व्यर्थ कर्मात, धर्मात अडकून, प्रवाह सोडेल, हे ईश्वराच्या हातात सुद्धा नाही. 

ही गोष्ट वा गुह्य प्रत्यक्ष ईश्वर जाणूनही, बदलू शकत नाही. कारण त्यासाठी लागणारी, एकाग्रतेची ऊर्जा, शक्ती, तेज आणि ओज हे मानवी मनाला प्रदान केल्यानंतर, ईश्वराने स्वतःला, त्या सर्वांपासून अलग केलेलं आहे. हे सर्वात मोठं गुह्य आहे. ईश्वराचा त्यातील सहभाग, मानवी मनाने त्याला अंतरात्म्या पासून साद घातली तरच, घडून येऊ शकतो. 

त्यामुळे मनाचा इश्वराशी संवाद साधण्यासाठी, मनाला एकाग्र आणि शांत करून, तयार करणं, ही यातील प्राथमिक आवश्यकता आहे आणि हाच सर्व साधनांचा प्राण आहे. जर हे एकदा साधलं आणि मनाला या शांततेची व एकाग्रतेची आवड लागली की, पुढचं कार्य घडून येण्यास सुरुवात होऊ शकते. आता यामध्ये येणाऱ्या अडचणी काय असू शकतात, हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. किंबहुना ते अतिमहत्वाचं आहे.

मुळात मन हे अती चंचल, चपळ, चतुर, चलाख आणि स्वप्रेरीत असल्या कारणाने, त्याला ताब्यात ठेवण्याच्या प्रयत्नात, ते कधी निसटून जाईल हे, खुद्द ते मनही जाणत नाही. मुख्य जे सहा शत्रू मानले जातात, ते म्हणजे लोभ, मोह, क्रोध, मद, मत्सर आणि दंभ हे अनेक रुपात, प्रतिरूपात, वेष्टनात, कार्यात, व्यक्ति रुपात, संचीतातील फल स्वरूपात, चोरपावलांनी, उघडपणे या व अश्या अनेक प्रकारांनी कधी समोर येऊन उभे राहील, हे काळही सांगू शकत नाही.

त्या प्रत्येक वेळी ते भोग, उपभोग, अज्ञान, भविष्याची अनिश्चितता, कर्माचं फलरुप प्रकटीकरण अश्या अनेक मार्गांनी, मनाच्या पटलावर कधी आघात, तर कधी सुखाची झालर घेऊन येतात. या अश्या धक्क्याना सावरून, त्यातून मनाला अविचल ठेवून, एकाग्रतेचा आलेख वर्धिष्णू ठेवत पुढे जाणं हीच खरी साधना आहे. पण हे कसं साधणार, यावर उद्याच्या भागात, चिंतन करूया. तोपर्यंत प्रभूचं नाम, जे आपण धारण केलेलं आहे, ते वाचेने व मनाने उच्चारत राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता. 

त्याचप्रमाणे भाग १,२ व ३ हे कींडल अमेझॉन वर ईबुक म्हणून उपलब्ध करण्यात आलं आहे. ज्यांना ते शक्य आहे, त्यांना तशी लिंक पाठवण्यात येईल. ते ईबुक घेऊन वाचू शकतात. 

©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१०/१०/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...