Skip to main content

भोग आणि ईश्वर ६००

भोग आणि ईश्वर  ६०० (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
 
आज अखंडित ६०० दिवस लिहिण्याचा एक वेगळाच आनंद आहे. खरा पाहिलं तर, दडपण हे पहिले १०० ते १५० दिवस होतं. त्यानंतर, मात्र एका वेगळ्याच भूमिके तून आणि वेगळ्या पातळीवर ही लेखमाला गेली. मुळात या लेखमालेचा विषय हा गहन, अती चिंतनशील आणि तरीही लोकांच्या जिव्हाळ्याचा होता. मुळात आपल्याच मनातील प्रश्नाचा मागोवा घेता आला तर ती सर्वात आनदाची ठेव असते. 

यात जिज्ञासा पूर्ण होणं, याहीपेक्षा मनातील शंकांचं निरसन होणं, हे अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या आयुष्यात अश्या अनेक गोष्टी घडून जातात, घडतात किंवा पुढेही घडतील, ज्याबद्दल अनेक शंका निर्माण होतात. त्या सर्व शंका फिटतील असं नाही. पण या मालिकेत, बऱ्याच प्रश्नांची उकल करून देण्याचा प्रयत्न महाराजांनी केला, हे नक्की.

कर्माच्या गतीचा सिद्धांत हा अनेकवेळा, पूर्णपणे लागू होईल अशी परिस्थिती असेलच असं नाही. बरेच जण या छोट्या छोट्या शंकांना मनात धरून, त्यांचं निरसन न झाल्या कारणाने,नास्तिक किंवा देवावर दैवावर अविश्वास दाखवणारे असतात. यामधे मी बांधलेले काही आडाखे, काही अंदाज आणि काही मनसुबे, जसेच्या तसे किंवा थोड्याफार फरकाने, पण आपल्या मनात असलेला परिणाम दाखवणारे असतीलच असं नाही. 

मी यावर लगेच स्वतःला श्रेष्ठ समजून, या विश्वाला निर्माण करणाऱ्या शक्तीला, नाकारणं, म्हणजे करोडो वर्ष अस्तित्वात असलेल्या आणि आपल्या मृत्यु पश्चात सुद्धा पुढे करोडो वर्ष अस्तित्वात असणाऱ्या जगात, माझ्या काही प्रश्नांना उत्तरं मिळत नाहीत किंवा मिळाली नाहीत, यासाठी मी त्या जगताच्या आधाराचं अस्तित्व नाकारण, म्हणजे मुढतेची सुद्धा परिसीमा आहे. 

मुढता हा शब्द मुद्दाम वापरायचं कारण म्हणजे, या करोडो वर्षांच्या जगत पसाऱ्यात उणीपुरी सत्तर ऐंशी वर्ष जगणारा मी ठरवणार की, देव आहे किंवा नाही. ही सर्वात विनोदी गोष्ट आहे. बरं यासाठी माझी मतं किंवा विचार ठरवायला माझ्या गाठीशी अनुभव किती जास्तीत जास्त शंभर वर्षे. गणिती भाषेत आपण ratio किंवा proportion काढतो, त्यामधे आपल्या आयुष्याची १०० वर्ष,  भागीले जगताची करोडो वर्ष, असं समीकरण मांडून, गणित काढलं तर, संगणक किंवा गणक यंत्र सुद्धा याचं उत्तर काही million micro digit मधे देईल. 

आता एखादा वैज्ञानिक, गणिती, अर्थशास्त्री, प्राध्यापक किंवा शिक्षणतज्ञ सुद्धा या micro million digit वरून जगताच्या आधाराचं आणि जगतकर्त्याचं अस्तित्व ठरवणार नाही, जर असं गणित त्यांना घातलं तर. मग सहज जीभ दिली आहे आणि विचारावर कोणाचंही नियंत्रण नाही, अगदी विधात्याने सुद्धा तसं बंधन घातलं नाही, म्हणून, आपल्या नगण्य अस्तित्वाया जाणीवेबद्दल तमाही न बाळगता, ज्याने निसर्ग, ब्रम्हांड, हवा पाणी यांसह हे सर्व वैज्ञानिक जगत निर्माण केलं आहे, त्याच्या अस्तित्वावर शंका घेत, माझा विश्वास नाही, असं गर्विष्ठपणाने सांगून, वर आपल्या पढत मूर्खपणाची अप्रत्यक्षपणे कबुलीच द्यायची, यासारखी दुसरी विनोदी गोष्ट या जगात नसावी. 

आता हा विषय पुढे नेण्यासाठी, उद्याच्या लेखात पुन्हा भेटूया. खरंतर ६००व्यां भागाला संपवायची माझी इच्छा होती. पण आज हा वेगळाच विषय महाराजांनी समोर आणून ठेवला.  त्यामुळे उद्या पुन्हा ही लेखमाला त्यांच्या इच्छेनुसार पुढे सुरू राहील. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  त्याचप्रमाणे भाग १,२ व ३ हे कींडल अमेझॉन वर ईबुक म्हणून उपलब्ध करण्यात आलं आहे. ज्यांना ते शक्य आहे, त्यांना तशी लिंक पाठवण्यात येईल. ते ईबुक घेऊन वाचू शकतात. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२३/०७/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...