Skip to main content

भोग आणि ईश्वर ४८५

भोग आणि ईश्वर  ४८५  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
  
यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात्।
विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे।। 

आयुष्यात खरं स्मरण तेच जे आनंद देतं. आता आनंद हा भाव पुन्हा, मनाचा गुण आहे आणि तो व्यक्तिसापेक्ष आहे. म्हणजेच एखाद्या वस्तूत, गोष्टीत वा आठवणीत एखाद्याला आनंद मिळेल, त्यात दुसऱ्याला मिळेलच असं नाही.  कारण प्रत्येकाचा भाव, स्वभाव, मानसिकता, आनंदाची व्याख्या, दृष्टी आणि दृष्टिकोन वेगवेगळा असतो आणि असणारच. म्हणजेच जो आनंद आपण प्राप्त करतो तो वस्तूंवर वा त्या क्षणांवर किंवा इतर कशावरही अवलंबून नसतो, तर तो आपल्या आतील मनावर आणि देहाच्या अवस्थेवर व स्थितीवर अवलंबून असतो. 

एखाद्या गर्भश्रीमंत व्यक्तीला साधं घड्याळ वा साधी पाच, दहा लाखांपर्यंतची गाडी आनंद नक्कीच देणार नाही. पण तीच गाडी एखाद्या मध्यम आर्थिक स्थितीतील व्यक्तीला आनंद देईल.म्हणजेच वस्तू।तीच पण आनंदाची भावना वेगवेगळी आहे. कारण त्याच्या सांपत्तिक स्थिती मुळे, त्याच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. म्हणजेच तो आनंद दीर्घकाळ वा चिरकाल टिकणारा अर्थात शाश्वत नसतो, हे निःसंशय. तरीही मनुष्य या अशाश्वत मानसिक आनंदाच्या मागे धावतो का. जर या जगतात, अशी कोणतीही वस्तू नाही जी शाश्वत आनंद देईल, तरीही आज युगानुयुगे, अश्या वस्तूंच्या निर्मितीमागे, मानव का धावतोय. यात मायेचा सहभाग खूप मोठा आहे. 

माया ही पूर्ण वाईट किंवा पूर्ण चांगली नाही किंवा नसते.  मुळात माया, मोह, लोभ, मत्सर, द्वेष हे भाव निर्माण करते. त्यावर आधारित कर्म माणूस करत जातो आणि मग त्या त्या मानसिक तेतून तो तो आनंद किंवा दुःख माणूस उपभोगत किंवा भोगत जातो. माया, प्रपंच, भाव यातील आयुष्य म्हणजे सर्वसामान्य मानवी आयुष्य. त्यामुळे ते कधी सुखी, कधी दुःखी, कधी आनंदी, कधी उदास कसही असू शकतं. 

उदाहरणार्थ जे अपत्य, लहान असताना आपल्याला अतीव सुख आनंद उत्साह देतं, तेच अपत्य मोठं झाल्या वर परिस्थितीवश दुःख, त्राससुद्धा देतं. यामध्ये दोन्ही व्यक्ती त्याच आहेत. देह तेच आहेत पण देहाचे व्यवहार बदलले. त्यामुळे मानसिकता बदलली आणि भाव बदलले. म्हणून आनंदाचं परिवर्तन दुःखात झालं. मग या सर्वात असा कोणता आनंद शाश्वत आणि चिरकाल टिकणारा आहे, याचा विचार मनात कित्येकदा आल्या शिवाय रहात नाही. 

मन जे देह बुद्धी यांच्यासह देहाचे व्यवहार व व्यापार यांच्या मागे लागून, प्रपंच करतं, त्यावेळी ते सुख आणि दुःख दोन्हीला पात्र ठरतं, मान्य असो वा नसो. मग जे समोर येतं, ते मनाप्रमाणे असेल तर, व्यक्ती आनंदी होते, सुखी होते.पण जर ते मनाप्रमाणे नसेल, तर मनुष्य दुःखी होऊन, अनेक चुकीचे विचार करायला सुरुवात करते. अगदी देव, नशीब, आपल्या आजूबाजूला असलेल्या व्यक्ती, अगदी वास्तूंनाही दोष देऊन, आपल्या कर्माचा त्यातील सहभाग, एकप्रकारे अमान्य करते. 

कारण मुळातच नशीब, प्रारब्ध, संचित या संकल्पना आपल्या कर्मातील अतृप्त फलांचं द्योतक आहे. म्हणून मग दुःख, आनंद यासह सर्व भावांना व त्यातून निर्माण होणाऱ्या नवनवीन कर्माना स्वतः जबाबदार आहोत, हेच विसरतो. म्हणजेच या सर्व चिंतना तून येणारं सार हे आहे की, आपला प्रापंचिक, सांसारिक व कर्माचा आनंद, दुःख हे वस्तूसापेक्ष नसून व्यक्तिसापेक्ष आहे. दुसरं हा आनंद किंवा दुःख हे आपणच मायेने निर्माण केलेल्या कर्माचं फलरूप परिवर्तन आहे. 

हे परिवर्तन अपेक्षेप्रमाणे असेल तर आनंद व सुख मिळतं आणि अपेक्षेप्रमाणे नसेल तर, माणूस दुःखी उदास होतो. सुख प्राप्ती पश्चात माणूस आनंदी होतो आणि आपलं कर्म फलदायी ठरलं असं मानतो. पण दुःखप्राप्तीनंतर त्याच्या कारणांचा शोध घेऊन, ते कारण बाहेर असल्याचं, स्वतःचं समाधान करून घेतो.  या विषयाची व्याप्ती बघता, हेच चिंतन उद्या सुरू ठेवावं. पण तोपर्यंत नामाचा नित्य आनंद घेत राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
३०/०३/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...