Skip to main content

भोग आणि ईश्वर ४८१

भोग आणि ईश्वर  ४८१   (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

इतका सहजसाध्य व सहजसोप्पा मार्ग स्वतः ईश्वराने स्वमुखे सांगूनही, जनसामान्यांना याकडे येण्याची बुद्धी होत नाही. त्याची कारणं प्रारब्ध, संचित, कर्मफल वासना माया इत्यादी अनेक आहेत.  पण मनात एक महत्वाचा गुणधर्म नसल्याचा हा परिणाम असावा. याचं कारण म्हणजे,  कर्मभोग भोगत असताना  वा उपभोग घेत असतानासुद्धा, त्यातून बाहेर पडण्याची इच्छा, बुद्धी होणं ही सद्गुरुकृपा व ईश्वरी स्नेह यांची प्रचिती आहे हे नक्कीच. 

पण अशी बुद्धी इच्छा झाल्यानंतरसुद्धा, मनुष्य त्या जन्मात त्या मार्गाने जाईल, याची शक्यता कितपत, हे त्याच्या मनातील एक गुण वा ईश्वरी देणगी ठरवते. इथेच खरंतर माणसाची आत्म परिक्षा असते. तो गुण म्हणजे निग्रह किंवा restraint. एखादी चुकीची गोष्ट, इच्छा, वासना तेंव्हाच कार्य करते, जेंव्हा माणसाची इच्छाशक्ती कमकुवत असते. इच्छाशक्ती ही मनाच्या निग्रह या गुणाला किंवा केंद्राला धरून असते. 

ज्याप्रमाणे एखादी वस्तू आपण बोटांनी, हातात धरल्या वर, ती वस्तू न पडण्यासाठी शारीरिक शक्तीसह, मना तील हा निग्रह कामाला येतो. निग्रह म्हणजे चागल्या वा वाईट कार्यातील, आपण जिद्द म्हणूया किंवा दुराग्रह. हा त्या व्यक्तीच्या इच्छेला कर्माप्रत नेऊन, त्याला त्या विचारांशी,  इच्छेशी व कार्याशी बांधून ठेवतो. निग्रही मनुष्याला, कोणतंही कठीण वाटणारं काम करवून घेण्याची शक्ती, इच्छा आणि प्रेरणा, या निग्रहातून प्राप्त होतो आणि सातत्य टिकवण्याची आत्मशक्तीसुद्धा प्रदान करते. 

कार्याची सफलता, कर्माची सिद्धता हे या निग्रहावर अवलंबून असतं.  हा गुण प्रत्येक मनुष्यात सारख्या प्रमाणात प्राप्त असतोच. पण मायेचा, मोहाचा, वासनेचा वा अन्य अनेक पडद्यांमुळे हा निग्रह सर्वसामान्यपणे दबून, अकार्यक्षम होतो. साध्या साध्या कृतीने वा छोट्या छोट्या गोष्टी करून, हा निग्रह, आपण तपासून, वाढवून घेऊ शकतो. जसं आज मी एखादी चांगली गोष्ट करणार वा अयोग्य गोष्ट टाळणारच. हा आपला विचार आणि कृती हे पन्नास टक्के जरी असेल तरी, उरलेले पन्नास टक्के आपणास ईश्वरी कृपेतून प्राप्त होतात, हे अनुभवाने सांगतो. 

माझ्या या भोग आणि ईश्वर मालिकेतील विचार हे सद्गुरु कृपेनेच प्राप्त आहेत, हे नक्कीच. यात दुमत असण्याचं कारण नाही. पण रोजचा लेख रोज लिहून , ही सेवा अखंड सुरू रहावी याचा मनोनिग्रह ही मला सद्गुरूंनी दिलेली अनोखी देणगी आहे. आत्मस्तुतीचा दोष पत्करूनही हे नक्कीच सांगू शकतो की, कोणत्याही दिवशी, कोणत्याही परिस्थितीत व कितीही विघ्न येऊनही लेख न चुकता लिहिण्याच्या माझ्या निग्रहाला, सद्गुरूंनी शक्ती प्रदान केली. मी लोकल ट्रेन मध्ये किंवा स्टेशनवर उभ्या उभ्यासुद्धा या मालिकेतील लेख लिहिले आहेत. 

अगदी काही कारणास्तव रात्रीचे एक, दोन कितीही वाजले तरीही, त्या दिवशीचा लेख लिहून पोस्ट करण्याचा माझा कटाक्ष व निग्रह असल्याकारणाने माझे सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज ४८१ दिवस माझ्यासोबत आहेत. म्हणून हक्काने सांगतो की, ईश्वराने स्मरण मार्गाची सिद्धता आत्मस्तुतीचा दोष पत्करून सांगितला आहे. तो सहज जमण्या सारखा आहे. त्यावर निग्रहाने मार्गक्रमण करा. रोज नेटाने काही क्षण स्मरण करा. 

स्मरणाने एखादी हयात व्यक्ती, अनेक वर्षांनी भेटण्याचे योग प्राप्त होतात, हे स्वानुभवाने सांगतो. त्यामुळे ईश्वर स्मरण हे नित्य, नेमाने आणि निग्रहाने करा. ईश्वर त्या निग्रहाला पाठबळ प्रदान करतोच करतो. उद्या दुसरा उपाय, जो श्रीमदभगवद् गीतेतील परमोच्च बिंदू आहे, त्यावर उद्या चर्चा करूया. पण ईश्वर स्मरणात रहा, निग्रह करा, नक्की जमेल. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२६/०३/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...