Skip to main content

भोग आणि ईश्वर ४०९

भोग आणि ईश्वर  ४०९ 

आपल्यासारखे सर्वसामान्य जीव आणि ज्ञानी माणसं यातील मुख्य भेद हा दुःख आणि भोग याच प्रसंगात सिद्ध होतो असं नाही, तर तो सुखाच्या काळातही जाणवतो. मुळात दोन्ही काळ हे आत्मपरिक्षणासाठी आहेत वा असतात. जर दुःखाचा काळ असेल तर, आपण आधी केलेल्या चुका, प्रमाद यांच्या भोगण्याचा काळ आहे, याची जाणीव, त्याकाळात सतत ठेवून जगलं की, जगणं सुसह्य होऊन जातं. उपभोगांच्या काळात हीच जाणीव अजून सूक्ष्म झाली पाहिजे की, मी हा आनंद जगतोय तो माझ्या कर्माचं मला योग्यवेळी मिळालेलं फल वा मोबदला आहे. 

पण निसर्गाच्या बदलांच्या नियमानुसार, सर्व दिवस बदलते असतात. त्यामुळे माझ्या या उपभोगांच्या काळात, मला याची जाणीव ठेवली पाहिजे की, हे जसे कर्मफल उपभोग स्वरूपात आहेत, तसेच भोग व दुःख हे देखील, कर्मफल स्वरूपंच आहेत. त्यामुळे हे सर्व चक्रा कार गतीने सुरूच राहणार. पण मी या प्रवाहातील एक थेंब न होता, यातून पार होऊन, पुढच्या प्रवासाला जाण्यासाठी स्वतःला सिद्ध करायचं आहे. 

म्हणजेच जर मी सुखात वाहावात गेलो नाही तर, मी दुःखातही शांत आणि स्थिर राहीन. कारण मुळात सुख व दुःख हे माझ्याच कर्मफलाच्या दोन बाजू आहेत. ज्यामध्ये माझी गत काळातील, चांगली व वाईट, दोन्ही प्रकारची कर्म, मीच माझ्या गत काळात केली आहेत, आज ती समोर येत आहेत. ज्यामुळे आज येणारं सुख किंवा दुःख, हे मला पचवूनच पुढे जायचं आहे. 

पण मुख्य गोष्ट जी आज अर्थात वर्तमानात मला करायची आहे, ती म्हणजे, माझं आताचं कर्म किंवा आताची कर्म मला योग्य पद्धतीने करून, भविष्यातील व कदाचित पुढच्या जन्मीचं आयुष्य सुलभ घडवायचं आहे. हा मुख्य उद्देश वर्तमानात असला पाहिजे. आपलं होतं काय की, मुळातच आधीच्या कर्मांची फलं जी आज भोगत आहोत, त्यावर आपला स्वभाव अवलंबून ठेवतो किंवा होतो. 

म्हणूनच या दोन गोष्टी, वर्तमानातील भोग आणि वर्तमाना तील कर्म, ही वेगवेगळी आहेत किंवा असायला हवीत, हे विसरतो. या भेदाचं ज्ञान झाल्यावर, आपल्या वृत्तीत व वागण्यात व आचारात फरक पडायला हवा. जो फरक ज्ञानी माणसाच्या वागण्यात, बोलण्यात जाणवतो. याचं महत्वाचं कारण म्हणजे, खरा ज्ञानी मनुष्य, आत्मोद्धार व आत्मोन्नत्ती हे अंतिम ध्येय मानतात व जाणतात. त्या व्यतिरिक्त मध्ये घडणाऱ्या सर्व गोष्टी म्हणजे चालत्या गाडीच्या मार्गात येणारी, मधली स्थानकं आहेत अशी त्यांची धारणा असते. 

यावर अजून पुढे चिंतन करू, पण उद्याच्या भागात, पण आपलं नामस्मरण साधता साधता. 

भोग आणि ईश्वर भाग १ व २ पुस्तक स्वरूपात उपलब्ध आहे. खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधल्यास, पुस्तक मागवता येईल.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१३/०१/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...