Skip to main content

भोग आणि ईश्वर ४२४

भोग आणि ईश्वर  ४२४ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

मनाचा विचार करताना, एक विचार सहज डोकावून जातो,तो म्हणजे,मनाची शक्ती जितकी अफाट, तितकाच त्याचा व्याप, पसारा, व्यास अचाट आहे. त्यामुळे त्याची ऊर्जा देखील अमर्याद आहे. खरंतर मनाबद्दल ही गोष्ट जाणल्यानंतर, वास्तविक सर्व सामर्थ्याची कल्पना किंवा जाणीव येऊन, त्या अफाट आणि अचाट शक्तीचा उपयोग करून घेता यायला पाहिजे. 

पण अजून एक गोष्ट मनाबद्दल आहे, ती म्हणजे, त्या मनाचं चंचलत्व किंवा विषयाकडे सहजी असलेली ओढ किंवा आसक्ती. या एका अवगुणामुळे, अनेक बाबतीत मर्यादा पडतात वा येतात. मुळात विधात्याने अशी रचना का केली असेल, असा एक विचार बरेचवेळा येतो. पण त्याचं उत्तर म्हणजे, जे साध्य करण्यासाठी हा देह ईश्वराने निर्माण केला, ते साध्य करणं, फक्त देह, फक्त बुद्धी यांनी शक्य नाही. तर त्यासाठी ऊर्जा, शक्ती व प्रेरणा आवश्यक आहे आणि ती मनाकडे आहे. जेंव्हा हे तिन्ही एकत्र येऊन कार्य करतील, तेंव्हाच सर्व ईश्वरी इच्छेनुसार साध्य होईल. 

म्हणजे जर देह हा वाहन असेल तर मनाची ऊर्जा व शक्ती,  हे त्याचं इंधन आहे. म्हणजे वाहनाशिवाय इंधन निरुपयोगी आहे, तर इंधनाशिवाय वाहन हे काही करू।शकत नाही. पण हे इंधन योग्य प्रकारचं आणि योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी मिळालं, तरच वाहन, नीटपणे चालू शकतं. आता जे इंधन आहे, ते शिक्षण, संस्काराने, संगतीने, विचाराने, संचित व कर्म यांनी घडतं किंवा बिघडतं. 

म्हणजेच संस्कार, शिक्षण, संगत, विचार, संचित व कर्म, हे सहा घटक, मनातील ऊर्जा व शक्ती यांचे नियंत्रक म्हणता येतील. यातील शिक्षण, संस्कार आणि संचित हे अनेकदा आपल्या पूर्व कर्मानुसार प्राप्त होतात. मग संगती, विचार व कर्म हेच घटक उरतात, जे आपण स्वतः नियंत्रित करू शकतो किंवा यामध्ये आवश्यक बदल संभवतात. म्हणजे मनाला नियंत्रित करण्याला सुद्धा एकप्रकारे मर्यादा आहे. 

यामध्ये आजूबाजूचा परिसर किंवा वातावरण हे देखील थोड्या फार प्रमाणात कार्य करते. थोड्याफार प्रमाणात यासाठी म्हटलं की, मनावर नियंत्रण असलेले आत्मे, देह कोणत्याही स्थितीत वा वातावरणात असले, तरी योग्य दिशेने कार्य करत, उन्नत्ती साधू शकतात. अशी उदाहरणं सुद्धा आपण पाहिलेली आहेत, ज्या मध्ये कोणत्याही विपरीत परिस्थितीत राहिलेले, आपला शैक्षणिक व आर्थिक विकास साधतात किंवा साधून घेऊ शकतात. 

या पूर्वजन्मीच्या पुण्याईने प्राप्त गोष्टी झाल्या. त्या व्यावहारिक जगतात, उपयोगी पडतात. पण आत्मिक उन्नत्ती साधण्यासाठी संगती, विचार व कर्म हे खूप महत्वाचे आहेत. या मुद्द्यावर अजून चिंतन करूया, पण नाममात्र का होईना नाम घेत घेतच. कारण देवचिये द्वारी उभा क्षणभरी..... .... 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२८/०१/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...