Skip to main content

भोग आणि ईश्वर ४१७

भोग आणि ईश्वर  ४१७ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)

देह हा पंचमहाभूत तत्वांपासून बनलेला असल्यामुळे, गुरुत्वाकर्षण ओढ, त्यातील रक्ताला आणि त्या माध्यमा तून, बुद्धीला व मनाला असते. पण या सर्व शक्तीपेक्षा एक मोठी शक्ती प्रत्येक माणसाला मिळालेली आहे. ती शक्ती म्हणजे इच्छाशक्ती. मुळात एकदा ज्ञानप्राप्ती झाली आणि हे लक्षात आलं की, हा सर्व खेळ देह मन यांच्या आसक्तीतून आणि बुद्धी त्यामागे ओढली जाऊन, घडतो, मग खरंतर सर्व गोष्टी सोप्प्या व्हायला हव्यात. 

पण यातच खरा पेच आहे किंवा खरी गोम आहे. म्हणजे बुद्धी ज्यामध्ये ज्ञान व जाणिवांची जागृती होते आणि मन जे या सर्वांचा विचार करतं, त्यांचा समागम किंवा संगम व्हायला हवा.तो झाला की, बुद्धीच्या ज्ञानयोगात, जाणिवांच्या जागृतीत मनाची प्रगल्भता वाढली पाहिजे. पण आपण स्वतःच हे होऊ देत नाही. याचं कारण म्हणजे मनाचा वारू, बुद्धीच्या लगामाने योग्य दिशेने वळायला हवा, तो आपण वळवत नाही. उलट बुद्धीला मनाच्या मागे धावायला लावून, अहित साधण्यास सहाय्य करतो आणि विचारांची, अर्थातच चिंतनाची गरज जेंव्हा असते, तेंव्हा आपण मनाला व बुद्धीला योग्य चिंतानाचं खाद्य पुरवत नाही. 

मुळात मन व बुद्धी हे चंचल आहेत. त्यामुळे त्यांना सतत काही विचार करत राहावं लागतं. चंचलतेच्या प्रभावाने, मनाला स्थिरता येत नाही. तुम्ही विचार करा, ज्यावेळी आपण, एखादी गोष्ट, खूप एकाग्रतेने करतो, त्यावेळी मनाला व बुद्धीला एक वेगळंच समाधान मिळतं. पण या चंचलतेपायी, आपण मनाला हवी असलेली विचारांची पक्की बैठक, देण्याचा प्रयत्न करत नाही. 

मनाला आणि बुद्धीला जर, विशिष्ट चांगल्या विचारांचं चिंतन खाद्य पुरवत गेलो, मनाला चांगल्या विचारांनी बांधत गेलो आणि नियमितपणे एका चांगल्या विचारांची शिदोरी, मनाला देत गेलो तर, मनाला अश्या विचारांची व चिंतनाची सवय लागू शकते. विचार व चिंतन ही अशी गोष्ट आहे, जी मनाला व बुद्धीला स्थिरता देते. विशिष्ट विचार प्रयत्नपूर्वक रुजवण्याचा सराव, लावत गेलो, तर विचारांना व चिंतनाला एक चांगली दिशा मिळू शकते. 

एकदा दिशा मिळाली की, त्या विचारांना लय व गती प्राप्त होते आणि चांगल्या विचारांच्या या खाद्याने, ज्ञानवृद्धी होऊन व जाणीवांना प्रगल्भता प्राप्त होते. चिंतनाचा लाभ सर्वस्तरावर दिसू शकतो. चांगले विचार मनाला व बुद्धीला स्थिर ठेवून, अनिष्ट, अहितकारक, नकारात्मक विचारांना वेळीच नियंत्रणात ठेवून, विचारांना योग्य मार्गाने नेण्यास मदत करतात. 

पण हे सर्व एका इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. म्हणजे मला खरच चांगल्या विचारांची गरज आहे, जे माझ्या आत्मिक उन्नतीचे मार्ग सुलभ करतील. अशी इच्छाशक्ती चुकीच्या, वाहावत जाणाऱ्या, आत्मनाशी व चुकीच्या कर्मांना जन्म देणाऱ्या विचारांना नियंत्रणात ठेवणारी असावी. याचा अजून सखोल चिंतनात्मक अभ्यास उद्याच्या भागात करूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२१/०१/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...