Skip to main content

भोग आणि ईश्वर ४१६

भोग आणि ईश्वर  ४१६ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)

एकूणच  विषय, वासना, माया, मोह हे सर्व आत्म्याला ग्रासणारे साप आहेत, पण ते शर्करा वेष्टनात आहेत. थोडं अतर्क्य आणि काल्पनिक वाटतं, पण सत्य आहे. कारण हे सर्व देह,बुद्धी व मुख्यतः मन यांना ग्रासतात. त्यांच्या सेवनातून  एक प्रकारचा आनंद किंवा मद प्राप्त होतो. म्हणजे त्यातून एक सुखाची अनुभूती प्राप्त होते. ती अनुभूती त्या विषय व वासनेभोवती, देह मन व बुद्धी यांना गुंतवून ठेवते. 

म्हणजे मनाची देहाची धाव त्याकडे सतत होते. ज्यामुळे बुद्धी त्या विष्यसुखांना प्राप्त करण्याचे मार्ग शोधून, त्यांना देह आणि मन यांसाठी प्राप्त करण्याचं मुख्य कर्म, देहाकडून करवून घेते. म्हणजे मोह किंवा लोभ किंवा काम वा क्रोध आहेत, मन व देह यांच्या आनंदासाठी. पण देह एकटा किंवा मन एकटं प्रत्यक्ष कर्म करू शकत नाही. त्यासाठी दोघांनाही बुद्धीच्या सहाय्यची गरज असते. म्हणूनच या तिन्हींच्या एकत्र येण्याने अनेक चुकीच्या गोष्टी केल्या जातात. 

सकृतदर्शनी यातील काही सांसारिक कर्मबंधनातील असतात आणि काही अनावश्यक असतात. सांसारिक कर्मातील असे षड्रिपु संगदोष, पुढील अपेक्षांना आणि त्यायोगे कर्मांना जन्म देतात, ज्या संसारोपयोगी असल्या तरी कर्मफल निर्माण करतात. त्यामुळे पुन्हा बद्धता येते. 

ज्या अनावश्यक असतात, त्या अनिष्ट कर्मांना जन्म देतात  आणि त्याद्वारे घातक कर्मफल निर्मिती करतात. मायेचा, मोहाचा हाच पाष आत्म्यावर निरंकुश सत्ता गाजवतो आणि ते ते सर्व करवून घेतो, जे वास्तविक अनावश्यक आहे. म्हणजे ज्यावाचून अडणार नाही, पण मन देह त्याकडे आकर्षित होऊन, त्यांच्या प्राप्तीचे भिन्न भिन्न व नैतिक अनैतिक मार्ग बुद्धी चोखाळत जाते आणि देह व मन यामागे ओढली जाते. 

हीच अविवेकी बुद्धी, विचारांना विकारांच्या दावणीला बांधून, सारासार विचार व नीती बासनात गुंडाळून ठेवते. म्हणजे संसारात काम हा मात्र प्रजोत्पादन या क्रियेपुरता मर्यादित असावा आणि तोदेखील स्वस्त्रीपुरता. पण बुद्धी मन हे देहाच्या गरजांमागे, ओढले जातात आणि नन्तर मन व बुद्धी दोन्ही, त्या मोहात गुंतले जाऊन, तिन्हींना ग्रासून टाकते. मानवाच्या अधोगतीला एखादा रिपुसुद्धा पुरेसा आहे. 

यातून अनावश्यक फलशृंखला निर्माण होते. ज्यांना पूर्ण करण्यासाठी, अनेक जन्मांची साखळी आपणच तयार करतो.पण ज्यावेळी हे फलरूप,वेगवेगळ्या परिणामांच्या स्वरूपात वास्तवात येतं, त्यावेळी आपण या जन्मात बरेच पुढे गेलेलो असतो किंवा पुढील जन्मात गेलेलो असतो. त्यावेळी या फलांच्या किंवा परिणामांच्या प्राप्त होण्याने, मन चक्रावून जातं, त्या परिणामांची संगती न लागल्यामुळे. 

म्हणूनच या सर्वात, यथार्थाचं ज्ञान, परिणामांची बुद्धीला जाणीव आणि या सर्वांतून आत्मजागृती, ही आवश्यक ठरते. तरच विवेक आणि विचार मनावर, मन बुद्धीवर व बुद्धी मन हे दोन्ही मिळून, देहावर नियंत्रण ठेवू शकतात. यावर अजून सखोल चिंतन, उद्याच्या भागात, आवश्यक आहे. पण तोपर्यंत नामाचा श्वासात्मक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आपण करत राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२०/०१/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...