Skip to main content

ज्ञानेश्वरी ओवी भावार्थ. १

ज्ञानेश्वरी ओवी भावार्थ. १

श्रीज्ञानेश्वर माऊली नमोनमः 
श्रीसद्गुरुमाऊली नमोस्तुते 

सांडीं हें मूर्खपण । उठीं घे धनुष्यबाण ।
संग्रामीं हें कवण । कारुण्य तुझें ? ॥ २.१८ ॥ 

माझे स्नेही श्रीनितीन भानुशाली यांच्याशी परवा चर्चा करताना, त्यांच्या बोलण्यात या ओवीचा उल्लेख आला. श्रीज्ञानेश्वरीतील दुसऱ्या अध्यायातील ही अठरावी ओवी आहे. अर्जुनविषादयोग पहिल्या अध्यायात आल्या नंतर,दुसऱ्या सांख्ययोग या अध्यायात ही ओवी आपल्या समोर येते. याचा भावार्थ माझ्या आकलना नुसार मांडण्याचा प्रयत्न करतो. 

भगवंतांनी द्वापारयुगामध्ये, युगांत होताना, झालेल्या महाभारत युद्धामध्ये, अचानकपणे हताश व निराश झालेल्या अर्जुनाला समजावून सांगून, युद्धाला पुन्हा सज्ज करण्यासाठी वेद शास्त्र यांचं सार काढून, त्याला अमृतपान करवून, त्या ज्ञानरसाच्या पेल्यातून, युद्धासाठी पुनः उभं केलं. 

खरंतर हे महदकार्य होतं. कारण युद्धआधीच, हताश व निराश झालेल्या योध्याला पुनः उभा करून, त्याला कर्तव्याची जाणीव देऊन, शस्त्रसज्ज होण्यासाठी तयार करताना, वास्तविक मोजकं आणि मर्यादित ज्ञान देऊन, किंवा योगामायेने त्याची बुद्धी पालटून, भगवंतांना युद्धाचं कार्य संपन्न करून घेता आलं असतं. 

पण या एका घटनेतून, अर्जुनासह समस्त विश्वाला एक कायम स्वरूपी मार्ग,दिशादर्शक तक्ता, मनाला नित्य वळण देत,भरकटू न देणारा दीपस्तंभ उभा करून दिला. म्हणजेच अर्जुनाच्या आडून विश्वाच्या कायमस्वरूपी कल्याणाची व्यवस्था लावून दिली. त्यामुळे अश्या ज्ञान युक्त, दीपस्तंभ असलेल्या, ज्ञानाला  सामान्यातल्या सर्वसामान्य मानवापर्यंत पोचवता यावं वा तिथपर्यंत हे ज्ञान पोचवलं जावं, यासाठी असलेलं हे ज्ञान, वैश्विक करण्यासाठी पुन्हा एकवार, भगवान श्रीकृष्ण यांना देहधारण करून, अवतीर्ण व्हावं लागलं. 

अवघं एकवीस वर्षाचं हालअपेष्टा, अपमानयुक्त जीवन जगूनही, देवभाषा संस्कृतातील हे ब्रह्मज्ञान, फक्त विश्वा प्रत जावं, या उद्देशाने, छोटसा पण प्रचंड चैतन्यमय आयुष्य जगून, विश्वपिता असल्याचं आपलं ब्रीद सार्थ करून दाखवलं. तेदेखील अश्या काळात, ज्यावेळी ज्ञानाची कवाडं संकुचित वृत्तीने फक्त आपल्याकडे ठेवून, भक्तिमय जीवनाचा सामान्यांचा अधिकार पायदळी तुडवणाऱ्या,समाजातील विषवल्ली, कोणताही आततायी पणा, उन्माद न दाखवता, सहज सुलभ भाषेत हेच ज्ञान  मांडून, समूळ नष्ट करून, समाधिस्थ होऊन, निर्गमन करते झाले. 

वाङ्मयीन, अध्यात्मिक, शास्त्रीय, वैज्ञानिक, ज्ञानयुक्त अश्या विविध पातळीवर अलौकिक असणाऱ्या सार्थ श्रीज्ञानेश्वरी ग्रंथात, माऊलींनी जगाला दिलेलं ज्ञान गीतेइतकच अद्वितीय आणि परब्रम्ह स्वरूप आहे. त्यातीलच एका ओवीचा भावार्थ आपण पुढील भागात, यथामती, यथाभक्ती जाणून घेण्याचा,  प्रयत्न करूया. 

श्रीरामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी !!
श्रीज्ञानेश्वर महाराज की जय! श्रीतुकाराम महाराज की जय !!
सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय !! 

©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
२४/११/२०२१
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...