Skip to main content

भोग आणि ईश्वर १७२

भोग आणि ईश्वर  १७२

शंका घेण्याच्या या वृत्तीचा अभ्यास करताना एक शंका मनात आली की, तिसरी एक शक्यता अशी असू शकेल का की, अश्या शंका येण्यात विधात्याचा काही हेतू असेल का. याचं कारण असं की माया ही भगवंताधीन असल्यामुळे, ती सर्वच गोष्टी स्वतःच्या मर्जीनेच करत असेल असं नाही. काही सूचक  गोष्टी वा विचार हे विधात्याच्या कल्पनेतून वा मनात आलेले, माया आज्ञा म्हणून नक्की पार पाडत असेल. 

जसं बरेचवेळा निष्ठा, श्रद्धा, विश्वास, ठामपणा यांची चाचपणी नक्कीच विधात्याकडून केली जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंवा अवाजवी शंका उत्पन्न करून साधनेत असलेल्या व्यक्तीला सुरवात करतानाच संभ्रमित करून, हतोत्सहित करत, त्याच्या निष्ठेला सुरवातीलाच धक्का लावला तर, साधकाची चिकाटी, उत्साह आणि आत्मीयता यांची कसोटी आधीच पाहण्याची ही एक पद्धत असूही शकेल. म्हणून शंका रास्त असो वा अयोग्य साधना आणि त्यावरील विश्वास न ढळू देता साधन सुरूच ठेवणं हिताचं आहे, शंकांचं समाधान योग्यवेळी होईल, याची खात्री बाळगा.

शंका कुशंकांच्या या दोन तीन लेखात दोन शब्द वापरात आले, आत्मोन्नती व आत्मोद्धार. वास्तविक अर्थाने समान शब्द भासत असले तरी अध्यात्मिक अर्थाने ते भिन्न आहेत. उन्नती म्हणजे चढण किंवा प्रगती, किंवा प्रमोशन ज्याला व्यावहारिक भाषेत म्हणतात ते. म्हणजे एक एक पायरी चढत जाऊन आपल्या मनातील पदापर्यंत पोचणं म्हणजे उन्नती. 

उन्नती ही बऱ्याच अंशी प्रयत्न आणि जोडीला कृपा यांचा अद्भुत संगम आहे. आपण ठरवलेल्या किंवा आखून घेतलेल्या ध्येयाने प्रेरित होऊन, कार्यरत राहून, ध्येयासक्ती ठेवून, मार्गक्रमण करणं आणि त्या प्रयत्नांच्या फलस्वरुप आपण एक एक पायरी पादाक्रांत करत,ध्येयाच्या जवळ पोहोचणं म्हणजे उन्नती. 

चैतन्यस्वरूप आत्मा, ज्यावेळी देह धारण करतो,त्याचवेळी त्याचा अनंतापर्यंतचा प्रवास सुरु झालेला असतो. वाटेत येणारे अडथळे हस्ते परहस्ते दूर होत जातात आणि आपण पायरीपायरीने किंवा टप्प्याने वर उन्नती करत जातो. आता या सर्वांचा, आत्मोन्नती बाबत विचार करायचा झाल्यास, आत्मा हा अनेक देहातून प्रवास करत, प्रत्येक देहातील कर्माचे ऋण घेत घेत, त्यांचे मोल देहाच्या, मनाच्या व स्वतःच्या भोगांच्या रुपात  चुकते करत करत, प्रभूपासून सुरू झालेला हा प्रवास पुन्हा त्याच प्रभूपाशी न्यायच्या या मार्गक्रमाणेला आत्मोन्नती म्हणता येईल.

प्रत्येक जन्मात, प्रत्येक देहात काही मिळवत आणि संचिता तील भार कमी करत जाण्याचा हा प्रवास,खरतर आत्म्याचीच परीक्षा आहे. कारण देहधारण हे कर्म आणि कर्म गतीच्या सिद्धांतानुसार आत्म्याला नवीन वस्त्रासम मिळतं. खरतर ते देह मन व वाचारुप कर्माचं प्राप्त फल आहे. पण यात आत्मा स्वतः काहीही करू शकत नाही. त्याला माध्यम म्हणून देहाची गरज ही लागतेच. 

फक्त चैतन्यस्वरूपात, आत्मा काही कार्य साधू शकत नाही. देहात आल्यावर आत्म्याला मन आणि देह यांच्या ताळमेळा तून, इथःपर प्राप्त ज्ञानाचा उपयोग करून, देहाची व मनाची लहर अर्थात स्वभावधर्म सांभाळून, मोह,माया व वासना यांच्या पाशात देह आणि मन अडकलं नाही तर, प्राप्त परिस्थितीत आपला हेतू साध्य करणं, हे ध्येय पार पाडावं लागतं. 

आता या सर्वांचा विचार करून चिंतन करा म्हणजे जाणवेल की, किती जन्मातून व देहातून, तुमच्या देहातील आत्मा इथपर्यंत आला असेल, त्यात विकार, विकृती,  विचार, वासना, व्यवहार, व्यवधानं, व्यसनं, व्यासंग या सर्वांना सांभाळत, यातून देहाला आणि मनाला उसंत मिळाली तर, ते काही उन्नतीचा विचार करणार, त्यातील काहीच विचार  आचारापर्यंत पोचणार, मग आत्मोन्नतीला वेळ किती कसा मिळणार. तेवढ्यात हा जन्म सरला की, आपल्या देहातील हा आत्मा पुन्हा पुढील देहात जाऊन, भोग आणि उपभोग या खेळाला सांभाळत, काय आणि किती साध्य करणार, ते ईश्वरच जाणे. 

यावर अजून चिंतन उद्याच्या भागात. पण तोपर्यंत क्षणाचं मोल जर लक्षात आलं असेल तर मिळतील तितके क्षण नाम घ्या, प्रत्येक क्षण आत्मोन्नतीसाठी अनमोल आहे.

विषय अपूर्ण असल्यामुळे उद्या यावर पुढे चर्चा करूया. नामात रहा साधना हाच प्राण माना, बाकी सर्व त्यानेच साध्य होईल. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  ज्यांना पुस्तक हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर मेसेज करून  वा फोन करून संपर्क करावा. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२१/०५/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...