Skip to main content

भोग आणि ईश्वर १७१

भोग आणि ईश्वर  १७१

खरतर कालच्या विवेचनानंतर बरेचसे संभ्रम दूर व्हायला हवेत. पण तरीही मन हे संभ्रम, शंका, कुशंका यांनी भरलेलं असतं. वास्तविक अश्या शंकांचे मी दोन विभाग करीन. एक साधना किंवा कोणतंही कार्य करण्याआधी आलेल्या शंका आणि दुसरा विभाग साधना किंवा कोणतंही कार्य करत असतानाच्या शंका. 

पहिल्या विभागातील शंकांचे दोन उपप्रकार होतील. एक म्हणजे जे कार्य किंवा साधन योजलं आहे, त्या संबंधी माहिती मिळावी म्हणून आलेल्या शंका आणि दुसरं म्हणजे कार्य वा साधन करण्यापेक्षा किंवा करून बघण्यापेक्षा ते टाळण्याच्या उद्देशाने विचारण्यात आलेल्या किंवा डोक्यात आलेल्या शंका. या मध्ये मुख्यतः समोरच्या व्यक्तीच्या मनातील खरे भाव लक्षात आणून देतात जेणेकरून जाणवतं  की, शंका विचारणारी व्यक्ती कितपत गंभीर आहे, निहित कार्यात वा साधनेत.

दुसऱ्या विभागात सुद्धा दोन उपप्रकार आहेत. एक म्हणजे साधना वा कार्य करताना येणाऱ्या अडचणीच्या रूपातील शंका,ज्या सदर कार्य सुरळीतपणे, निर्धोकपणे पुढे नेण्यासाठी आलेल्या अडचणीचं निराकरण करण्यासाठी केलेली विचारणा आणि दुसरा उपप्रकार म्हणजे शुद्ध भाव न धरता, कार्य सुरू करून आता ते न करण्यासाठी मन टाळाटाळ करतं आणि त्यासाठी कारण म्हणून मन अनेक प्रकारचे प्रश्न व अडचणी शोधतं.  

मुळात या दुसऱ्या प्रकारच्या शंका, मन हाती घेतलेलं कर्म वा साधना टाळण्यासाठीच करतं, याला कारण माया आणि पूर्वकर्मातील काही दोष, जे अश्या प्रकारच्या कोणत्याही कार्याला साथ देत नाहीत आणि देहाला सुद्धा ते अश्या कार्यात वा साधनेत सहभागी होऊ देत नाहीत. मुख्यतः जीवाला या जगताच्या आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यात आणि कर्मबंधनात, वासनेच्या जाळ्यात, विचारांच्या मोहात, भासमय दृश्यात अडकवून ठेवणं आणि त्याद्वारे नित्य त्या आत्म्याला देहबद्ध करत राहून, जगताचा खेळ निरंतर सुरु ठेवणं.  हेच खरतर मायेचं प्रमुख कर्तव्य आहे. प्रत्यक्ष भगवंताची छायारूप जी आहे ती भगवत भक्ताला भगवंताच्या सान्निध्यात कोणत्याही प्रकारे पोचू न देण्याचं कार्य अविरत करत असते. 

याचंच एक रूप म्हणजे जगतातातील, विशेषतः कलियुगातील खूप मोठी तक्रार जी ऐकायला मिळते कि, वा खोटं वागणारा आणि लांड्या लबाड्या करणारा आयुष्यभर सुखाच्या राशीत लोळलेला दिसतो. किंवा त्याला काही कधी झाल्याचं ऐकायला वा बघायला मिळत नाही. याचा परामर्श दोन तीन प्रकारे घेता येईल. पहिली गोष्ट देव अथवा दैवी शक्तीच्या विरुद्ध असणाऱ्या  असुरी शक्ती, या अश्या सिद्धांताच्या शोधात असतात. पुराणकाळापासून हा खेळ सुरु आहे. कलियुगामुळे त्याचा परिणाम  हा विशेष  प्रभावशाली आहे. याशिवाय लहरीच्या सिद्धांतानुसार नकारात्मक वा असुरी वा वासनायुक्त लहरी या विशेष जलद प्रभाव दाखवत असतात. 

कर्मसिद्धांताप्रमाणे, ज्याला त्याला, त्याच्या कर्मातील सुख उपभोगण्यासाठी व दुःख भोगण्यासाठी, विशिष्ट परिस्थितीनुसार त्या त्या काळात, जन्म प्राप्त होऊन, त्याच्या वाट्याचे संचितातील शिल्लक हिशोब चुकते करण्यासाठी अथवा त्यांचा लाभ घेण्यासाठी संधी मिळते अथवा वेळ येत. त्यानुसार जर ती व्यक्ती  पाप कर्म करून सुख उपभोगत असूनसुद्धा, सुखाने आहेत असे भासत असेल किंवा तसं चित्र सकृतदर्शनी दिसत असेल, तर तीसुद्धा एक प्रकारची माया आहे, आपली मती भ्रष्ट करून सन्मार्गावरून पथभ्रष्ट होण्यासाठी अविरत कार्य करणारी. . ज्याचा परिणाम दोन प्रकारे होऊ शकतो. एक आपण आतापर्यंत केलेलं पुण्यकर्म, हे क्षणात खाक होऊ शकतं आणि आपली पुढील जन्माच्या भोगाची ती तजवीज आपणच करून ठेवू शकतो.  . 

दुसरं एक तर्क जे या मागे आहे कि, त्या व्यक्तीच्या गतजन्मातील संचितात अनेक प्रकारचे पुण्यफल योग दिसून येत आहेत आणि त्याच्या या जन्मीच्या वर्तनाने, त्याने त्या सर्व संचितातील पुण्याचा सर्व हिशोब चुकता करत आणला आहे. म्हणजेच ज्या वेळी वा ज्या क्षणी हा सर्व हिशोब विधात्याच्या वहीत चुकता होईल, त्या क्षणी सुधारण्यासाठीही या जन्मातील कोणतीही संधी न देता व त्याच्या पुण्याचा सर्व हिशोब पूर्ण करून, आता पुढील जन्मासाठी फक्त पापकर्मांचाच हिशोब शिल्लक उरणार. जो भोगण्यासाठी त्या व्यक्तीला पुढील जन्म हा अत्यंत खडतर असेल. 

विषय अपूर्ण असल्यामुळे उद्या यावर पुढे चर्चा करूया. नामात रहा साधना हाच प्राण माना, बाकी सर्व त्यानेच साध्य होईल. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  ज्यांना पुस्तक हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर मेसेज करून  वा फोन करून संपर्क करावा. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२०/०५/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...