Skip to main content

भोग आणि ईश्वर ६०

भोग आणि ईश्वर  ६०

(आज ही लेखमाला वा हे सदर सुरू करून साठ दिवस झाले आणि सलग साठ दिवस हे लेखन नित्य अनेक अडचणीतून माझे सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज करवून घेत आहेत. याद्वारे अनेकांना आपल्या अडचणी, शंका, प्रश्न यांची उत्तरं मिळत असतील तर त्याचं श्रेय फक्त माझ्या सदुगुरूंचं. परंतु काही न्यून वा कमीपणा राहिला असेल तर तो लेखनिक म्हणून माझा दोष समजावा. हे सदर असं अजून कितीकाळ सुरू राहील, हे तेच ठरवतील. पण जोपर्यंत त्यांची प्रेरणा व चैतन्य यामागे आहे तोपर्यंत हे सुरू राहील,  हा विश्वास माझ्या मनात आहे). 
   
नामाच्या मार्गावर चालण्यासाठी वा चालतांना अनेक वेळा अडचणी, अडथळे आहेत असं जाणवतं, किंवा वाटतं. पण यात एक गोष्ट लक्षात घ्या की, अश्या अडचणी वा अडथळे कोणत्याही नवीन कामाला  सुरुवात करताना येतात वा जाणवतात. 

सर्वात मुख्य अडचण ही लक्षात न राहण्याची. त्यावर सर्वात उत्तम उपाय म्हणजे मनाचा निग्रह ठाम असेल आणि हे मला करायचं आहेच असा निश्चय त्या निग्रहा मागे असेल तर लक्षात न राहण्याचा प्रश्न येणार नाही. लक्षात तेंव्हाच राहात नाही, ज्यावेळी एखादी गोष्ट मनाला करायची नसते आणि त्यामुळेच मन ती मुद्दाम स्मरणातून मागे टाकते. पण इथे तर आपल्याला स्मरणाचाच अभ्यास करायचा आहे आणि हा अभ्यास आहे एका मोठ्या परीक्षेचा, असं जर लक्षात ठेवलं तर नक्कीच नाम स्मरण्याचं विस्मरण होणार नाही. 

यावर अजून एक उपाय म्हणजे ज्या ज्यावेळी लक्षात येईल अथवा आठवेल त्या त्यावेळी त्या त्याक्षणी आणि ठिकाणी नाम घ्यायला सुरुवात करायची. कारण नामाला स्थळकाळ यांचं बंधन नाही. त्याचप्रमाणे कोणतीही गोष्ट नित्य करत गेल्यास व सातत्याने पाठपुरावा केल्यास शरीराला व मनाला त्याचा छंद जडतो. मुळात विरोध हा मनाचा स्वभाव आहे आणि त्याद्वारे तो शरीराचा धर्म होतो. म्हणूनच यालाच खीळ घालण्यासाठी जिथे स्मरेल त्या क्षणाला हाताशी धरून नाम सुरू करायचं.

एकदा नित्य नामस्मरण सुरू झालं की या अश्या सुरवातीच्या किरकोळ अडचणी सहजी दूर होतात. पण यात अजून एक धोका आहे. कारण माया ही नित्य आपलं जाळं टाकत असते आणि त्यात फसण्याचा धोका नित्य असतो. बरेचदा मी नाम घेतो याचादेखील थोडा अहंकार होऊ शकतो आणि अहंकार हा भौतिक जगतापेक्षा पारमार्थिक मार्गाचा सर्वात मोठा शत्रू आहे. केलेलं सर्व काही पुसून टाकण्याची क्षमता या अहंकारात आहे. म्हणून मी नाम घेतो ह्याचा अभिमान जरूर असावा पण तो अहंकारात परिवर्तित होणार नाही यासाठी जागरूक असावं. 

यावर एक उपाय आहे, तो म्हणजे मी सद्गुरू सेवा करत आहे आणि नामस्मरण हे सद्गुरू आज्ञेचं पालन आहे, हा भाव दृढ केल्यास, आपल्याला आपल्या करण्याचा गर्व वा अहंकार होणार नाही. याउलट गुरुसेवा या भावनेने केल्यास आपण नेहमी लीन राहू आणि गुरुस्मरणसुद्धा होत राहील आणि त्यांच्या चरणी नित्य केलेलं नामस्मरण अर्पण करण्याचा भाव मनात धरून नाम घ्यावं. त्यामुळे आपण केलेलं आपल्याला स्मरणार नाही, प्रत्येक क्षणी, पहिल्यांदा करत आहोत हा भाव राहील आणि लीनतेमुळे वृथा अहंकार जडणार नाही.

किंबहुना आपण करतोय ते सद्गुरू आपल्याकडून करवून घेत आहेत, हे मनात योजल्यास व मनाला तशी सवय लावून घेतल्यास, मन नेहमी सद्गुरूंचं ऋणी राहील आणि हे ऋण कोणत्याही विकाराला मनात थारा देणार नाहीत. त्यायोगे आपलं नामस्मरण नित्य होत राहील. जागृत मनात हा भाव दृढ धरल्यास, सुप्त मनापर्यंत तो जायला मदत होईल आणि एकदा का सुप्त मनात तो भाव पोहोचला की तुम्ही नामस्मरण करत आहात यात खूप मोठा पराक्रम आहे हे मनाला स्पर्षणार नाही आणि मन वृथा अहंकारी होणार नाही.

कारण लीन असलेले भाव हे नामाला खूप उंचीवर नेतात. मुळातच गीतेत जे सार सांगितलं आहे की सर्व कार्य ही ईशसेवा आहे, या भावनेने केल्यास, केलेल्या गोष्टीचा अहं जडणार नाही आणि सर्व सेवा ईश्वरचरणी रुजू होत राहील. म्हणून ही लीन असण्याची भावना मनात दृढ असावी. नसेल तर तिला मनात स्थान निर्माण करून बसवावे. यासाठीच सद्गुरू वा ईश्वर सेवा हा भाव धारण करून दृढ करावा. यासर्वात नामस्मरण हेच आपलं लक्ष असावं. त्याद्वारे जे साध्य होईल, त्यासाठीचं साधन, हे नामच आहे, हे कदापि विसरू नये. 

यात अजून एक शंका जी मायारुप ब्रह्मचाच भाग आहे ती म्हणजे फायदा व तोटा बघणे. नाम सुरू केल्यावर अडचणी वा मागील बाकी असलेलं कर्मफल, येत गेल्यास, मनात एक शंका नित्य यायला लागते. ती म्हणजे, मी तर नाम घ्यायला सुरुवात केली आहे, तर मग आता अडचणी का येत आहेत वा भोग का सुटत नाहीत. या शंका आणि त्याचा परिणाम यावर पुढील भागात चर्चा करूया.

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२९/०१/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...