Skip to main content

भोग आणि ईश्वर ३८

भोग आणि ईश्वर  ३८
 
माया आणि मायाकार हे भिन्न भासले तरी मुळात माया ही,  मायाकार परमेश्वर यांच्यापासूनच उत्पन्न झाली असल्यामुळे, ती पूर्ण परमेश्वर आधीन आहे. त्यामुळे जिथे जिथे ईश्वरोपासना आहे, मनातून भक्तिभाव आहे आणि साधनेची चिकाटी आहे तिथे तिथे तिचा प्रभाव कमी होतो. नाहीसा होत नाही, पण कार्यशक्ती क्षीण होते. सहसा मन व बुद्धी हे मायेच्या अधीन जाऊन विपरीत कार्य करू शकतात. परंतु मन आणि बुद्धी ईश्वर भक्तीत नामात व चिंतनात रममाण असेल तर मायेला फार कार्य करायला वाव मिळत नाही.

मनाची व बुद्धीची स्थिरता ही निश्चितपणे आणि निश्चीन्तपणे  नामाची साधना करणाऱ्या साधकांना यथावकाश येत जाते. पण यातील सर्वात प्रथम पायरी म्हणजे शंका न घेता नाम घेत राहणे. नामच का तर कलियुगी भक्तीची इतर सर्व साधनं व मार्ग हे बलहीन वा प्रभावहीन असणार आहेत. फक्त भगवंताचं स्मरण आपल्याला तारणार आहे. ते सनातन धर्माचं मर्म आहे कलियुगासाठी.

नाम हे सतत का घेत राहायचं हा एक प्रश्न मनात कायम येतो. मी दिवसातून एकदा सकाळीच वा झोपेआधी नाम घेतो तर मग तेवढं पुरणार नाही का. याचं उत्तर आहे, नाही पुरणार. कारण मुळात कलीचा प्रभाव हा क्षणक्षण वाढतो आहे. रिकामी बुद्धी वा कार्यशून्य मनात कलीचा व मायेचा प्रभाव लवकर पडतो. याचसाठी एक म्हण आहे की, रिकामं डोकं म्हणजे सैतानाचं घर. त्याचं कारण हेच आहे. 

कारण मनाला नित्य काही ना काही विचार करत राहण्याची सवय आहे. त्याला कोणत्या तरी कार्यात गुंतवून ठेवलं नाही तर ते एखाद्या समंधासारखं आहे. रिकामं राहीलं तर विघातक विचार, मागचं दुःख क्लेश यांची आठवण काढेल, उगाचच चिंता करत बसेल, भविष्याची व्यर्थ भीती घेऊन बुद्धीला छळत बसेल, नको असलेले व्रात्य विचार मनात येऊन मनाची बुद्धीची आणि पर्यायाने आत्म्याची शांती घालवून व्यर्थ वेळही वाया घालवेल ते वेगळंच.

म्हणून अश्या चंचल दिशाहीन व भरकटू शकणाऱ्या मनाला तशी संधी न देता एक चाळा म्हणून सुरवात करून द्यायची. मनाचा विचार जास्त न करता, सुरवात दृढपणे करून जितका वेळ मोकळा मिळेल, तितका वेळ सुरवातीला एक छंद म्हणून आपण स्वतःला गुंतवून घ्यायचं. आपल्याला सवय लागली की, मन आपोआप स्थिर बसायला सुरवात करेल. म्हणजे नेटाने नाम घेत त्याची वेळ हळूहळू वाढवत न्यायची. 

अनुभवाने सांगतो की, रिकामा वेळ सुरवातीला देत गेल्यावर  त्याची इतकी सवय होते की, कधी कुठे आणि किती नामस्मरण करतो याची चिंता करायची आवश्यकता राहणार नाही. खरतर देवाचं स्मरण म्हणजे त्याच्या दिव्य स्वरूपाचं स्मरण, ज्यामुळे भावसागरातील जीवननौका विधाता स्वहस्ते पार लावून देतो. पण हे स्वरूपाचं स्मरण सतत करत रहायला माणूस पूर्णवेळ त्यात रममाण असायला हवा. त्याव्यतिरिक्त मानसशास्त्र असं सांगतं की, एखाद्याला आठवायला त्याच्या स्वरूपापेक्षा त्याचं नाव वा नाम लक्षात ठेवणं बुद्धीला आणि मनाला जास्त सोप्प आहे.

एखाद्याचा चेहरा समोर आणायला मेंदूला काही सेकंद वा सेकंदाचा काही भाग खर्च करावा लागतो. त्याचप्रमाणे असा चेहरा हा प्रत्यक्ष चर्मचक्षूंसमोर न येता, मेंदू त्याची भासमान आकृती मनःपटलावर उभी करतो. त्यासाठी जास्त क्रयशक्ती नष्ट होते. तुम्ही स्वतः प्रयोग करून बघा. एखाद्याचा चेहरा आठवून बघा, निश्चितपणे त्याला जास्त वेळ आणि प्रयास लागतो. पण त्याला विशिष्ट नाम वा काही संज्ञा असेल तर तीच प्रतिमा उघडायला मेंदूला फार प्रयास पडत नाहीत.

ही गोष्ट नित्याच्या व निकटच्या परिचयातील. तर मग ज्याला आपण पाहिलंसुद्धा नाही, ज्याचा आवाजसुद्धा ऐकला नाही त्याला स्वरूपासकट लक्षात ठेवायचं आणि त्यात त्याच्या असंख्य प्रतिमा आपण आजमितीस पाहिलेल्या असतात. मग विचार करा कुठली प्रतिमा डोळ्यासमोर आणायची आणि त्याचं ध्यान लावून बसायचं हा मोठा प्रश्न पडेल. कदाचित हे साधेलसुद्धा परंतु त्यात सातत्य ठेवता येणं महाकठीण कार्य आहे. 

याव्यतिरिक्त आपल्याला त्या ईश्वराला साद घालायची आहे. नामस्मरण म्हणजे त्या परम दयाळू परम शक्तीला साद घालून आपली व्यथा संभाळून घेण्याची विनंती, घडलेल्या चुका वा प्रमादांची, कबुली देऊन क्षमायाचना करायची आहे आणि इथून पुढे घडणाऱ्या गोष्टी तूच संभाळून घेणार आहेस असं साकडं घालायचं आहे. हे सर्व लक्षात घेऊन त्याला साद घालायची आहे. 

हे मर्म मनात ठेवलं की येणारं नाम हे आत्म्यापासूनच येईल यात शंका बाळगू नका. आपल्याला या कार्यात आपले सद्गुरुच साथ देतील. त्यांचं स्मरण करून कोणतेही आढेवेढे न घेता, मोकळ्या मनाने आधी नामाद्वारे ईश्वराच्या स्मरणाला सुरवात करा. त्याची प्रतिमा आपोआप आत्मचिंतानातून अंतःकरणात स्थिर होईल, हा विश्वास ठाम ठेवा. कारण तो तुमच्या सादाची प्रतीक्षा करत आहे. त्याला आपल्या जवळ येण्याची इच्छा आहे. आपणच त्याला साद घालायला कमी पडतो. 

 पुढील भागात बघूया. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०७/०१/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...