Skip to main content

भोग आणि ईश्वर ३३

भोग आणि ईश्वर  ३३
   
गीतेचं तत्व हे कर्म ज्ञान आणि भक्ती या तीन आधारांवर आहे. तरीही सर्वांचा शेवट हा भक्तीत होतो. किंबहुना कर्म व ज्ञान यांचा शेवट भक्तीत झाला पाहिजे. कारण कर्म आणि ज्ञान हे माणसाला एका विशिष्ट उंचीवर नेऊ शकतं परंतु भगवंताच्या हृदयात भक्तीच पोचवते. भक्ती म्हणजे ईश्वराशी अनन्य संबंध, कारण जो भगवंतापासून वेगळा अर्थात विभक्त नाही तो भक्त. जिथे मी आणि भगवंत हे संयुक्त आहेत ती भक्ती.

भक्ती ही प्रेमाशिवाय असूच शकत नाही. भक्ती ही भगवंतावरील भक्तांच्या प्रेमाची अत्युच्च अनुभूती आहे. ती अनन्यसाधारण अशीच असते. भक्तीला मोजमाप नसतं. भगवंतापासून आपण दूर या शरीरात आलो आहोत आणि इथून परत त्या पूर्ण अंशाकडे प्रवास करायचा आहे, याची जाणीव म्हणजे भक्त होण्याची सुरवात. आपल्याला आपल्या माणसांपासून तोडल्यानन्तर वा ताटातूट झाल्यानंतर होणारी जाणीव म्हणजे उच्च भाव आणि त्या विभक्तीला पुन्हा जोडण्याचा प्रवास म्हणजे भक्ती.

पण हा विचार आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला जमायला काही जन्माचं पुण्य लागेल. म्हणून आपल्या सारख्या सामान्य जनांसाठी गुरू आशिष आणि नामस्मरण हा सर्वोत्तम मार्ग निर्माण करून, विश्वनियंत्याने अनंत उपकाराचं ओझं आपल्या शिरावर ठेवलं आहे. हे उपकार फेडायचे असतील तर इतकं उपाय, तो म्हणजे नाम घेणं.  हा सर्वात सोप्पा मार्ग वा हे सर्वात सहज सुलभ साधन, आत्मसात करणं इतकंच या जन्माचं आपलं श्रेय आहे.

कारण बाकी सर्व ते नाम करेल. मुळात यात खरतर सबबी नकोत. तरीही काही लोकं यातसुद्धा सबबी सांगून न घेण्यासाठी प्रवृत्त होतात. मला स्वतःला आजपर्यंत एकही संयुक्तिक कारण सापडत नाही, नाम न घेण्याचं. एकच कारण असलं तर ते म्हणजे इच्छेचा अभाव. तुमच्यासमोर ताट वाढलंय, तुम्हाला अन्नाची जरुरी आहे तरीही न जेवायचा निर्णय तुमचा असेल तर त्याला काही इलाज नाही.

दृढ इच्छेने जिथे आहात तिथेच, फक्त जिव्हा हलवून नाम घ्यायचं आहे. सुरवातीला नक्कीच प्रयत्नपूर्वक करावं लागेल. पण एक विचार करा की आयुष्यात इतकं काही शिकलेले आपण, अगदी लिहा वाचायलासुद्धा न येणारे, आज घडा घडा बोलू शकतो एखाद्या विषयावर, लिहू शकतो, इतकंच काय शिकवू शकतो, तर मग इतकं सोप्प, जे फक्त जिव्हेने सुरू करायचं आहे ते मात्र करत नाही हा दोष कुणाचा.

अर्थात नाम घेतलं म्हणजे लगेच सर्व सुरळीत होईल अशातला भाग नाही. परंतु या कर्मभोगातून बाहेर पडण्याच्या द्वाराची कडी आपण काढून ते द्वार उघडणं आपल्या हाती आहे. पुढे आपले सद्गुरू पावलोपावली त्या नामाची चिंता वाहतात. त्यांना त्यांचं हे कार्य करण्यासाठी आपण फक्त एक नाम घेत राहून,  त्यांच्या कृपासान्निध्यात बसून राहणं, इतकंच आपलं कर्म आहे व  नाम हेच मर्म आणि धर्म आहे.

आधी नामधारक असलेला नन्तर साधक कधी होतो त्यालाही कळणार नाही. त्या त्या पायरीवर सद्गुरू आपसूक आपल्या शिष्याला पोचवत असतात, त्याच्या त्याच्या साधनेनुसार. पण नाम, श्रद्धा व सद्गुरू यांवरील निष्ठा कधीही ढळणार नाही याची काळजी आपणच घेतली पाहिजे. नाम, नीती आणि निष्ठा या तीन त्रयीच्या आधारावर माणूस बऱ्याच कठीणतम गोष्टी सहजसाध्य करू शकतो. मात्र सातत्य हवं आणि ते टिकवणं आपलं कर्तव्य आहे.  

निष्ठेच्या आड येणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे चिंता व काळजी. म्हणून काळजी न करता आणि देहाच्या व मनाच्या कोणत्याही अवस्थेत नाम घेत राहून स्वतःला तारत राहणं प्रत्येकाचं काम आहे. चिंता आणि व्यथा या जणूकाही जन्माचाच भाग असल्यासारख्या पाठीशी असतात. परंतु आलेले दुःखाचे प्रसंग, भोग, कष्ट हे सर्व निजकर्माचे फलित आहे आणि कर्मरत माणसाला फलप्राप्ती ही होतच राहणार. ते टाळणं आपल्या हाती नाही. म्हणून त्या दुःखातून वा भोगातून बाहेर येण्यासाठी आणि मनाला पुनः उभारी देण्यासाठी अत्यंत जरुरी सूत्र म्हणजे नाम. 

 पुढील भागात बघूया. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०२/०१/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...