Skip to main content

मृदुलकरांनी छेडीत तारा ४

मृदुलकरांनी छेडीत तारा ४

मृदुलकरांनी छेडीत तारा
स्मरते रुप हरीचे मीरा

कमलदलापरी मिटल्या अधरी
नाम मनोहर खुलता श्रीहरी
हर्षभराने तनुलतिकेवरी
पडती अमृतधारा

कालिंदीच्या नीलजलापरी
हृदयी वाहे भक्ती हसरी
तन्मयतेच्या कुंजवनी तीरी
फुलवी प्रीत फुलोरा

सालस भोळी थोर मनाची
मीरा दासी प्रभूचरणाची
मिटल्या  नयनी धुंद मनाची
रंगवी हसरी मथुरा

गीत : रमेश अणावकर
संगीत : दशरथ पुजारी
गायिका : सुमन कल्याणपूर

कालिंदी नदी अर्थात यमुना हे जीचं प्रसिद्ध पावलेल नाव. ही नदी खरतर मथुरा गोकुळ या परिसरात वाहताना तीच पाणी, किंवा प्रवाह वा पात्र काळ्या रंगाचं आहे. पण ते जिथून उगम
पावतं त्या हिमालयातील कलिंद पर्वतावर आणि तिथून खाली येई पर्यंत ते शुद्ध अर्थातच निळ्या रंगाचं असतं.  हा निळा रंग पाणी जितकं शुद्ध, स्वच्छ आणि शांत असेल तितका नितळ असतो.  कदाचित एक सात्विक भाव पण यातून जाणवतो. जस जशी ती माणसांच्या वा मानवी वस्तीच्या जवळ जवळ येते तस तसा तिच्या प्रवाहात अशुद्धता येत जातो.

हाच नियम माणसाला लागू होतो. ज्यावेळी आणि जिथपर्यंत बाहेरील जगाशी त्याचा संयोग येत वा होत  नाही, तोपर्यंत त्यातील शुद्ध भाव , सत्व, त्रिगुणापार आणि सगुणापलिकडे असलेली सात्त्विकता टिकून असते. बाह्य जगाशी संपर्क येत असताना ती हळू हळू जड जगाच्या व्यापात हरवत हरवत जाते. ती टिकते फक्त आणि फक्त भक्तिमार्गाने. अश्या शुद्ध सात्विक निळ्याशार कालिंदीच्या जलासम असलेली सात्विक भक्ती मीरेच्या हृदयात अविरत वहात आहे. ह्या भक्तीला , ती निष्कलंक आणि निरपेक्ष असल्यामुळे ती सकारात्मक आणि सतत, नित्य प्रवाही पण शांत असल्यामुळे हसरी म्हणजेच आनंद वाटत जाणारी , आपल्यात इतरांना सामील करून घेत जाणारी आहे. त्याअर्थी गीतकार हसरी हा शब्द मुद्दाम योजतो.

निरामय भक्तीत रत झालेला कोणताही आत्मा हा एकाग्रचित्त एकांतात रमणारा, चित्त स्थिर असणारा, वृत्ती शांत, संयत व अविचल असणारा असतो. मीरेच्या बाबत ती हरीमय असल्यामुळे श्रीकृष्णांच आवडत स्थान कुंजवन अर्थात वृंदावन जिथे वृक्ष, वेली फुलं यांचं वन, जिथे  राधा कृष्णाच्या भक्तीत हरवून जायची. अश्या एकाग्रतेच्या निबिड वनात, म्हणजेच अतुलनीय भक्तीच्या परमानंदी लीन झालेली मीरा सतत श्रीकृष्णाला मनातल्या कुंजवनात बघायची.

त्या कुंजवनात हरवून गेल्यानन्तर फक्त ती, श्रीकृष्ण आणि कृष्णाचं भक्तिमय प्रेम याचंच आराधन करायची. संपूर्ण आयुष्य कृष्णमय केल्यानन्तर आणि जड देहाशी आणि जगाशी जगण्यापूरता संबंध उरल्यानन्तर श्रीकृष्ण आणि त्याची भक्ती यात एकरूप झालेली मीरा त्या प्रेम व भक्ती प्रवाहात आयुष्यभर त्याच नामाच्या आनंदात रत राहिली.

मीरेबद्दल खूप लहानपणी दिवाळीअंकात वाचलेली कथा थोडक्यात अशी की जन्म समाप्ती नन्तर स्वर्गात एकदा श्रीकृष्ण व राधा यांची चर्चा चालू होती. त्यावेळी राधा श्रीकृष्णाला म्हणाली की तू स्वतः श्रीकृष्ण आहेस आणि तुलाच सर्वजण भजतात, पूजतात.  तुला आमचा विरह कळणार नाही. तो तेंव्हाच कळेल ज्यावेळी तू स्वतः मानवजन्म स्वीकारून तू कृष्ण आहेस हे सर्व विसरून फक्त कृष्णाची म्हणजेच निर्गुणाची आराधना,  उपासना , भक्ती करशील आणि एका एका दर्शनासाठी व्याकुळ होशील त्यावेळी कदाचित तुला आमचा विरह कळेल.

म्हणून तिथल्या तिथे कृष्णाने राधेला पृथ्वीवर स्रीजन्म घेऊन देवरूपातील श्रीकृष्ण याची भक्ती , उपासना करीन, राधे तुझ्यासाठी मी एक मानव जन्म ईश्वरप्राप्तीसाठी जगून बघेन आणि मगच तुला समजून घेईन अस वचन दिलं.  हाच तो मीरेचा जन्म जो राधेसाठी स्वतः श्रीकृष्ण जगून विरहाच्या अग्नीत, भक्तीचा दीप लावून जगले, सहन केल, दुःख सोसले, दारोदार भटकले, फक्त आपल्या राधेसाठी, तिची तन्मयता, तिची भक्ती  जाणण्यासाठी, तिचा विरह जगण्यासाठी. यात कृष्णाने अजून एक साध्य केलं की, तो राधेसाठी काहीही करू शकतो.

क्रमशः
५ वा भाग अंतिम असेल

© लेखन : प्रसन्न आठवले
२३/१०/२०१८

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...