Skip to main content

गीत - ऊठ महागणपती २


गीत - ऊठ महागणपती २

तुझ्या कांतिसम रक्तपताका पूर्वदिशी फडकती
अरुण उगवला, प्रभात झाली, ऊठ महागणपती ll धृ ll

सूर्याआधी दर्शन घ्यावे तुझे मूषकध्वजा
सुभद सुमंगल सर्वाआधी तुझी पाद्यपूजा
छेडुनि वीणा जागविते तुज सरस्वती भगवती ll १ ll

आवडती तुज म्हणुनि आणिली रक्तवर्ण कमळे
पांचमण्याच्या किरणांसम ही हिरवी दुर्वादळे
उभ्या ठाकल्या चवदा विद्या घेउनिया आरती ll ३ ll

शुर्पकर्णका, ऊठ गजमुखा, उठी रे मोरेश्वरा
तिन्ही जगांचा तुच नियंता, विश्वासी आसरा
तुझ्या दर्शना अधीर देवा हर, ब्रम्हा,  श्रीपती ll ४ ll 

गीत - ग. दि. माडगूळकर, संगीत - स्नेहल भाटकर
स्वर - सुमन कल्याणपूर, चित्रपट :  अन्नपूर्णा , राग : भूप देसकार 

निजताना देवाला शेजारती आणि पहाटेच्या प्रहरी देवाला जागं करण्यासाठी भूपाळी म्हटली जाते.  भूप राग हासुद्ध खास पहाटेच्या वेळी गायला जाणारा राग आहे.  त्याच भूप रागात बांधलेली ही भूपाळी ऐकताना पहाटेचं शांत , प्रसन्न वातावरण , पहाटेच धुकं, दव, सडासारवण या साऱ्याची अनुभूती देणार गीत, त्याचं समर्पक संगीत आणि सुमनताईंचा दैवी आवाज, हे सर्व कमी म्हणून की काय पुरणाच्या पोळीवर तुपाची धार धरावी तसा सुलोचनाताईंचा सोज्वळ सात्विक भाव ते नऊवारी साडीतील पहाटेच्या मंगल समयी झाडून घेत सडा सारवण करणं आणि सुयोग्य चित्रित केलेलं धुक्याचं गडद वातावरण या सर्वांची मोहिनी आजसुद्धा जेंव्हा जेंव्हा हे गीत आपण बघतो, तेंव्हा तेंव्हा आपल्याला जाणवतं. 

देवाला जागं करणं खरतर संकल्पना अनाकलनीय आहे. कारण मुळात जो निर्गुण निराकार आहे आणि जो चराचराच्या
पलीकडे आहे, जो अचिंत्य आहे, जो झोपत  नाही त्यामुळे जागा होण्याचा प्रश्नच नाही. पण एकदा निर्गुणाला सगुणात साकार केला मानवी मनाने, श्रद्धेने की मग मानवी भावात आणि मानवाच्या सर्व अवस्थात तो देवाला त्याच स्वरूपात बघतो , सजवतो, पारखतो. ज्या अवस्थेत तो स्वतः वावरतो त्याच अवस्थेत तो देवाला बाहतो. म्हणून श्रद्धेने तो मनात स्व देवात बघतो. 

याच कारणाने निजणे, जागे होणे, नैवेद्य रुपात भोजन घेणे या गोष्टी देवाला भावतात ह्याच श्रद्धेने पहाटे शुचिर्भूत होण्या पासून ते स्नानसंध्या उरकून देवाची पूजाअर्चा करण्यापर्यंत सर्व श्रद्धापूर्वक करतो. यात मी हा  मी राहातच नाही, तर तो ज्यारूपाकडे पाहून, ज्याचे ध्यान धरून नित्य भजतो त्या स्वरूपात काही क्षण का होईना रममाण होतो. हेच ध्यान, हीच समाधी, फक्त क्षणिक. 

अश्याच स्वरूपाचे भाव व्यक्त केलेले हे गणेशाचं स्तुती गीत आहे, भूपाळी गात गात देवाला जागवणारी एक साध्वी हे गीत म्हणते. जो अनेकरूपात, रंगात सजलेला आहे अश्या गणेशाचं एक रूप हे रक्तवर्णी आहे. ज्या रक्तवर्णी पुष्पांच आकर्षण प्रत्यक्ष गणेशाला आहे, त्याच वर्णाचं त्याच स्वरूप आहे. अश्याच वर्णाच्या म्हणजेच रक्तवर्णाच्या पताका आकाशात पूर्वेला झळकायला लागल्या आहेत. आता निशेचा अंत जहालेला आहे, आता प्राची या केशरयुक्त रक्तवर्णात न्हाऊन तयार झालेली आहे. पूर्वदिशेचा स्वामी अर्थात दाही दिशांवर ज्याचं अनभिषिक्त राज्य आहे , असा रविराज अर्थात अरुण हा उगवला आहे प्रभात समय झाला आहे आणि अश्या वेळी हे महागणपती तुंही जागा हो. 

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले 
३०/१०/२०१८

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...