Skip to main content

मृदुलकरांनी छेडीत तारा ५ व अंतिम

मृदुलकरांनी छेडीत तारा ५ व अंतिम

मृदुलकरांनी छेडीत तारा
स्मरते रुप हरीचे मीरा
कडवं ३
सालस भोळी थोर मनाची
मीरा दासी प्रभूचरणाची
मिटल्या  नयनी धुंद मनाची
रंगवी हसरी मथुरा

गीत : रमेश अणावकर
संगीत : दशरथ पुजारी
गायिका : सुमन कल्याणपूर

या गाण्याबद्दल अजून एक किस्सा फेसबुक वरील माधव गोखले काका यांनी पहिल्या भागात कंमेंटमध्ये लिहिला होता. तो सर्वांसाठी देत आहे. या गाण्याचं रेकॉर्डिंग चालू असताना बाहेर ओ पी नय्यर आणि आशाताई बसले होते. कारण त्यांनतर त्यांच्या गाण्यांचं रेकॉर्डिंग होत. गाणं चालू असताना ओ पीनी आशाताईंना विचारलं कोण गातय. ताईंनी सांगितलं की या सुमन कल्याणपूर आहेत. अर्थातच ओ पी नी बाहेर आल्यानन्तर सुमनताईंच भरभरून कौतुक केलं.

मुळात या गीताची रचना मीरा तिची भक्ती, त्याच प्रतीक एकतारा, त्या एकतारीवर हरिनामाचा ती करत असलेला जप, स्मरण याविषयी सांगण्यासाठी करण्यात आलेली आहे. स्मरते रूप हरीचे मीरा अस खरतर धाडसाने म्हटलंय. कारण जिथे विस्मरण आहे तिथेच स्मरणाचा प्रश्न येतो. जिथे स्व त्यागून, देह विसरून फक्त कृष्ण लक्षात आहे, तिथे वेगळं स्मरण करण्याचा वास्तविक प्रश्न येत  नाही.

त्यात कृष्ण हा गतजन्मीच्या कुठल्या अनन्य योगाने मिळाला हे कृष्ण आणि मीरा दोघेच जाणतात.  ज्या मीरेने द्वैत अद्वैत या कोणत्याही प्रश्नात न पडता फक्त कृष्ण आणि त्याच नाव हेच आपलं ध्येय मानलं , तिथे स्मरण विस्मरणाची चिंता आपल्या सारख्या सामान्य जनांना.  भक्त म्हणून मीरा आणि भगवंत म्हणून कृष्ण हे केंव्हाच एकरूप झालेत. तरीही हे गीत एका तटस्थ भावाने स्वतः मीरा म्हणते आहे ही भावना किंवा हा भाव सतत जाणवतो वा जाणवत राहतो.  शेवटच्या कडव्यात मात्र हा भाव थोडासा वेगळा वाटतो. ही माझी कवी कल्पना आहे की, कदाचित तिची एकतारीच तिच्याबद्दल आपल्याला सांगत आहे वा असावी.

भक्तीच्या अत्युच्च पदी पोचलेली मीरा , किंवा कोणताही भक्त हा भोळा म्हणजे स्व आणि पर यांच्यातील भेद न जाणणारा, किंवा त्या भेदापलीकडे गेलेला, सगळीकडे भगवंतांच अस्तित्व पाहणारा वा जाणणारा हा असतोच असतो. त्यांना भेदाभेद माहीतच नसतो. तो भोळा भाव त्याच्या ठायी पूर्ण भरून राहिलेला असतो. किंबहुना जलाने  पूर्ण भरलेला एकदा प्याला जसा असतो, तिथे तिळमात्र एका थेंबालासुद्धा जागा वा वाव नसतो, त्याप्रमाणे भक्तीच्या अत्युच्च शिखरी असलेली मीरा ही सालस (प्रभुवर निर्व्याज, निरलस व निष्कलंक प्रेम करणारी),  भोळी अर्थात  कोणताही आपपर भाव न जाणणारी, विष व अमृत यात फरक न मानणारी अशी आहे  आणि त्याअर्थी ती अत्यन्त थोर मनाची आहे, कारण प्रत्यक्ष विषाचा प्याला ज्यांनी दिला त्या दिराबद्दल सुद्धा कोणताही किंतू सुद्धा मनात नाही तिच्या.

भक्तीच्या अनेक मार्गांपैकी वा उपासनेच्या अनेक मार्गांपैकी सर्वात श्रेष्ठ दास्यभक्ती आहे.  या मार्गाने गेलेले थोर उपासक नारद, हनुमंत ,  मीरा, समर्थ रामदास हे खूप अत्युच्च पदाला पोचलेले आणि तरीही स्वतःला शेवटपर्यंत दास मानणारे, पण संत परंपरेत अत्युच्च स्थान प्राप्त केलेले आहेत. म्हणून मीरा सुद्धा स्वतःला प्रभू श्रीकृष्ण यांच्या चरणांची दासी समजते खरतर तीचं स्थान हे केंव्हाही श्रीकृष्णाच्या हृदयात आहे.

अशी ही दास्यत्व पत्करून भक्ती करणारी मीरा नित्य प्रभुनामात रत असलेली आणि मनाने धुंद अर्थात एकाग्र असलेली, नामात श्रीकृष्ण आणि त्याची लाडकी मथुरा नगरीच पहात असते, कायम वृंदावनात कृष्णाला समोर बसवून फक्त त्याला हृदयात साठवण्याचा प्रयत्न करते , पण तिची नामाची भूक शांत होत नाही की कृष्णाची तिच्याकडून नाम ऐकण्याची इच्छा तृप्त होत नाही.  भक्त आणि भगवन्त दोघेही अतृप्त ही भक्तीची सर्वोच्च अवस्था आहे, बाकी मुक्ती वेगळी काय आहे. संतांनी तेच म्हटलंय ना मन नामात रंगू दे आणि तु मला नामात रत पाहून पुन्हा पुन्हा पहावस वाटुदे.  मी तुझं नाव घेतोय तू मला पाहतोयस बस अजून मोक्ष नको देवा.  हीच मीरेची अंतिम अवस्था मीरा, वृंदावन, कृष्ण आणि कृष्णाचं नाव मीरेच्या ओठावर इतकंच, याहून काय हवं होतं मीरेला. 

© लेखन : प्रसन्न आठवले
२४/१०/२०१८

पुढील गीत तुझ्या कांतीसम रक्तपताका पूर्वदिशी झलकती .............उठ महागणपती

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...