Skip to main content

गीत - ऊठ महागणपती १ 


गीत - ऊठ महागणपती १ 

तुझ्या कांतिसम रक्तपताका पूर्वदिशी फडकती
अरुण उगवला, प्रभात झाली, ऊठ महागणपती ll धृ ll

सूर्याआधी दर्शन घ्यावे तुझे मूषकध्वजा
सुभद सुमंगल सर्वाआधी तुझी पाद्यपूजा
छेडुनि वीणा जागविते तुज सरस्वती भगवती ll १ ll

आवडती तुज म्हणुनि आणिली रक्तवर्ण कमळे
पांचमण्याच्या किरणांसम ही हिरवी दुर्वादळे
उभ्या ठाकल्या चवदा विद्या घेउनिया आरती ll ३ ll

शुर्पकर्णका, ऊठ गजमुखा, उठी रे मोरेश्वरा
तिन्ही जगांचा तुच नियंता, विश्वासी आसरा
तुझ्या दर्शना अधीर देवा हर, ब्रम्हा,  श्रीपती ll ४ ll 

गीत - ग. दि. माडगूळकर, संगीत - स्नेहल भाटकर
स्वर - सुमन कल्याणपूर, चित्रपट :  अन्नपूर्णा , राग : भूप देसकार 

ओम् नमोजी आद्या , वेदप्रतिपाद्या , जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा ll देवा तूचि गणेशु , सकल मती प्रकाशु, , म्हणे निवृत्तीदासू अवधारिजो जी ll 

संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊली ज्ञानेश्वरीच्या सुरवातीला आद्यपूजेचा, अग्रपूजेचा मान असलेल्या श्रीगजानन अर्थातच सर्वांचा लाडका , जो देव या संज्ञेपलीकडे आहे, म्हणजेच ज्याचं स्थान विश्वाचीसुद्धा आधी आहे आणि विशेष करून जो मराठी हृदयाच्या सर्वात जवळ आहे अश्या बाप्पाबद्दल लिहितात तेंव्हा त्या लेखणीच्या शाईला फुटलेला प्रेमाचा, भक्तीचा , आत्मीयतेचा अंकुर आणि भगवंताच्या जाणिवेचा आनंद आपल्या ह्रुदयापर्यंत पोहोचतो. कारण दहा दिवस वर्षातून एकदा तो घरी येत असल्यामुळे असलेला जिव्हाळा ही आपली अमूल्य ठेव आहे. 

अश्या विश्वरूप चैतन्यमय शक्तीबद्दल आणि विशेषकरून विद्येचा अधिष्ठाता अश्या श्रीगजाननाबद्दल लिहिताना गदिमांची लेखणी पावन, पुनीत आणि कृतकृत्य झाल्याचं जाणवतं. अन्नपूर्णा चित्रपटातील हे गीत मराठी मनाच्या अंतरात्म्यात कोरलंय. खरतर या गीताबद्दल लिहायला घेतलं त्यावेळी शब्द सापडतील का ही धास्ती होती. कारण सर्व शब्दांचा आद्य आणि कारक जो श्रीगणेश त्यांच्यावरील गीतावर लिहायचय. पण मग विचार केला की, तोच स्तुती करून घेईल स्वतःची जशी गदिमांकडून या गीतात लिहून घेतली. 

अद्भुतरम्य रसाची पखरण हिरव्यागार गवतावर व्हावी आणि त्यावर आपण पहुडावं असा काहीसा अनुभव गदिमाया गीतात आपल्याला देतात, बघूया पुढील भागापासून 

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले 
२९/१०/२०१८

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...