भोग आणि ईश्वर ५५१ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
आपण अनेकदा योगायोग या संज्ञेखाली अनेक गोष्टी ऐकल्या असतील किंवा वाचल्या असतील. कदाचित आपल्या स्वतःच्या आयुष्यात त्या अनुभवल्या सुद्धा असतील. ज्यामुळे आपलं एखादं न होणारं काम होतं. किंवा ध्यानीमनी नसताना एखाद्या व्यक्तीची अचानक भेट होऊन, अडलेलं वा अडकलेलं एखादं जुनं काम, चुटकीसरशी होऊन, आपण स्वतः आश्चर्यचकित होतो. कारण ते होईल असं कधी वाटलेलं नसतं.
त्यामुळे, ते झाल्यावर, सर्वात प्रथम हा विचार मनात येतो की, जर हे इतकं सहज आणि सोप्पं होतं तर, मग इतके दिवस का अडलं आणि इतके दिवस असलेलं होतं तर इतक्या सहज.झालं कसं. याच्या उत्तराचे दोन भाग होतील. एक म्हणजे प्रत्येक गोष्ट ही तिच्या निहित अर्थात योजलेल्या वेळीच होते. दुसरं, ही निहित वेळ आपली पूर्वकर्म आणि ईश्वरी वा सद्गुरू कृपा यांच्या सहाय्याने शक्य झालं.
मग योग म्हणजे ते कर्म घडण्याची वेळ जर असेल तर, अशी कृपा होऊन, योग्य व्यक्ती भेटून, तिच्या माध्यमातून आपला कार्य यशस्वी होणं. यात एका गोष्टीची सहाय्यता आपल्याला प्रत्येक कर्मात गरजेची असते. ती म्हणजे पूर्वकर्मातील एखादी चांगली गोष्ट वा चांगलं कर्म अश्या योग्यवेळी फलद्रूप होणं, हा ईश्वरी कृपेचा भाग आहे. कारण अनेक कर्माच्या गुंत्यातून, योग्य कर्म निवडून, तेच अश्या बिकट प्रसंगात, कामी आणणं, हे एखाद्या तज्ञ वा जाणकार शक्तीचं कार्य आहे.
अशी तज्ञ जाणकार शक्ती एकमात्र या जगतात, आरंभ ते आता इथपर्यंत आहे आणि कल्पांता पर्यंतअसेल. पण हा ताळमेळ कसा लागत असेल,हे देखील जाणणं आवश्यक आहे. सिस्टिम म्हणाल तर महद आश्चर्य वाटेल की, कोणतीही लिखापढी अस्तित्वात नाही. पण आत्म्याच्या प्रथम जन्मापासून ते अगदी आताच्या क्षणापर्यंतचा हिशोब कोण ठेवणं. योग्यवेळी योग्य कर्माचं बीज फलरूप होऊन, ते समोर येणं.
यातही महत्वाची गोष्ट ही की, यामधे कोणताही भेदभाव होत नाही. कोणाला कमी वा कोणाला जास्तं, असं होत नाही. कोणाचा हिशोब चुकला किंवा एखाद्या कर्माचं फल हे क्ष व्यक्ती ऐवजी ह या व्यक्तीला मिळालं, असं कधीच होत नाही. मग अश्या स्थितीत आपल्याच योग्य कर्माचा मोबदला, अचूक वेळी, विशेषतः, ज्यावेळी आपण अडचणीत असतो, त्यावेळीच ते समोर येणं, हा योगायोग असू शकत नाही.
ही सांगड घालणं, हे या अजब शक्तीच कार्य आहे. म्हणजेच जी व्यक्ती एखाद्या चांगल्या कर्माची धनी असेल, परिस्थितीने गांजलेली असेल, पण त्या क्षणी ती एखाद्या कृपेची आवश्यकता असेल आणि त्या व्यक्तीच्या पुण्यप्रभावात तश्या कृपेची सोय, त्या व्यक्तीच्या साधनेने, भक्तीने त्या व्यक्तीने, आपल्या पूर्व कर्माने लिहून ठेवली असेल, तर त्या शक्तीला, त्या व्यक्तीला, त्या योगाप्रत न्यावच लागतं. किंवा ती शक्ती ते कार्य घडवून आणते.
यावर अजूनही विवेचन उद्याच्या भागात करूया. तोपर्यंत नामाने स्वहित साधण्याचा प्रयत्न करूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०४/०६/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment