भोग आणि ईश्वर ५६३ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
देहा देहातून प्रवास करणारा आत्मा, देहाची अवस्था, मनाचा विषयाकडे असणारा ओढा व धाव, ती साध्य करण्यासाठी, देह बुद्धी व मन यांची चढाओढ, त्यामुळे समोर आलेलं अनिष्ट दुःखकारक व भोगात्मक फल यांच्या वेष्टनात, अशुद्ध झालेला, स्वत्व हरवलेला आत्मा निराशेने आणि मनात तीच खिन्नता घेऊन, देह त्यागतो. देह त्यागून आत्मा अश्या देहाच्या प्रतीक्षेत फिरतो, ज्यामुळे, आत्म्याची शुद्धता होऊन, पुढील हेतू साध्य होऊ शकेल. पण हीसुद्धा एक शक्यता किंवा इच्छा असते.
पण मुळात आधीच्या अनेक देहात फिरत असताना, त्या त्या देहातील मन, बुद्धी व देह यांच्या विकाराने अशुद्ध तत्व प्राप्त झालेला आत्मा, खरतर, योग्य संधी मिळण्या साठी कृपा प्राप्तीच्या अपेक्षेत असतो. कारण मनाची शुद्धता आणि मग त्याद्वारे आत्मशुध्दी साधून, योग्य मार्गाकडे जायला, भोग व उपभोग ही मालिका संपावी लागते. तशी ती संपण्यासाठी, काही जन्मातील पुण्याची जोडणी असावी लागते, किंवा कृपा प्राप्ती व्हावी लागते.
कृपा प्राप्ती योग, हा पात्र किंवा अपात्र दोन्ही प्रकारच्या व्यक्तींना साध्य होऊ शकतो. त्यासाठी सद्गुरूंच्या मार्गात मात्र येणं आवश्यक आहे. याबाबतची अनेक उदाहरणं, देता येतील. पण सर्वात उत्तम उदाहरण जे देता येईल, ते म्हणजे वाल्याचा वाल्मिकी महर्षी होणं. वरील घटनेत, वाल्या कोळ्याची, शुद्ध होण्याची, मोक्ष मुक्ती प्राप्त करण्याची कोणतीही इच्छा नसताना, मात्र आणि मात्र देवर्षी नारद यांच्या कृपाशीर्वादाने, दीक्षा मंत्र प्राप्त होऊन, त्याच्या अखंड जापाने, देहशुद्धी, चित्तशुद्धी आणि आत्म शुद्धी साधून, देह, मन व आत्मा ईश्वराच्या कृपेचा धनी झाला.
पण त्याआधी देवर्षी नारदमुनींनी, त्या देहातील आत्म्याला ही जाणीव करून दिली की, तुझ्या कर्माचे भोग, तुझे तुलाच भोगायचे आहेत. ज्यांना आपलं मानून तू हे सर्व देहधर्म करत आहेस, त्यातील कोणीही, या पापाचे किंवा पापकर्माचे भागीदार होऊ शकत नाहीत. हे वास्तव दाखवून, देवर्षी नारदमुनींनी, त्या अजाण, अज्ञान, अशुद्ध देहातील आत्मा जागा केला. तो एकदा जागा झाला की, पुढील कार्य हे आपसूकपणें घडून येतं. याच साठी सद्गुरू कृपेची आवश्यकता असते.
हाच प्रयत्न सद्गुरू, प्रत्येक साधक भक्ता बाबत, करू इच्छितात. अश्या परम दयाळू, कृपावंत सद्गुरूंच्या सानिध्यात राहून, सांसारिक व प्रापंचिक गरजांबाबत, काही मागणं, म्हणजे किती मोठा करंटेपणा आहे, हे कदाचित ध्यानात येईल. कारण प्रपंच व संसार हा साध्य नसून साधन आहे, ईश्वरीय मार्गावर पुढे जाण्यासाठी आहे. परंतु आपण, त्यासाठी काही न मागून, आपल्या मनाचा व बुद्धीचा कोतेपणा दाखवून, अवलक्षण करून घेतो. वास्तविक वाल्या कोळ्याला आपल्या सांसारिक गरजेसाठी किंवा उदरनिर्वाहासाठी काही मागता येणं व नारद मुनींना ते देणं अगदीच अशक्य नव्हतं. पण देवर्षी नारद यांनी तो योग वा ती वेळ येऊच दिली नाही. ही सद्गुरू कृपा.
म्हणून सद्गुरू कृपेसाठी, त्यातून आत्म्याच्या शुद्धतेसाठी आणि पुढील प्रत्येक जन्मात आत्मा असाच, इच्छित मार्गावर पुढे पुढे जाण्यासाठी काय काय करावे, यावर उद्याच्या भागात चर्चा करूया आणि नामाचा हात घट्ट धरून ठेवूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१६/०६/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment