भोग आणि ईश्वर ३३१
आपलं शरीर थकल्यावर आराम वा विश्रांती हे आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे व्यायाम हा देहाची शक्ती,लवचिकता, ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे. याप्रमाणे न केल्यास, देहाची लवचिकता कमी होऊन, एका ठराविक वयानंतर ऊर्जा, उत्साह व शक्ती कमी होऊ शकते. यासाठी शरीराला आराम आणि व्यायाम दोन्ही आवश्यक आहे. आराम केल्याने, शरीराची झालेली झीज भरून निघू शकते, थकलेल्या शरीराला पुनः ऊर्जा प्राप्त होते आणि व्यायामाने ऊर्जा टिकवून लवचिकता प्राप्त होते आणि प्राप्त झालेली टिकून त्यात वाढ होते.
हे सर्व शरीराचं आहे. पण देहातील अजून एक महत्वाचा अवयव म्हणजे मेंदू आणि एक इंद्रिय म्हणजे मन, यांना देखील पुरेसा आराम व व्यायाम आवश्यक आहे. तो तसा न मिळाल्यास वा न दिला गेल्यास, नैराश्य,नकारात्मकता आणि थकवा मनाला व मेंदूला सुद्धा जाणवतो. त्यासाठी या दोन्हीना आपण पुरेसा व्यायाम व विश्रांती दिली पाहिजे.
मुळात मनाला आणि मेंदूला एकाचवेळी विश्रांती कशी काय दिली जाते,यावर विचार करूया. यात दोन प्रकार आहेत, ज्यायोगे मनाला आणि मेंदूला आपण आवश्यक विश्रांती आणि पुरेसा व्यायाम देऊ शकतो. मनाला व मेंदूला विश्रांती देण्याचे खूप मोठे साधन म्हणजे, शांत बसून राहून, मनाला विचारातून बाहेर काढून स्थिर करणं. यावर, आपण नुकतीच काही भाग आधी विस्तृतपणे चर्चा केली आहे. म्हणून त्यावर इथे पुन्हा चर्चा नको. तरीही इतकंच सांगीन की, मनाला शांत करत गेल्यास, एकप्रकारे विश्रांती मिळून, मनाला पुन्हा उपयुक्त ऊर्जा व चैतन्य प्राप्त होते.
पण अनेक विचारातून,मनाला येणारी मरगळ, निराशा इत्यादी दूर होण्यासाठी, बरेचदा शांत बसण्याचा सराव नसेल तर, ते न जमता, आनंदाऐवजी त्रासच होऊ शकतो कारण आपण मनाला शांत करण्याच्या नादात, विचारांना आवश्यकतेपेक्षा जास्त दाबून, त्यातून जास्त ताण निर्माण करू शकतो. यामुळे आरामापेक्षा त्रास होऊन, उलट परिणाम होऊ शकतो. म्हणून जर याची सवय नसेल तर सातत्याने अभ्यास करूनच,मनाला व त्याद्वारे मेंदूला पुरेशी विश्रांती, आपण देऊ शकतो.
पण मन हे प्रवाही असल्यामुळे, सतत काहिनाकाही विचार करत राहीलच. मग असा काही उपाय नाही का, ज्यायोगे विचार पण राहील आणि विश्रांती पण प्राप्त होईल. यासाठी आपण मनाचा व त्याद्वारे मेंदूचा अभ्यास केल्यास, लक्षात येईल, की मन हे शक्तीस्वरूप आहे आणि आतील वा बाहेरील विचाराने, ती शक्तिकेंद्रे उद्दीपित होऊन, त्या त्या विचारांच्या लहरी व तरंग तयार होऊन, पुढे त्याचे कार्यात व कर्मात रूपांतर होते.
याच गोष्टीचा वापर करून मनाला नैराश्य, नकारात्मकता यातून बाहेर काढून, विश्रांती व उर्जाप्राप्ती, दोन्ही साधता येते. मनात जशी, राग,लोभ, मोह, माया इत्यादींनी उद्दीपित होणारी केंद्रे आहेत, त्याचप्रमाणे प्रसन्नता, आल्हादता, उभारी इत्यादी देणारी शक्तिकेंद्रे सुद्धा आहेत. त्यांचा वापर करून, मनातील मरगळ दूर करता येते. यासाठी, ज्यावेळी किंवा ज्या ज्या वेळी अशी मरगळ किंवा नैराश्य मनाला ग्रासेल, त्या त्यावेळी, एखादा सकारात्मक विचार व उत्साहवर्धक कल्पना किंवा जुन्या प्रसन्न करणाऱ्या आठवणी मनात आणून, त्यामध्ये काही काळ मनाला गुंतवून ठेवावं.
या गोष्टी सहसा सहज वा मुद्दाम घडत नाहीत, कधीतरी आपण स्थिर असतो, त्यावेळी सहज घडणाऱ्या अश्या एखाद्या गोष्टीने, मनाला आवश्यक ऊर्जा, प्रेरणा व प्रसन्नता प्राप्त होते, हे आपण नक्कीच अनुभवलं असेल. आपल्याला तीच गोष्ट मुद्दाम, पण सकारात्मक परिणाम साधण्यासाठी घडवून आणायची आहे. यासाठी जेंव्हा नैराश्य, चिंता, काळजी व नकारात्मकता मनात घर करेल, त्या त्यावेळी या प्रयोगाचा अनुभव घेऊन लाभ करून घेऊ शकता. याच्या प्रयोगावर आपण विस्तृतपणे उद्या चिंतन करूया. पण तोपर्यंत नामातून सकारात्मक तेचा अनुभव व अनुभूती घेत राहूया.
भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पेमेंटसाठी नं. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२६०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.
आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२७/१०/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment