भोग आणि ईश्वर ३२५
माझ्या पोस्टला माझ्या नावासकट पुढे नेण्याला माझी काहीही हरकत नाही.
आधीच्या जन्मातून या जन्मात स्वभाव वागणूक ही मिळकत स्वरूपात, प्रारंभीची बाकी अर्थात opening balance म्हणजेच, संचित रुपात प्राप्त होते आणि जीवनाची सुरवात, त्याप्रमाणे होते. म्हणूनच आपण बघितलं असेल की एखादं मूल रडकं, चिडकं किंवा एखादं मूल शांत असतं. ही गर्भसंस्कारांची प्रचिती असेल पण तसे गर्भसंस्कार व्हावेत, हे त्या नवीन जीवाचं प्रारब्ध नक्कीच आहे.
पण हे जन्मतः प्राप्त संचित, असंच जन्मोजन्मी पुढे न्यायचं का. तर नक्कीच आवश्यकता नाही. यातून बाहेर पडण्यासाठी, तितकीच ऊर्जा व बळ जरुरी आहे हे मात्र नक्की. ज्यायोगे आपण प्रारब्धातून प्राप्त स्वभाव व मनाची जडणघडण बदलून, शांत, शीतल, निर्मळ मनाची प्राप्ती करून, पुढील आयुष्य सुखद करू शकतो. कुठलीही नवीन वा प्रवाहाविरुद्ध, एखादी गोष्ट करताना वा करायला सुरुवात करताना, त्यात पूर्ण श्रद्धा, विश्वास आणि संयम हे ओतून, पुढे जावं लागेल.
सर्वात प्रथम मनात हा दृढनिश्चय करणं गरजेचं आहे की, मला माझा स्वभाव व वागणूक ही, शांत व संयमी करायची आहे आणि विवेकाची कास धरायची आहे. म्हणजे इच्छा व त्या पाठिशी इच्छेचं बळ दृढ असावं. त्यानंतर मनाला शांत राहण्याची सवय करवून घेण्यासाठी स्थिर बसून राहण्याचा सराव करावा. यासाठी समोर एखादं लक्ष असावं, जे डोळ्यासमोर असेल. म्हणजे एखादं चित्र जे पाहताना मनाला शांत वाटेल आणि त्याच्याकडे पाहताना मनात कोणतेही इतर विचार, भाव व वासना जागृत होणार नाही.
असं चित्र एखाद्या देवाचं, फुलाचं असं कोणतंही निवडावं ज्यामुळे मन उद्दीपित न होता, शांत शांत होईल आणि मनाला आल्हाद प्राप्त होईल. कदाचित एखादी वाद्यधून, ओंकारा सारखा एखादा जाप वा नाद हे देखील चालू शकेल. आपल्या आवडीनुसार व मनाला शीतलता देऊ शकणारं अस कोणतंही चित्र वा एखादं लक्ष निवडून किंवा नादमय धून त्यावर मन एकाग्र करण्याचा अभ्यास सुरू करावा. यावेळी डोळ्यांना व त्यायोगे मनाला एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा. कोणत्याही छंद वा नाद याशिवाय मन असं एकाग्र होणं, मोठं कठीण काम आहे.
म्हणूनच जर चित्र असेल तर एखादं नाम किंवा ओम सारखा एखादा जाप मनातल्या मनात म्हणण्याचा प्रयत्न करावा. सुरवातीला अत्यंत कमी वेळ हे करण्याचा सराव करावा. कारण सुरवातीला मन तयार होणार नाही. बंडखोरी हा मनाचा मूळ स्वभावधर्म आहे. त्यामुळे सुरवात अत्यंत अल्प वेळेने सुरू करून , मग ती वेळ हळू हळू वाढवावी. अगदी एक ते दोन मिनिटं, इतक्या अल्प काळासाठी सुरवात करून, मग अर्धा ते एक मिनिटं वाढवत जावं. काही दिवसांच्या नित्य सरावाने साधारण आठ ते दहा मिनिटांपर्यंत एकाग्र होण्याचा प्रयत्न होईल. पण एकाग्रता येईलच, हे सांगता येणार नाही. पण यामध्ये निदान एका जागी बसण्याचा सराव जरी होऊ शकला आणि त्यात यश प्राप्त झाले तर मग पुढील स्थितीकडे वळता येईल.
सुरवातीला काही दिवस मन शरीराला, बुद्धीला स्थिर होण्या पासून परावृत्त करण्यासाठी अथक प्रयत्न करेल. विशेषतः ज्याचं मन अतिचंचल आहे, त्यांना हा त्रास जास्त होईल. त्यांनी अगदी अर्धा मिनिटं, इतक्या अल्प वेळेने सुरवात केली तरी चालेल. यामध्ये शरीराची बसण्याची सहजावस्था असावी. म्हणजे शरीरावर कोणताही तणाव, ताण पडणार नाही,याची काळजी घ्यावी. जी स्थिती आपल्याला विनाताणं, सहज काही काळ बसू देईल, अशी स्थिती निवडावी. एकदा विनाताणं बसण्याची योग्य स्थिती ठरली की अल्पकालीन अभ्यास सुरू करून, हळुहळु सराव वाढवत जावं.
यामध्ये, मन एकाग्र व्हायला, सोबत असलेली एखादी धून, नाद वा स्वर खूप उपयोगी येते. काहीजणांना डोळे उघडे ठेवण्यापेक्षा डोळे बंद ठेवून सराव करणं, जास्त सोयीस्कर वाटत असेल तर, चित्र वा फोटो न ठेवता, नुसतं आसनस्थ होऊन, पार्श्वभूमीवर एखादा नाद वा एखादी धून किंवा एखादा स्वर लावून, स्थिर होण्याचा अभ्यास करावा. हा सराव करण्याच्या काळात किंवा सराव सुरू केल्यानंतर, सरावाव्यतिरिक्त इतर सर्व जागृत वेळी मन प्रसन्न, प्रफुल्लित ठेवून, आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा. याप्रकारे काही दिवस प्रयत्न केल्यानंतर पुढे जाता येईल.
यापुढील स्थिती आपण उद्या पाहूया. पण नामातून मिळणारा आनंद घेत रहा.
भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पेमेंटसाठी नं. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२६०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.
आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२१/१०/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment