भोग आणि ईश्वर ३२९
आपण काल एक मोठं समीकरण पाहिलं की, प्रारब्ध योगाने आणि प्राप्त संचिताने, आपल्याला एखाद्या अनिष्ट कर्माच्या किंवा कर्मफलाच्या समोर नेलं जातं. त्यानंतर आपण त्यात अडकायचं की नाही हे आपण ठरवू शकतो का. तर साधनेतून प्राप्त विवेक, विचारमंथन आणि या दोन्हींच्या योगातून आलेली आत्मबलशक्ती, त्या क्षणी आपल्याला थांबवू पाहते. आपण ते ऐकायचं की नाही हे, संचितातील कर्माची शक्ती, आत्मबल, मायेचा प्रभाव हे सर्व मिळून जे तयार होईल, ते बल व ती ऊर्जा आपल्याला त्या क्षणी कार्यरत करून, निर्णयाप्रत नेते.
आता या सर्व जंजाळात वा गोंधळात आपण मतीभ्रष्ट, पथभ्रष्ट सहज होऊ शकतो. पण यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग नाही का. आहे, असा मार्ग नक्कीच आहे. या सर्व क्लिष्ट, इष्ट व अनिष्ट प्रसंगात वा निर्णयाच्या क्षणी सद्गुरुकृपेची प्रचंड ऊर्जा व शक्ती आपल्याला, योग्य निर्णयाकडे नेते. सद्गुरुकृपा ही सेवा आणि साधना यातून प्राप्त होते. या जगतात सांसारिक मार्गात व पारमार्थिक मार्गावर, उन्नती,योग्यायोग्य निर्णय, आवश्यक आत्मबल प्राप्त करणे, प्राप्त केलेले टिकवून धरणे, प्राप्त करून टिकलेले, योग्य क्षणी आठवणे आणि कामाला येणे, हे सर्व सद्गुरुकृपेच्या प्रभावाने साध्य होते.
यासाठी काही उत्तम दाखले बघूया म्हणजे याबाबतची कोणतीही शंका राहणार नाही. यातील एक मोठं उदाहरण म्हणजे महाभारतातील कर्ण. ज्याला त्याचे गुरू भगवान श्री परशुराम यांनी दिलेला, प्राप्त केलेली विद्या योग्य क्षणी विसरण्याचा शाप हे, प्रारब्धात त्याने प्राप्त केलेली, धनुर्विद्या व अस्त्रांचं ज्ञान, अंतिम युद्धातील योग्य क्षणी उपयोगात न आल्याने, कर्माच्या सर्व फलांना तो पारखा झाला. म्हणजे एका कर्माने घडलेली सद्गुरू अवकृपा, अनेक कर्माने व कर्मनिष्ठेने, प्राप्त विद्या अकार्यक्षम व निरुपयोगी करती झाली.
याउलट, अर्जुन ज्याला ऐन यद्धप्रसंगी आलेला विषाद, फक्त आणि फक्त, सद्गुरू, सखा, भगवंत श्रीकृष्ण यांनी, साक्षात गीताउपदेश देऊन, म्हणजेच समस्त जगतातील श्रेष्ठ ज्ञान, युद्ध थांबवून, प्रदान केलं. ही झाली सद्गुरु कृपा व त्या कृपेची योग्यता यांचा अपूर्व संगम. आपल्या साधनेने प्राप्त सद्गुरुकृपा ही अलौकिक कार्य घडवून आणू शकते. ती कृपा म्हणजे , निष्ठा आणि श्रद्धा यांचा जेंव्हा संघर्ष होईल व निर्णयाची क्षमता क्षीण वा अधू होईल आणि अयोग्य निर्णय घेतला जाण्याची शक्यता असेल, तिथे तिथे, सद्गुरू वा ईश्वर स्वतः, सद्गुरूरुपात प्रकट होऊन, होऊ शकणाऱ्या चुका वा मार्गभ्रष्टता या पासून सोडवून, योग्य मार्गावर आणून सोडेल.
यासाठी आपण काय करणं अपेक्षित आहे. तर आपण फार काही न करता, सद्गुरुसेवा आणि त्यांनी सांगितलेली साधना ही पूर्ण निष्ठेने, श्रद्धेने आणि प्रामाणिक प्रयत्नाने करावी. म्हणजे मनावरील नकारात्मक वा अनिष्ट प्रभाव, त्यायोगे, मनाचा त्रागा, घालमेल व चुकीच्या निर्णयांची व कृतीची अखंडित मालिका, खंडित होऊन, सन्मार्गावर मार्गस्थ होणं, हे सर्व या एका कृपेने साध्य होऊ शकतं. आपण आधीच्या भागात पाहिलेल्या व मनाला स्थिर स्थितीत आणण्याच्या प्रयत्नातसुद्धा, आपण यशस्वी होण्यात, ही सद्गुरुकृपा शक्ती महत्तम कार्य करू शकते.
यासाठी नित्य साधना करत, फक्त सद्गुरू सानिध्यात राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं, हे आपल्याच हातात आहे. गुरुकृपा व त्याची महती अपार आहे. ती साध्याला साध्य व अशक्याला शक्य करून दाखवते. आपल्या संचितात आलेले, मागील कर्माने प्राप्त झालेले, योग व भोग यांचे परिणाम कमी किंवा समूळ नष्ट करण्याची शक्ती, सद्गुरूंना प्राप्त असते. तशा प्रकारची क्षमता व योग्यता असलेलेच, त्या स्थानी पोचतात आणि त्या अढळ स्थानी विराजित असतात.
यावर अजून चिंतन करूया, पण पुढील भागात. तोपर्यंत सद्गुरुकृपेचा मार्ग जो नामस्मरणातून जातो, त्यावर नित्य चालत राहून, ती कृपा प्राप्त करण्याची योग्यता अंगी बाणवण्याचा प्रयत्न करत राहूया.
भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पेमेंटसाठी नं. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२६०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.
आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२५/१०/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment