भोग आणि ईश्वर १९५
एक प्रश्न निर्माण होतो आणि सार्वत्रिक आहे की, भोग जर भोगावेच लागतात तर, मग आपण भक्ती साधना व नाम घेऊन काय साधतो. दुसरं, जर असं आहे तर मग पुण्याईच्या बळावर आत्मा तरून जातो किंवा पाप धुतलं जातं हे कसं काय. याचा आज परामर्ष घेऊ. याच्या उत्तराला बरेच कंगोरे आहेत, त्यांचा विस्ताराने विचार करावा लागेल.
मुळात शुद्ध असलेला आत्मा, प्रथम जन्मापासून, भूलोकी आल्यावर माया, वासना यांच्या सापळ्यात आणि खेळात मशगुल होऊन, विषयात आणि संसारात मग्न होऊन जातो. मूळ शुद्ध सात्विक स्वरूपातील त्या आत्म्याला, देहाने केलेल्या पापकर्म, वासनेच्या प्रभावातील, सांसारिक गरजांच्या ओघात, कामाच्या आवेगात, अहंकाराच्या अंधारात, केलेल्या अनेक गैरकर्मानी अशुद्धतेचा मुलामा चढत जातो. जो प्रत्येक जन्मी गडद होत जातो.
थोड्याफार पुण्यकर्मानी हा मुलामा थोडाफार कमी होत असतो. परंतु आत्म्याची मूळ शुद्धता पुन्हा यायला ज्या परिश्रमांची गरज असते, ती चित्तशुद्धीने साध्य होते. चित्तशुद्धीची सर्वात पहिली पायरी मनातील किल्मिष, किंतु परंतु, काम क्रोध, मोह, लोभ यांची बीजं पूर्णपणे काढून टाकावी लागतात. चित्तशुद्धीच्या या पहिल्या पायरीनंतर मनातील सर्व वासनाचा नाश झाल्यानंतर तिथे भगवंताच्या नामाचं बीज रोवलं गेलं पाहिजे.
या रोवल्या गेलेल्या बीजाला ईश्वर स्मरण रुपाचं, खतपाणी घालत राहिलं पाहिजे. चित्तशुद्धीनन्तर कर्माची शुद्धता तितकीच महत्वाची आहे. कर्माची शुद्धता म्हणजे काय, तर कर्म करताना त्यात वा त्याच्या फलात मन न गुंतवता, त्याला ईश्वरार्पण भावनेची जोड देऊन, त्यातून मन पूर्ण काढून, ते मन फक्त ईश्वरचरणी समर्पणाची भावना ठेवली की, कर्माची शुद्धता साध्य होते.
म्हणजे महत्वाच्या दोन गोष्टी एक चित्त शुद्ध करून, कर्म ईश्वरार्पण भावनेने करून, अखंड त्याच्या स्मरणाचं भान राखत, जर मार्गक्रमणा केली, तर आत्मशुद्धीच्या मार्गावर मानवाची वाटचाल सुरू होते. याला श्रद्धा, भक्ती, सात्विकता, विश्वास यांची जोड किंवा यांचं बळ असावं. म्हणजे जे साध्य करण्यासाठी वाटचाल करणार, ती वाटचाल आत्मविश्वासाने होईलच, पण या सर्वांना संयम, शांतता यांची सुद्धा नितांत गरज आहे.
या सर्व प्रयत्नात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपलीच आपल्याशी स्पर्धा असावी, जेणेकरून प्रत्येक क्षणी ही शरण जाण्याची भावना, श्रद्धा, साधना वाढत जाणं जरुरी आहे. शरणागती परिपूर्ण होण्यासाठी ईश्वराचं स्मरण आणि चरण हेच फक्त ध्यानात राहणं गरजेचं आहे. प्रत्येक क्षणी मी आधीच्या क्षणापेक्षा जास्त ईश्वराच्या समीप असणं वा जात राहणं जरुरी आहे.
हे सर्व सुरू असताना,हा प्रवास आपण पुढील मार्ग सुकर होण्यासाठी करत आहोत हे ध्यानात ठेवलं पाहिजे. म्हणजेच दरम्यानच्या काळात येत असलेले भोग हे मागील कर्म केले त्याचे दोष आहेत, ते येत जाणार आणि त्याने मागे येण्याची किंवा खचून जाण्याची काही आवश्यकता नाही. इथे एक उदाहरण पाहू. आपण केलेली गतकाळातील कर्म म्हणजे शैक्षणिक वर्षात दिलेल्या परिक्षेसमान आहे. त्या परीक्षेनंतर जाग आल्यावर, पुढील परीक्षेचा नेटाने अभ्यास सुरू करण्याची मनीषा ठेवून अभ्यासाला सुरवात केली, तरी आधी दिलेल्या परीक्षेचे गुण मिळतील.
त्याबद्दल आपण लक्षात ठेवावं की, हे गुण त्या परीक्षेचे गुण आहेत, जेंव्हा आपण काहीही तयारी न करता परीक्षा दिली. म्हणजेच कर्माची, चित्ताची शुद्धता, कर्मगतीची, कर्मफलाची माहिती नसताना केलेली कर्म आहेत. त्यांचे गुण तितकेच मिळतील, जितका अभ्यास केला. म्हणजे समोर आलेले गुण हे आपल्या अज्ञानातील अभ्यासाची परिणती आहे. म्हणजे आता जागे झाल्यानंतर, नेटाने सुरू केलेल्या साधनेची परिणती वा परिणाम यायला जो वेळ लागेल, तितका काळ, दिलेल्या परीक्षांचे गुण येणार. आपण ध्यानात ठेवावं की, आपली खरी परीक्षा इथून पुढे आहे, ती नेटाने द्यावी, यासाठी जागृतीची जाणीव महत्वाची आहे.
उत्तराचा उत्तरार्ध उद्या पाहू. तोपर्यंत आपण नामात रहा, साधनेत समर्पण ठेवा, सर्वकाही साध्य होईल.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत आणि श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ हे लवकरच प्रकाशित होणारं, पुस्तक ज्यांना हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर मेसेज करून वा फोन करून संपर्क करावा आणि नोंदणी करून घ्यावी .
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१३/०६/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment