Skip to main content

भोग आणि ईश्वर १९९

भोग आणि ईश्वर  १९९

माणसाच्या वृत्तीवरून व्यक्तित्व तयार होतं. त्यामुळे वृत्तीतील बदल, हा वरवरचा असेल तर तो फार काळ टिकणार नाही आणि मूळ प्रवृत्ती कधीना कधी तरी नक्कीच बाहेर येईल. खूप ठिकाणी व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा आयोजित केल्या जातात. मुख्यतः त्या व्यवसाय नोकरी या संदर्भात, व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात बदल घडावेत या हेतूने आयोजित केल्या जातात आणि त्यात त्याच कारणांसाठी भाग घेतला जातो. 

त्यातून आपण नोकरीत, मुलाखतीत आणि व्यावसायिक सादरीकरणात काय गोष्टी टाळल्या पाहिजेत, काय आवर्जून केल्या पाहिजेत आणि काय काय नसलेल्या अंगिकारल्या पाहिजेत, याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण, मोबदला घेऊन दिलं जातं. इथे अश्या प्रकारच्या प्रशिक्षणाने उमेदवारांना व नोकरदारांना टिकाव धरून प्रगती साधता येते. ज्याला व्यावसायिकरण म्हणतात ते आत्मसात करण्यासाठी हे गरजेचं असतं.

अध्यात्मिक क्षेत्रात येतांना वा आलेल्या व्यक्तींनी आपल्या वृत्तीतील दोष ओळखणं आणि ओळखून त्यावर नियंत्रण मिळवून, मात करणं, साधनेच्या दृष्टीने जरुरी आहे. कारण वृत्तीतील दोषांवर चित्ताची शांती आणि  त्यावर नामात गती आणि प्रगती अवलंबून आहे. स्थिर चित्त हा सर्वात मोठा पाया आहे. कारण जर चित्त स्थिर नसेल तर नाममध्ये एकाग्रता, त्यायोगे आपल्या इष्टदेवतेप्रत आपले भाव व भावना पोचणार नाहीत. 

वृत्तीतील बदलासाठी बुद्धीची स्थिरता अत्यंत महत्वाची आहे. ज्याप्रमाणे चंचल मन हे सर्वच क्षेत्रात घातक आहे, त्याचप्रमाणें चंचल बुद्धी ही नामात स्थैर्य मिळायला अहितकारक आहे. एका स्थिर बैठकीसाठी बुद्धी, वृत्ती, चित्त हे ऐकतान व्हायला हवेत. तरच नामातून वा साधने तून मिळणारा अद्वितीय व अलौकिक आनंद घेता येतो. त्यासाठी स्थिर बैठक घालून, जगाच्या अंताचाही विचार न करणारं मन, मनाला बांधणारी वैचारिक बैठक व बुद्धी स्थिर करावी. स्थिर बुद्धी ही आत्मसंयमाने प्राप्त होते. 

आपण अनेकदा स्थिर विचारांची, स्थिर मनाची व शांत चित्ताची माणसं पाहतो. अशी माणसं दिसली की त्यांच्या कृतीकडे निरखून पाहावं, त्यांचं निरीक्षण करावं.  कारण त्यांच्या स्थिर बुद्धी मन व चित्त यांच्यामागे आत्मसंयम कार्य करत असतो. त्यांच्या प्रत्येक कृतीत संयम, विचारांची उत्तम बैठक असते. काहींना तो संयम संचिता तून प्राप्त झालेला असतो.. म्हणजेच याची दुसरी बाजू अशी की, आधीच्या जन्मात यांनी साधन वा साधना आणि एकाग्र होण्याचा अभ्यास वा कर्म नक्कीच केलं असणार, ज्यायोगे हा आत्मसंयम त्यांना जन्मजात प्राप्त होतो.

पण याचा अर्थ असा नाही की बाकीच्यांनी त्यासाठी पुढील जन्माची वाट पहावी. याचा अर्थ असा की, प्रयत्नाने तो संयम प्राप्त करून घेता येतो. संयम प्राप्त करायला आत्मविश्वास जरुरी आहे. आत्मविश्वास हा आपल्या कर्मावर, साधनेवर,  साध्यावर व लक्षावर श्रद्धा ठेवल्याने प्राप्त होतो. त्यासाठी त्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. 

आपण धरलेला मार्ग, त्यावर चालण्यासाठीचं कर्म वा साधन यावर दृढ श्रद्धा ठेवली की विश्वासाचा झरा आत्म्यापर्यंत पोचतो आणि श्रद्धा आत्मविश्वासात परिवर्तित होते. आत्मविश्वासाने एकदा मनाचा डोह काठोकाठ भरला की, मनुष्याला आत्मसंयम प्राप्त होतो. आत्मविश्वास माणसाला सर्व ज्ञान प्रदान करत नाही, पण प्रश्न उभा राहिल्यानंतर आतला आवाज आणि ज्ञानप्राप्तीची इच्छा जागृत ठेवतो. 

म्हणजे कोणताही व कितीही बिकट प्रश्न आला तरी, स्वतःवरील ठाम विश्वास अर्थात आत्मविश्वास माणसाच्या मनाला डगमगू देणार नाही. बुद्धी स्थिर राहून, बुद्धी व मन संयमाने विचार करायला लागतात. बुद्धी आणि मनाची एकतानता, माणसाला शांतपणे विचार करून, कृती करायला मदत करतात. म्हणजेच आत्म्या साठी साधन, साधनेसाठी वृत्ती स्थिर, वृत्ती स्थिर राखण्या साठी शांत मन, शांत मनासाठी स्थिर बुद्धी, स्थिरबुद्धी साठी आत्मसंयम व आत्मसंयमासाठी आत्मविश्वास असा हा चक्रव्यूह आहे. 

म्हणजे साधना ही सुरवात, पण ते साध्य करण्यासाठी आत्मविश्वास असा हा अद्भुत मार्ग आहे. आत्म म्हणजे स्वतः, पण देह नाही तर आतील आत्मा आणि त्यावर विश्वास म्हणजे सर्वार्थाने त्या आत्मतेजावर विश्वास त्याच्यातून आपण अंशरूपात बाहेर पडलो. म्हणजे एका अद्भुत चक्राचा शोध लागला. आता यावर विस्ताराने चर्चा करूया. तोपर्यंत विचार करा, नाम घ्या, स्थिर व्हा स्थिर रहा. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत.

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१७/०६/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...