Skip to main content

भोग आणि ईश्वर २११

भोग आणि ईश्वर २११

भक्तीच्या अनेक व्याख्या दिल्या जातात वा केल्या जातात. सर्व त्या त्या ठिकाणी योग्य आहेत. पण सर्वात सोप्पी व्याख्या म्हणजे मूळ अंशापासून विभक्त झालेले आत्मरुप आपण, त्या मूळ अंशास पुन्हा प्राप्त होण्या साठी केलेली आळवणी म्हणजे भक्ती. भगवंत आणि भक्त या दोन भिन्न रुपात वावरणाऱ्या दिव्यतेजांना पुन्हा एका ज्योतीरुपात आणण्याचा प्रवास म्हणजे भक्ती.

मी जो देहरूपात आल्यामुळे भिन्न वाटतो किंवा जाहलो, तो मी खरतर अभिन्न आहे. कारण हे भिन्नत्व फक्त वेगळ्या देहात, तेच आत्मतेज प्रकट झाल्यामुळे जाणवणारी पोकळी आहे. ती पोकळी भरून काढण्या साठी आणि ईश्वरासमीप जाण्याचा प्रवास साध्य करण्यासाठी केलेलं कर्म म्हणजे भक्ती. अर्थात भक्तीत ईश्वर प्राप्तीचं कर्म आहे. पण याची सुरवात मी भिन्न झालो आहे आणि मला भगवंतांशी जोडलं जायचं आहे ही जाणीव जागृत झाल्यामुळे वाटणारी विरहाची भावना हे यथार्थ ज्ञान आहे.

म्हणजे भक्तीत कर्मयोग आणि ज्ञानयोग दोन्ही समाविष्ट आहे. याच कारणाने भगवान श्रीकृष्ण यांनी श्रीमद्भागवद्गीतेत भक्तियोग हा सर्वात शेवटी सांगून महाभक्त अर्जुनासह सर्व भगवतभक्तांची ईश्वर व मोक्ष प्राप्तीची सर्वोत्तम व्यवस्था करून ठेवली आहे. म्हणजे मी भिन्न आहे आणि मला हे भिन्नत्व दूर करून, अभिन्न व्हायचं आहे, हे ज्ञान आणि त्यानंतर त्या भिन्नत्वापासून भगवंतापर्यंत पोचण्यासाठी भक्तीचं कर्म या दोन्ही योगांचा संगम म्हणचे भक्ती.

एखाद्या गोष्टीची प्राप्ती करायची असेल तर व्यवहारात अनेक युक्त्या प्रयुक्त्या कराव्या लागतात. अनेक प्रकारचं व्यावहारिक ज्ञान प्राप्त करावं लागतं, एखाद्या धंद्याचा अनुभव घेऊन, त्या आधारावर आपल्या धंद्याचं गणित बसवावं लागतं.

नोकरी करायची असली तरी, आधी आपली योग्यता सिद्ध करावी लागते. त्यानंतर मग मिळालेल्या नोकरीत मालकाची मर्जी सांभाळून, त्याच्या हुकूमांचे एकप्रकारे गुलाम बनून, व्यवहार म्हणून प्रसंगी घरातील चांगल्या दिवसांचा, कार्यांचा, सणांचा त्याग करूनही प्रसंगी नोकरीतील कर्तव्य श्रेष्ठ मानतो.

हे एवढं सर्व व्यवहातात करतो, इतक्या सर्व तडजोडी करतो काय साध्य करतो. जीवनातील, जगण्यातील व्यावहारिक आनंदाचे क्षण मिळवतो. म्हणजे एका जन्मात प्राप्त देहाची कर्तव्य, कर्म यासाठी इतकं जीव तोडून झटतो आणि काही कारणाने प्राप्त न झाल्यास निराश व नाराज होतो. सुखाची आकांक्षा, कामना करताना ते प्राप्त न झाल्यास आपण खूप चिडतो, चडफडतो आणि प्राप्त झाल्यास अत्यानंदी होतो.

म्हणजे ज्या देहात आत्मा आहे म्हणून सर्व काही होत आहे आणि त्या देहाला केंद्र मानून आपण सर्व, व्यवहार या नात्याने, करतो. त्या देहाचा खरा मालक असलेला आत्मा, ते चैतन्य, तो ईश्वरी अंश याच्या आनंदासाठी, त्याच्या उद्देशांच्या पूर्ततेसाठी आपण काय करतो, तर एका ठराविक वयानंतर जेंव्हा व्यवहार सार्थ होतो, आयुष्याची तरतूद होते, सर्व साध्य होतं, त्यानंतर देहाचे सर्व चोचले पुरवून झाल्यानंतर, मग आयुष्याचा उरलेला काळ किंवा त्या काळातील वेळेचा काही भाग आपण अध्यात्माचा विचार करतो.

बघा विचार करून, ज्या आत्मतत्वाच्या बळावर हा देह प्राप्त होतो, ज्याच्या जीवावर आपण देहाला झिजवतो, सर्व सर्व करतो, त्या देहाच्या मूळ मालकाचा विचार जितक्या लवकर केला जाईल, तितक्या लवकर त्या मालकाच्याही मालकाची भेट घडवून देण्यासाठी हा देह आहे आणि जन्म नव्हे अनेक जन्म घालवून इथे आलो आहोत, हे विसरून चालणार नाही. ह्या जन्मानंतर पुढे कधी कुठे केंव्हा पुढचा जन्म मिळेल हे एका ईश्वरालाच माहीत.

बघूया अजूनही बरेच मुद्दे बाकी आहेत, त्यांचा विचार उद्या करूया, पण नामाच्या मार्गात राहण्यासाठी नाम घेत रहा नाममार्गी रहा.

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता.

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले दहा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. लिंक कॉमेंटमध्ये दिली आहे.

©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२९/०६/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...