Skip to main content

राम अनुज भरत भाग १६

राम अनुज भरत भाग १६

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.

समोर काही अंतरावर महर्षी भारद्वाज यांची पर्णकुटी आणि अग्नीशाला दिसत होती. महर्षी संध्या समयीच्या अग्निहोत्र कार्यात मग्न होते. त्यांच्या सोबत काही विप्र व ब्रम्हवृंद, काही पाठक, काही अभ्यास कार्य पूर्ण करून, तिथेच राहून, गुरुसेवा करण्यात मग्न असलेले आश्रमी, सन्यासी जन, वानप्रस्था श्रमी असे काही जण गुरुदेवांना सहाय्य करून, अग्निहोत्र संपन्न करत होते. 

त्यांच्या या यागाच्या पूर्ततेपर्यंत, भरताने काही अंतरावर उभ राहून, प्रतीक्षा केली. अग्निहोत्र आणि स्नान संध्यादी विधी संपन्न होत असताना, भारद्वाज महर्षींच्या सोबत असलेल्या ब्रम्हवृंदांनी भरत आणि आर्य सुमंत याना दूर अंतरावर प्रतीक्षा करताना पाहिलं. 

अर्थातच अयोध्येचे ध्वज, पताका व छत्रचामर दिसल्या मुळे, सर्वांनी अयोध्या राजकुमाराना ओळखले. एका प्रौढ सन्यासी वृंदानी, पुढे होऊन, त्यांना आश्रमाच्या प्रवेश द्वारातून आत येण्याची विनंती केली. भरतासह सुमंत आणि सोबतच्या एक दोन मंत्र्यांनी आपापल्या मोजड्या व पादत्राण बाहेर काढले आणि आश्रमाच्या प्रवेश द्वारा तून सर्वजण आत आले. त्यांना ते प्रौढ सन्यासी म्हणाले

" महर्षी काही पळात, अग्निहोत्र संपवून, आपल्याशी संवाद साधतील. परंतु तोपर्यंत आपण आश्रमात येऊन, या वृक्षाखाली बांधलेल्या चौथऱ्यावर, मांडलेल्या आसनां वर स्थानापन्न व्हावे.आपली सर्व जलपान व्यवस्था आम्ही करतो. महर्षी अग्निहोत्र आणि इतर नैमित्तिक कार्य संपन्न करे करेपर्यंत आपण स्वस्थ व्हावे आणि जलापानाची सेवा करण्याचं पुण्य आम्हास द्यावे. " 

भरताने क्षमा मागून, स्थानापन्न होण्याच्या त्यांच्या विनंतीला नम्रपणे नकार दिला आणि सांगितलं की, महर्षी कार्य संपन्न करून, निवांत होईपर्यंत आम्ही इथेच उभे राहून प्रतीक्षा करतो. त्यावर त्या आश्रमवासी जनांनी विनम्रतेने जसं आपण योग्य समजाल त्याप्रमाणे, असं म्हणून, त्यांच्या जलपान व्यवस्थेच्या त्वरित कार्यवाहीची आज्ञा सोबतच्या विद्यार्थी पाठकांना केली आणि आपण अग्निहोत्रस्थानी माघारी गेले. 

उपलब्ध समयी भरत आणि सुमंत यांनी, पूर्व अनुमतीने, आश्रम, आश्रम परिसर अवलोकनास्तव फिरण्यास सुरुवात केली. संपूर्ण आश्रम नयनरम्य परिसरात होता. गंगा नदीच्या विस्तीर्ण प्रवाहाने वेढलेला, आजूबाजूला अनेक वृक्ष, फळझाड, सुंदर सुवासिक फुलझाड, वेली, तरू, लता यांनी बहरलेला होता. आम्र, वट, जामून यांसारख्या डवरलेल्या, डेरेदार वृक्षराजी यांनी, संपूर्ण परिसरात, सूर्य किरणांचा शिरकाव अडवला होता. त्यामुळे संपूर्ण परिसरात आल्हाददायक वातावरण आणि मनोहारी शीतलता होती.

वृक्षांच्या छायेने आपले आच्छादन संपूर्ण परिसरावर केले होते. आश्रमाला येणारे मार्ग आणि छोट्या छोट्या मार्गिका, स्वच्छ सुंदर होते. आश्रमाचा आतील संपूर्ण भूभाग, गोमयाने सारवलेला, सुंदर वेलींच्या, फुलांच्या व कुंकुम, चंदन युक्त रांगोळ्यांनी सुशोभित केलेला होता. 

विस्तीर्ण प्रदेशात पसरलेल्या त्या आश्रमात ठराविक अंतरावर जलपान सुलभ व्हावे यासाठी आणि आलेले पांथस्थ व शिकण्यासाठी आलेले विद्यार्थी पाठक जन यांच्या सोयी साठी, जलाने भरलेले मातीचे रांजण व कुंभ ठेवले होते. त्यातून जल घेता यावे यासाठी पात्रे देखील बाजूला ठेवलेली होती. 

पेयजल असल्यामुळे, त्या रांजण व कुंभांची स्वच्छता व नेटकेपणा नजरेत भरत होता. त्या रांजण व कुंभ यावर उत्तम नक्षिकारी करण्यात आलेली होती. एकूणच सर्वत्र असणारी स्वच्छता, वृक्षांची, लतांची, तरुंची, पडलेली फुलं पानं, पक्ष्यांनी खाऊन टाकलेली, वाऱ्याने पडलेली व वृक्षावरून सडून गळून पडलेली फळं, उचलून त्यांची विल्हेवाट नीट व्हावी आणि स्वच्छता राखली जावी, यासाठी विद्यार्थी व पाठक यांची लगबग स्तुत्य आणि उल्लेखनीय होती. म्हणूनच कुठेही पानं, फुलं, फळं इत्यादी पडून किंवा सडून दुर्गंधी येत नव्हती.

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकटच करावा. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
२४/०६/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...