Skip to main content

राम अनुज - भरत भाग २

राम अनुज - भरत भाग २

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.

कथाभाग, राजा दशरथ यांचं देहावसान झालेलं आहे आणि श्रीराम लक्ष्मण आणि माता सीता यांचं वनात प्रस्थान करते झाले आहेत, या प्रसंगापासून सुरू करणारं आहे. कथेच्या व विषयाच्या मांडणीत, बालपणातील व मागील काळाचे संदर्भ, भरत व श्रीराम यांच्या संबंधातील व संबंधासाठी आवश्यक असतील, तिथे येत जातील. 

आपल्या मातुल गृही, म्हणजेच कैकेय देशात, मातामह, राजा श्रीअश्वपती याना भेटावयास गेलेला राजकुमार भरत हा शत्रुघ्न यासह, आपला विश्राम काळ आनंदात व्यतीत करत आहे.नाना अर्थात मातुल आजोबा अश्वपती मामा युधाजीत,मामी आणि राजपरीवार यांच्याकडून उत्तम लाड केले जात आहेत. सर्वकाही यथास्थित सुरू आहे. पण...नियतीचा खेळ खूप विचित्र असतो. सारं काही उत्तम चाललेलं असतानाच, आपल्या कर्माचे भोग, आपल्यासाठी वाढून आणून, नियती खेळाचा विचका कधी करेल, हे ब्रह्मदेव देखील सांगू शकणार नाहीत. 

इथे कैकेय प्रांती, भरत आणि शत्रुघ्न, आपला काळ अत्यंत आनंदात व्यतीत करत असतानाच, अयोध्ये वरून आर्य सुमंत यांनी, रघुकुलाचे कुलगुरू, गुरुदेव श्री वसिष्ठ ऋषींच्या आज्ञेवरून, अतिजलद जाऊन, पुन्हा माघारी परतून येण्यासाठी कैकेय देशी आर्य सुमंत यांनी दुत धाडला. संपूर्ण अयोध्या यावेळी अत्यंत शोकाकुल मनःस्थितीत होती. 

प्रिय राजकुमार राम यांचा राज्या भिषेक न होता, त्याना, देवी सीता आणि महाबली लक्ष्मण, यांच्यासह वनवासात जावं लागलं आहे. अत्यंत वेगवान घडलेल्या या घडामोडींनी, अनेक हृदय पिळवटून निघाली होती. प्रत्येक मन उद्विग्न आणि हृदयं भग्न झालेली होती.अयोध्यापुरीत,कोणीही काही बोलण्याच्या, समजण्याच्या आणि व्यक्त होण्याच्या मनःस्थितीत नव्हतं. 

माता कौसल्या, माता सुमित्रा या दोघी या धक्क्यातून सावरुही शकल्या नव्हत्या. कनिष्ठ भ्राता शत्रुघ्न हासुद्धा राजकुमार भरत याच्यासह कैकेय देशात गेलेला होता. कारण जशी राम लक्ष्मण यांचा बालपणा पासून घनिष्ट स्नेह होता,तसाच भरत आणि शत्रुघ्न यांचाही एकमेकांशी अत्याधिक स्नेह होता. म्हणूनच बालपणापासून, मातुल गृही, भरत आणि शत्रुघ्न एकत्रच जात असत. 

किंबहुना ते कुठेही एकत्र जात येतं असतं. नियतीची विशेष खेळी, सुरू झाली आणि अयोध्येतील राजपाट अस्ताव्यस्त होऊन गेलेला आहे. महाराज दशरथ यांचं निधन झालं आहे आणि या स्थितीत, चारही राजकुमार अयोध्येत नाहीत, अशी विचित्र परिस्थिती, नियतीच्या फास्यानी निर्माण केलेली आहे. याच कारणास्तव आर्य सुमंत यांनी, आपल्या खास दुताला धाडलं आहे. 

सैन्यातील अतिवेगाने कार्य करणाऱ्या खास दलातून, एक दुत आपल्या साथीदारांसह, एक गुप्त संदेश घेऊन, कैकेय देशाला पोचता झाला. संदेश गुप्त यासाठी की, राजा दशरथ यांचं देहावसान झालेलं आहे आणि चारही राजपुत्र राज्यात राजधानीत नाहीत याचा, सुगावा कोणत्याही शत्रूला, लागता कामा नये, हा त्यामागे उद्देश होता. वायुवेगात मजल मारत, दुत कैकेय देशात पोचला. 

त्याने पोचताच विनाविलंब व विनाविश्रांती, राजकुमार युधाजित, यांच्याकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. आणि राजवाड्याच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना, अयोध्येचा खास संदेश घेऊन आल्याचं ध्वनित केलं. अधिकाऱ्यांनी, त्याच्या खरेपणाची खातरजमा केल्यावर, तसा संदेश राजकुमार युधाजीत याला पाठवला. युधाजीत हा, माता कैकयी यांचा भ्राता आणि राजा अश्वपती यांचा पुत्र. 

भरत आणि शत्रुघ्न यांच्या अयोध्या गमनाला अजून काही काळ बाकी असल्यामुळे,काहीतरी खास घडलेलं असणार, हे त्याने जाणल. प्रसंगाचं गांभीर्य, जाणवताच, युधाजीत स्वतः त्या दुताला भेटण्यास राजवाड्याच्या अभ्यागत कक्षात पोचण्यासाठी निघाला. तसा संदेश त्याने प्रतीहारींच्या माध्यमातून पाठवला. राजवाड्याच्या मुख्य सभागृहाबाहेरच, अभ्यागत कक्षात दुताशी, यूधा जीतची गाठ पडली . 

दुताने राजकुमार भरत यांच्यासाठी, रघुकुल पुरोहित, गुरुदेव श्री वसिष्ठ मुनींचा संदेश आणला असल्याचं सांगितलं आणि श्री भरत याना तो समक्ष देण्यासाठी, राजकुमार भरत याना पाचारण करण्याची विनंवणी युधाजीतला केली. युधाजीतने या विनंतीनुसार भरताला त्वरित उपस्थित होण्यासाठी खास संदेश पाठवला.

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा, ही नम्र विनंती. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
१०/०६/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...