Skip to main content

भोग आणि ईश्वर २९८

भोग आणि ईश्वर  २९८ 

कालच्या चिंतनातून हे लक्षात आलं असेल की, भोग आणि उपभोग ही साखळी म्हणजे आयुष्यात आपल्या प्रारब्धातून, बाहेर पडण्यासाठी, आपल्याच कर्मफलाची एक मालिका आहे. आता टीव्हीवरील मालिकांच्या सारखीच हीसुद्धा घटनांची मालिका असते किंवा आहे. सुख त्यामागून दुःख, भोग येणारच आणि दुःख वा भोग असतील तर, तर त्यामागून सुख येणार. 

पण एक प्रश्न मनात येतो की, एखाद्याच्या वाट्याला सुखच सुख आणि एखाद्याच्या वाट्याला दैन्य, दारिद्र्य, दुःख व भोगच येतात, ते का. वास्तविक कर्मावर पूर्ण विश्वास असेल तर, हे नक्की लक्षात येईल की, हे कोणत्या ना कोणत्यातरी कर्माचे भोग आहेत. आपण जन्मजन्मांतरीचं कर्म, प्रारब्ध आणि संचित जाणत नसल्यामुळे, आपण फक्त या जन्मातील दृश्य घटनांवर आधारित मत बनवतो किंवा शंका उत्पन्न करतो. 

इथे भीष्मांची गोष्ट आठवते, ज्यावेळी ते शरपंजरी होऊन, युद्ध समाप्तीपर्यंत मृत्यूची इच्छा निर्माण होईपर्यंत पडले होते. त्यावेळी आपल्या आत्मचिंतनातून त्यांनी आपल्या, मागील शंभर जन्मांचा आढावा घेतला,कारण त्यांच्या पुण्याईने त्यांना ती सिद्धी प्राप्त झालेली होती. ते सर्व जन्म आठवून आणि जाणून, नंतर , योगेश्वर श्रीकृष्णाला, त्यांनी प्रश्न केला की, मागच्या शंभर जन्मात, मी असं काही पाप केल्याचं, मलातरी स्मरत नाही, ज्यायोगे मला या शर शय्येवर निजण्याचे भोग प्राप्त झाले.  मग हे भोग माझ्या वाट्याला का आले, हे फक्त श्रीकृष्ण, तुम्हीच सांगू शकता. 

यावर श्रीयदुनाथ त्यांना म्हणाले की, उलट क्रमाने आपण तुमच्या जन्मात मागे गेल्यास, एक धागा सापडतो. मागच्या शंभराव्या जन्मात, आपण एकदा शिकारीसाठी गेला होतात आणि त्यावेळी सावजाची प्रतीक्षा करत असताना, आपण ज्या झाडाच्या आश्रयाने उभे होतात, त्या झाडावरून एक सरडा खाली उतरला. आपण फार काही विचार न करता, त्याला हातातील शराच्या टोकाने दूर उडवून दिलात. भीष्म पितामह म्हणाले, हो हे मला आठवलं, माझ्या चिंतनात. पण यातून काही पाप वा चुकीचं कर्म घडलं असं मला वाटत नाही. तरीही, हे श्रीयोगेश्वर वासुदेव, जर आपण दिव्य दृष्टीने काही पाहिलं असेल, तर जरूर मला ज्ञान द्या, म्हणजे माझ्या मनाची शांती होईल आणि मी सुखाने पुढील यात्रेकरता शुद्ध अंतःकरणाने जाईन. 

यावर श्रीदेवकीनंदन म्हणाले की, तुमच्या शराने तुम्ही उडवलेला तो सरडा, बाजूच्या बाभळीच्या झाडावरील काट्यांच्या बिछान्या वर अडकून, अत्यंत त्रासदायक व क्लेशकारक अवस्थेत काही काळ जिवंत होता. क्षण क्षण वेदनेने ग्रस्त होत होत, शेवटी तो मृत्यू पंथाला गेला. त्या कर्माचं फल तुमच्या वाट्याला आलेलं होतं. पण गेल्या शंभर जन्मापूर्वीच्या कर्माचं फल, गत  शंभर जन्मांतील आपल्या पुण्याईमुळे, पक्व होऊन फल देण्यासाठी प्रतीक्षेत होतं. तो भोग, पुढे पुढे सरकत, आता आपल्या वाट्याला आला. कारण आपल्या आत्मप्रवासातील हा शेवटचा जन्म आहे. हे कर्मफल जर राहिलं असतं, तर एवढया कर्मफलासाठी आपल्याला एक जन्म अजून घ्यावा लागला असता. 

म्हणून हा भोग आपल्या प्रारब्धात, आपल्याच कर्माने, आपण लिहून ठेवलात. हे ऐकल्यानंतर, साश्रु नयनांनी श्रीकृष्णाला, हात जोडून वंदन करत भीष्मांनी कृतज्ञता व्यक्त केली. या एका प्रसंगातून आपण हे नक्की जाणू शकतो की, प्रत्येक कर्म त्याच्या योग्य वेळी, आपलं फलित देतं आणि मगच शांत होतं. पण इथे श्रीकृष्णांनी पुण्याई आणि त्यायोगे भीष्मांचं कर्मफल पक्व होऊन प्रारब्धात वा संचितात शंभर वर्षे प्रतीक्षेत होतं, असा उल्लेख केला आहे. म्हणजे स्वतः योगेश्वर यांच्या या म्हणण्यात दोन मुद्दे येतात. 

कोणते ते दोन मुद्दे, यावर उद्या चिंतन करूया. पण आपलं नामाचं चिंतन नित्य करायचं आहे. 

प्रिंट होऊन पुस्तकं कालच प्राप्त झालेली आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू होईल आणि त्यांना तसं सूचित केलं जाईल. प्रकाशनपूर्व सवलत रु.१४०/- (रु.११०+ रु.३०) २५ सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२५०/- कुरियरसह. यात लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख आहेत. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत.  श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लांबलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२४/०९/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...