Skip to main content

भोग आणि ईश्वर २८६

भोग आणि ईश्वर  २८६ 

एक गोष्ट आपल्या लक्षात आली की, जाणिवांची जागृती, ही मनातील त्या त्या शक्तिकेंद्रांवर अवलंबून आहे आणि त्यावर येणारी क्रिया व प्रतिक्रिया सुद्धा. म्हणजे येणारे विचारसुद्धा शक्तिकेंद्रांवरच अवलंबून आहेत.  आता या तयार झालेल्या साखळीचा भेद कसा करायचा,हाच महत्वाचा प्रश्न आहे. इथे काही गोष्टी इच्छाशक्तीच्या बलावर आणि मनातील सकारात्मक ऊर्जेवर अवलंबून आहेत. 

म्हणजे जर मनात थोडीशी जरी सकारात्मकता शिल्लक असेल, तर वरील चक्र भेदण्याचा विचार मनात येऊ शकतो आणि त्यादृष्टीने इच्छाशक्ती कार्यरत होऊन, मनाला सकारात्मक सुरवात करायला प्रोत्साहित करू शकते. इथेच माऊलींच्या अभंगातील एक चरण आपण विचारात घेऊया. या थोड्याशा सकारात्मकतेला कार्यप्रवृत्त करण्यासाठी माऊली सांगतात की, देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी, तेणे मुक्तीचारी, साधियेल्या. 

म्हणजेच जर अंशमात्र जरी सकारात्मक भाव मनात कुठेही शिल्लक असेल, तर क्षणमात्र जरी आपण मनाने वा मनापासून देवाच्या दारी उभे राहिलो, तरी चारी मुक्ती साध्य झाल्या असे म्हणायला हरकत नाही. इथे देवाचिये द्वारी म्हणजे हृदयातील भगवंत मंदिरात, क्षण एक जरी आपण पूर्णपणे लीन व नतमस्तक होऊन, सकारात्मक भावाने त्या हृदयस्थ भगवंताचं नाम आपल्या ओठाने गुणगुणलो तरी तो भाव ईश्वरी भावाशी तादात्म्य पावून, कार्यसिद्धीस जाण्यास, सिद्ध होतो. 

याचा अर्थ असा की, सकारात्मक भाव हे क्षणमात्र, पण नित्य जोपासले गेले, तर ते आपल्या शक्तीने हळूहळू हळूहळू नकारात्मक भाव नष्ट करण्यास सिद्ध होऊ शकतात. म्हणजे अनिष्ट भावाने जोपासली गेलेली, मनातील चुकीची शक्तिकेंद्रे बंद वा निद्रिस्त करण्यासाठी, काही क्षण पण नित्य सकारात्मक भाव जागृत करत गेल्यास, त्यायोगे सकारात्मक शक्तिकेंद्रांना योग्य पोषण मिळून, त्यांची कार्यशक्ती वाढते. 

परिणामी, नकारात्मक शक्तिकेंद्रे क्षीण होण्यास मदत होते. अशी क्षीण झालेली नकारात्मक शक्तिकेंद्रे आपलं कार्य हळूहळू बंद किंवा स्थगित करू शकतात. पण याचा दुसरा अर्थ असा की, ही सकारात्मक शक्तीची वाढ आणि नकारात्मक शक्तींचा लय, आपली अंतर्गत ऊर्जा व प्रेरणा आणि इच्छा, यांवर आधारित आहे. म्हणूनच यासाठी आधी मनातील विचारांचा दर्जा सुधारणं जरुरी आहे. 

विचारांची दिशा सकारात्मक करण्यासाठी, प्रथम त्यांना थोपवता येणं म्हणजेच त्यांना channelise करणं, जरुरी आहे. त्याचसाठी आपल्या मूळ मुद्द्यावर परत येऊ, ते म्हणजे मन शांत करणं महत्वाचं आहे. याआधी पाहिल्याप्रमाणे, मन शांत करण्यासाठी, त्याला आधी स्थिर करणं प्रथम कर्तव्य आहे. म्हणून दिवसातून काही काळ, जमेल तितके वेळा, हा सराव करावा. या प्रक्रियेत सुरवातीला काही काळ वा काही दिवस, मन पूर्ण अशांत राहील, कदाचित ही अशांतता वाढेल. पण एका ठराविक बिंदूवर, ही प्रक्रिया पूर्ण बंद होऊन, मनाला हळूहळू नियंत्रणाची आवश्यकता समजून येईल. याचं महत्वाचं कारण म्हणजे मनाला विरोध केला तरच ते अतिवेगवान, अविचल होऊन, वेगाने विचार करायला प्रवृत्त होतं. 

पण या प्रकियेत कुठेही अडथळा वा अटकाव न झाल्यास, मनाला काय करायचं हे समजत नाही आणि ते हळूहळू शांत व्हायला लागतं. आता यापुढील प्रक्रिया आपण पुढील भागात पाहूया. तोपर्यंत नामाधारावर चालत रहा. 

भाग २ ची नोंदणी आजच सुरू केली आहे. ३० ऑगस्ट रोजी पुस्तक प्रकाशित होईल आणि त्यानंतर लगेच कुरियर होईल. प्रकाशनपूर्व सवलत रु.१४०/- (रु.११०+ रु.३०). 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२५०/- कुरियरसह. यात लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख आहेत. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत.  श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लांबलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१२/०९/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...