Skip to main content

जानकी पुनःवनवास ४२

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ४२

विश्वनियंत्याच्या मानवी रूपाची शोभा आणि एकूणच या विधिवत स्नानाचा महासोहळा स्वनेत्रे पाहण्यासाठी तिन्ही लोकींचे देव, इंद्रादि सुर आकाशात दाटि करून जमलेले आहेत. जटा पूर्ण मोकळ्या करून आणि त्याना तेल लेपन करून झाल्यापश्चात  सत्व,  गंधयुक्त तेजस्वी उटणे सुवर्णपात्रातून भरताने हाती घेऊन प्रभुंच्या अंगावर मालिश करण्यास सुरवात केली.  अर्थात लक्षणानेसुद्धा भरताला या कार्यात मदत करण्यास सुरवात केली.

सुगंधयुक्त तेल व दिव्य उटणे यांचे मालिश सुरु असते वेळी हनुमंत तिथे प्रकट झाले आणि म्हणाले

" भ्राता भरत आपल्या आज्ञेनुसार कुलगुरु महर्षि वसिष्ठ आणि इतर ब्रम्हवृंदाला मी घेऊन आलोय. त्यांच्या राहण्याची आणि जलपान आदि व्यवस्था करूनच इथे आलो आहे. अजून काही आज्ञा असल्यास थोड्या अवधिनन्तर जरूर सांगावी"

" थोड्या अवधीनन्तर का?"    भरत विचारतो

" कारण हा मनोहारी सोहळा या लोचना वाटे हॄदयात साठवून ठेवण्याची मनीषा आहे. एवढी मनीषा पूर्ण होऊ द्यावी हीच विनंती"  हनुमंत वदला

चारही बंधुना आपले हसू लपविता आले नाही. पण चतुर हनुमंताने त्यात आपणही सामील होत ही संमति म्हणुन स्वीकार केली. प्रभुनी मारुतिरायाला खाली बसण्याची आणि भ्राता शत्रुघ्नला हनुमंतास आसन देण्याची आज्ञा केली. प्रभुपुढे बसण्यास अनुत्सुक असलेल्या हनुमंताचा प्रभुआज्ञेमुळे नाइलाज झाला. तरीही मारुतिरायाने एकवार विनंती करून बघितली

" प्रभु मी उभा ठिक आहे, उगाच आपल्यासमोर बसणे सुयोग्य वाटत नाही "

यावर  प्रभूनी   मारुतीरायाला फक्त एक नमस्कार  केला , मात्र मारुतीराया ओशाळा होऊन एका आसनावर स्थानापन्न झाला. प्रभुना नमन करून हनुमंत म्हणतो

" प्रभू आपण मला पापाचा धनी का करत आहात नमस्कार करून"

प्रभू म्हणाले

"हनुमंता मी तुला काही घटका बसण्यास सांगितले. त्यास तू विनम्र नकार दिलास. मग माझाही निरुपाय झाला, आणि तसही विनम्रतेला विनम्रता हेच उत्तर योग्य आहे. खरं ना."

यावर हनुमंत फक्त हसून होकार दर्शवतो. असा हा भक्त भगवंत यांमधला प्रेम भाव आणि मनमोकळा वार्तालाप तिन्ही बंधू मोठ्या आनंदाने बघून कृतकृत्य होत आहेत. न भूतो न भविष्यती असा हा सोहळा आहे. तेल आणि उटणं यांचं यथास्थित मालिश झाल्यांनतर म्हणजेच भ्राता भरत आणि लक्ष्मण यांचं पूर्ण समाधान झाल्यांनतर प्रभुना आसनावरून हाताला धरून दोन्ही भ्राता स्नानगृहाकडे घेऊन जात आहेत. इकडे लक्ष्मण पुढे होऊन उन्हपाणी आणि इतर व्यवस्था सुनियोजित आहे याची खात्री करून घेतो.  तत्पश्चात दोन्ही भ्राता प्रभुना सचैल स्नान घालुन आपली अनेक दिवसांची इच्छा तृप्त करून घेतात. प्रभूदेखील कोणतीही आडकाठी न करता शांत चित्ते भ्राता भरतास म्हणतात

"भरत काही उणीव राहिली नाही ना हे एकदा पाहून घे. "

"का ज्येष्ठ भ्राताश्री ?"

"तुझी अनेक वर्षांची इच्छा तृप्ती होणे बाकी आहे, माझ्या सेवेची.  त्यात काही उणीव राहिली तर तुलाच मागाहून वैषम्य वाटेल. म्हणून म्हणतो पुन्हा एकदा बघून घे. आजचा पूर्ण वेळ, चौदा वर्षांनंतर, तुझ्यासाठी राखून ठेवला आहे. म्हणजे पुन्हा तुझ्या मनात नको यावयास कि , भ्राता लक्ष्मणावर माझे अधिक प्रेम आहे."

लक्ष्मण मधेच म्हणतो

" क्षमा करा ज्येष्ठ भ्राताश्री , पण हीच तर माझीही तक्रार आहे , कि आपल्या हृदयात प्रथम स्थान भारताला आहे. आपण चौदा वर्षे माझ्या सोबत होतात तरीही आपल्याला जास्त आठवण भ्राता भरताचीच येत होती "

यावर प्रभू म्हणाले

" लक्ष्मणा अरे तू तर सतत समोर होतास आणि माझ्या सोबत सावली सारखा असायचास. तुझ्या मुळे वास्तविक ही चौदा वर्ष सुसह्य झाली. कारण तू आम्हास निश्चिन्त केलेस कि तू आहेस म्हणजे माझ्या व जानकीच्या केसाला देखील धक्का लागणार नाही.  खरे ना ? . पण भरताचे तसे नाही त्याला हा योग चौदा वर्षानी मिळाला. क़ाय सत्य ना?"

" ज्येष्ठ भ्राताश्री हा आपला विनय आहे. समस्त ब्रह्मांडातील शक्ती एकत्र झाली तरीही आपल्यापुढे कस्पटासमान भासेल. वास्तविक आपण होतात म्हणून मी निश्चिन्तपणे संकटाना अंगावर घेऊ शकलो. हे तर खरे ना, भ्राताश्री "

प्रभू काही बोलणार इतक्यात भारताने या धर्मसंकटातून प्रभूंची सुटका केली.

"मला वाटत आपण सर्व ज्येष्ठ भ्राता आहेत म्हणून निश्चिन्त  आहोत, असाच मतितार्थ भ्राता लक्ष्मणाच्या कथनातून मला दिसतो. "

यावर लक्ष्मणासह तिन्ही बंधू होकार दर्शवतात आणि मग चारही बंधू हास्यात रत होऊन ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांना स्नानोपरांत पुढील कार्यासाठी सिद्ध करण्यात मग्न होतात. प्रभू स्वतः हे तिन्ही बंधूंचं आपल्या प्रति असलेल प्रेम आणि ममत्व पाहून भारावून गेलेले आहेत. आणि मनात विचार करतात, किती साध्या स्वभावाचे आहेत माझे हे तीनही बंधू. आज इतके आनंदी पाहून कोणाला खरं वाटणार नाही, कि मधल्या चौदा वर्षात इतक्या घडामोडी या राजप्रासादात आणि येथील सर्वांच्या जीवनात घडून गेल्या आहेत.

हे मनोहारी दृश्य बघून भक्तवत्सल आणि कृपाळू भगवंत आपल्या लोचनांवाटे येणाऱ्या अश्रुना थांबवू शकले नाहीत. हे पाहून तीनही बंधू एकमेकांकडे प्रेमपूर्वक बघतात, ज्याचा अर्थ फक्त या हृदयीचा त्या हृदयी जाणवला आणि जाणला गेला.

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...