भोग आणि ईश्वर २४९
काल आपण पाहिलेल्या कथेमध्ये तीन जणांचा प्रत्यक्ष सहभाग आहे आणि एक नामोल्लेख आहे, चित्रगुप्तांचा. मुळात हा पोपट मनाचं प्रतीक आहे, जो त्वरित कार्य करण्यास बुद्धी व देह यांना प्रवृत्त करतो. गरुड हा त्या बुद्धी आणि देह यांचं प्रतीक आहे आणि यमराज हा नियती वा प्रारब्ध यांचं प्रतीक समजुया.
आता प्रारब्धाचं भय समोर फलरूपात समोर येऊन उभं राहिल्यानंतर, मनाची सर्वात प्रथम प्रतिक्रिया ही भीतीची असते वा असणार. कारण स्थितप्रज्ञ व्यक्ती सोडून, बाकी सर्व सामान्य जीव हे याचप्रकारे प्रतिक्रिया वा प्रतिसाद देतात. त्यानंतर प्रत्यक्ष कृती होते. इथेच मनातला विवेक कार्य करू शकतो व मनाला निश्चितपणे चुकीच्या कार्या पासून परावृत्त करू शकतो. आता हे उदाहरण प्रत्यक्ष मृत्यूचंच असल्यामुळे, आपण होणारा परिणाम टाळू शकतच नाही, हे नक्कीच.
पण त्या यमराजाच्या जागी आपण प्रारब्ध कल्पिलेलं असल्यामुळे, जीवन जगताना, ते कोणत्याही कर्म फलाच्या स्वरूपात, अकल्पितपणे समोर येऊ शकतं. म्हणजेच जे समोर येईल, ते चांगलं किंवा वाईट असं काहीही असू शकतं. मात्र त्यावर मनाची प्रतिक्रिया वा प्रतिसाद हा भयकंपित असल्यामुळे, तात्काळ कृती ही चुकीची झाली. याचा अर्थ आपण ते टाळू शकतो का, तर प्रारब्धाचा भोग वा उपभोग हा टाळू शकत नाहीच. पण त्यामुळे आजच्या वा वर्तमानातील संधी अथवा शक्यता सुदधा आपण नष्ट करू शकतो.
मागील कर्मफलाचा परिणाम, हा ठरलेल्या वेळी समोर येणारच. पण आपली प्रतिक्रिया भयाची असेल, तर होणाऱ्या परिणामांची तीव्रता वाढू शकते. म्हणजे जर एखादा भोग न टाळता येणारा असूनही, आपल्या कृतीने त्याची व्याप्ती वाढू शकते. त्याचप्रमाणे त्यातून घडणाऱ्या अनिष्ट परिणामांना आपणच आपणहून ओढवून, वाढवू शकतो.
इथे एक कथा आठवते, ती मांडतो, म्हणजे मुद्दा स्पष्ट होईल. एकदा एक भक्त आपल्या भगवंताला विचारतो की, जर प्रारब्ध आणि संचित यानुसारच सर्व सूत्रबद्ध असेल तर, मग मी कर्म का करायचं. यावर भगवंतांनी स्मित करत उत्तर दिलं. कुणास ठाऊक कदाचित प्रारब्धात, प्रयत्नाने व कर्माने यशप्राप्ती किंवा अपयशा तून सुटका लिहिली असेलही. कारण ते मलाही ज्ञात नाही.
म्हणजेच, जर कर्माने वा प्रयत्नाने यश लिहिलं असेल तर ते साध्य करायला तुला कर्म करावंच लागेल आणि अपयश जरी आलं, तरी हे समाधान असेल की, आपण प्रयत्न तरी केले. म्हणजेच भोगांचा काळ असताना, विवेकाने मनाचा बांध व्यवस्थित ठेवून मार्गक्रमण करणं आणि उपभोग घेत असताना, अर्थात यशप्राप्तीच्या काळात तोच विवेक, पाय जमिनीवर ठेवायला सहाय्यक होईल.
म्हणूनच या दोन उदाहरणातूम हा बोध नक्कीच घेता येईल की, कोणतंही संकट समोर आलं, तरी त्यामुळे घाबरून वा हवालदिल न होता, मनाला शांत करून, त्या संकटाचा सामना करणं, हीच इष्टापत्ती ठरू शकेल. असा विवेक साधायला मनाला नित्य, एखाद्या योगात बांधून ठेवणं गरजेचं आहे.
म्हणजे प्रारब्ध योगात जे असेल ते असुदे, आपण त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिलं, तर संकटांनासुद्धा विवेकाचा आधार घेऊन, संधीमध्ये परिवर्तित करता येतं. कारण शेवटी कर्मच या जगतात श्रेष्ठ आहे आणि त्याला श्रद्धा व विश्वास यांची जोड असेल, तर या त्रयीच्या जोडीने वा आधाराने सर्व साध्य होऊ शकतं किंवा घातक परिणामांची तीव्रता कमी करता येईल. कारण ईश्वराने स्वतः या भूमीवर येऊन, वचन दिलेलं आहे की, कर्म श्रेष्ठ आहे, तू कर्म कर, शरणागत होऊन, मला फल अर्पण कर आणि निश्चिन्त हो. तुझ्या शरणागतीनंतर तुझा योगक्षेम सांभाळणं ही माझी जबाबदारी आहे.
विषय मोठा आहे, उद्या पुन्हा पुढे चालू ठेवू. पण नामात रहा आणि ईश्वराच्या सान्निध्यात रहा.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लाभलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. त्याचबरोबर भोग आणि ईश्वर भाग २ चं काम पण सुरू आहे. त्याची सुद्धा घोषणा लवकरच करण्यात येईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०६/०८/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment