भोग आणि ईश्वर २६३
आत्मा एकदा निजतत्वापासून अर्थात परम तत्वापासून विभक्त झाला की, त्याची ब्रह्मांडातील यात्रा सुरू होते. मूळ शुद्ध चैतन्यस्वरूप व सात्विक तेजाने युक्त असलेल्या या परामाच्या सूक्ष्म अंशाला, ब्रह्मांडात प्रवेश करताच, सर्वात प्रथम माया वा ब्रह्मांडाची शक्ती, ग्रासते. तिच्या प्रभावाने तो या भूलोकी अथवा मर्त्यलोकात येऊन, पंचमहाभूतरुप देहातील आपल्या प्रवेशा साठी प्रयत्न सुरू करतो. इथेच कर्माचा प्रवास आणि मायेसोबत वास सुरू होतो. आपण खूपवेळा विचार करतो की, प्रथम कर्म कधी घडतं. तर ते मायेच्या प्रभावात देहधारणेसाठी घडलेलं प्रथम कर्म असतं.
कर्म आणि माया हे दोन, त्या आत्म्याचे अविभिन्न अंग होतात. यातील माया ही जीवाला संसारात गुंतवून टाकते. मुळात संसार म्हणजे आपण समजतो तो लग्नसंसार नाही, तर जीवाचा षड्रिपूंच्या सान्निध्याचा आणि त्याद्वारे मन व बुद्धी, यांच्या व्यवहारांचा संसार सुरू होतो. कारण देहधारणेसाठीचं कर्म आत्मा सुरू करतो, तिथेच या व्यवहारात अडकून, जन्मो जन्मीच्या बद्धतेचा प्रवास सुरु होतो.
एकदा कर्माच्या खेळात आणि मायेच्या फेऱ्यात मन व बुद्धी सापडले की, जीव परम सुखापासून, कित्येक योजने दूर जातो. मग फक्त कर्म, कर्मफल आणि पुन्हा कर्माचा गुंता निर्माण होतो आणि जीव चक्रव्यूहात अडकत जातो. बद्ध जीवाची खरी स्थिती त्याच्या अनेक जन्मांचे विश्लेषण केले तरच समजून येऊ शकते.
हे चक्र कसं आहे याचा विचार करू, म्हणजे कल्पना येईल. माया आणि षड्रिपु यांच्या प्रभावात, क्रोध, मद, मस्तवालपणा, गर्व, दंभ या सर्व अवगुणांनी युक्त होत गेलेला जीव अनेक प्रकारच्या चुका, प्रमाद, अत्याचार करत जातो. त्याच्या कर्मफल रूपाने, आज जे जे पापी आहेत ते, आपल्या कर्मफलाने, ज्यांच्यावर त्यांनी अत्याचार केले, त्यांच्याकडून भरडले जातात. हा जन्मोजन्मीचा खेळ आहे.
खूप जवळच्या उदाहरणाने मुद्दा लगेच ध्यानात येईल. आज आपण ज्यांच्यावर अत्याचार होताना जगात सर्वत्र बघतो, त्यांनी आधीच्या जन्मात हाच खेळ त्यांच्यावर केला होता, जे आज अत्याचारी आहेत. म्हणजे याचा अर्थ असा नाही की, आज जे अत्याचार करत आहेत, त्याचं समर्थन होईल वा करता येईल. पण हा खेळ नित्य सुरू आहे, युगानुयुगे आणि पुढेही सुरू राहील युगानुयुगे.
आपण फक्त एकच जन्म, जो आता जगतो आहोत तो, बघत असल्यामुळे, आपण कोणत्याही जन्मात, नाण्याची फक्त एकच बाजू पाहू शकतो. दुसऱ्या बाजूचं ज्ञान हे चिंतन, साधना आत्मज्ञान, गुरुकृपा या माध्यमातून प्रकट होऊ शकतं. पण या ज्ञानाचा वा जाणिवांचा उपयोग, आपल्या स्वतःच्या कर्मांचा आलेख सुधारण्यासाठी जरी करता आला तरी, आपण बरच काही साधलं.
हा खूप स्थूल पातळीवरील विचार झाला. खूप सूक्ष्म पातळीवर वा खोलात जाऊन, याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे, तरच व्यक्तिगत वा स्व म्हणजेच आत्मपरीक्षण उत्तम रीतीने होऊन, काही लाभदायक हाती लागेल. उद्या त्याचा विचार करूया. आत्मचिंतनाचा खूप सोपा व सुलभ मार्ग , जो खूप लाभदायक आहे, तो म्हणजे नामस्मरण. ते करतच राहू.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लाभलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. त्याचबरोबर भोग आणि ईश्वर भाग २ चं काम पण सुरू आहे. त्याची सुद्धा घोषणा लवकरच करण्यात येईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२०/०८/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment