Skip to main content

भोग आणि ईश्वर २५७

भोग आणि ईश्वर २५७

कालचाच विषय पुढे नेऊ. कालच्या विस्तृत विवेचना वरून एक गोष्ट लक्षात आली असेल की, मी म्हणजे देह नाही. कारण मी ती दुःखं आणि लाभ भोगतो व उप भोगतो जी, या देहाचा वास्तविक अधिकार नाही व नव्हती . म्हणजे जे माझ्या अधिकारात नाही, ते मी उप भोगतो किंवा भोगतो. हे वास्तविकपणे तर्कात बसत नाही.

पण जर कर्माचा आणि त्याच्या फलाचा संबंध जोडला किंवा योजला तर, नक्कीच कोणीतरी ते कर्म केलं आहे, जे आज फलद्रूप होऊन समोर आलं आहे. पण मग ते माझ्या वाट्याला का आलं. असा कोण आहे जो, इतरांच्या वाटचे भोग वा उपभोग माझ्या पदरात टाकून, मला त्याचा विनाकारण अधिकारी करत आहे.

पण कर्माचा सिद्धांत नीट तपासून पाहिला, तर हे नक्कीच खात्रीपूर्वक सांगता येईल की, कधीतरी केलेल्या याच जन्मातील चुकांचं फल वा वास्तव आपल्या
समोर आलेलं आपण पाहिलं आहे. उदाहरणार्थ आपण घेतलेलं वा जामीन राहिलेलं कर्ज जर फेडलं नाही, तर त्याचे देणेकरी कधीनाकधीतरी समोर येऊन उभे राहणार वसुलीसाठी. याचं साधं कारण, तो कोणाचा तरी इतरांचा पैसा आहे आणि ज्यांनी मला दिला तेदेखील कोणाला तरी उत्तरदायी आहेत.

म्हणजेच कर्म फल हा एकप्रकारे चक्राकार खेळ आहे. चक्रात एकदा पडलेली सोंगटी, कधीतरी पुन्हा सर्व ३६० अंश फिरून माझ्याकडेच वा माझ्यापर्यंत येणारच.कारण वर्तुळात ३६०व्या अंशानंतर ० (शून्य) या अंशावर पुन्हा मीच उभा असणार. हे गणित इतकं सहज नसतं. कारण माझी स्थिती व स्थान हे एका जन्मात क्षणोक्षणी व प्रत्येक जन्मात वेळोवेळी बदलत असतं.

तरीही काळ म्हणजेच विधाता हा सर्वात मोठा , सर्वात कठोर गणितज्ञ आहे. तो माझी स्थिती वा जन्म कोणताही व कुठेही असो, बरोबर ३६० अंशांनी त्या कर्माचं फल वा दान माझ्या पदरात टाकणारच. त्या ३६० अंशाच्या वेळी मी कुठे आहे, हे जाणून घ्यायची जरुरी वा व्यवस्था विधात्याकडे नाही. पण तरी, हे तर्काच्या पलीकडे आहे की, मी देह बदलला, स्थान, वंश, गोत्र, कदाचित देश व वेषसुद्धा बदलला असेल, तरीही हे दान बरोबर माझ्या पदरात कसं वा का पडतं, जे विधात्याच्या गणितानुसार योग्यवेळीच मला मिळालंय.

म्हणजे देह बदलला असतानासुद्धा, मला ओळखायची काहीतरी खूण असलीच पाहिजे. ती खूण म्हणजे, या देहाला चालवणारी चैतन्यशक्ती. त्या शक्तीला, चैतन्य यासाठी म्हणायचं की, ते नसेल तर तोच देह अवघ्या एका क्षणात अचेतन अर्थात श्वासरहीत म्हटला जातो आणि क्षणात नश्वर होतो. धमन्यात रक्तसंचार असतो तोपर्यंत त्याला स्पर्श करायची वातावरणाचीसुद्धा हिंमत नसते, तेच वातावरण व इतर जीवजंतू, एका क्षणात, त्याच देहाला, नष्ट करायला सुरुवात करतातदेखील. हे विदारक वास्तव आहे.

मग निश्चितच मी देह नाही, कारण अनुमानानुसार, प्रत्येक जन्मातील मीचं म्हणजे माझं रूप, गुण, सर्व काही भिन्न आहे. मग ते काय सूत्र आहे, ज्याने हा देह, कर्म इत्यादी, मागील अनेक जन्मांना बांधलं गेलं आहे. शास्त्रात याचं उत्तर दिलेलं आहे. ते म्हणजे तीच चैतन्यशक्ती, जी एका देहातून, दुसऱ्या देहात संचरत असते आणि एका देहाच्या कर्माचे भोग व गती, दुसऱ्याच कोणत्यातरी देहाला भोगायला लावते.

म्हणजे मग मी ती चैतन्यशक्ती आहे का. याचं कारण निश्चितच हो असं आहे. कारण या सर्व देहांना बांधून, त्यामधून संचार करून, भोग व उपभोग यांचं गाठोडं, संचितरुपात पुढे नेण्याचं महत्तम कार्य, ही शक्ती करते. एक देह सोडून दुसऱ्या देहाची प्राप्ती होइपर्यंत, ते संचित सोबत बाळगून, त्याचा भार वाहते. देहधारणेसाठी योग्य स्थिती उत्पन्न होताच, पुन्हा नवीन देहात प्रवेश करून, तो संचिताचा बॅलन्स, त्या देहात प्रस्थापित करते.

तिथे किती बॅलन्स बाकी आहे, त्यात नवा किती जमा झाला व जुना किती पुढे नेण्यासाठी शिल्लक आहे, ही सर्व खतावणीची व्यवस्था व शिलकीचं गणित क्षणा क्षणाला जुळवत जाणारी ही शक्ती, मुख्यतः भार वाहण्याचं कार्य करते आणि बाकी काही इतर कार्य देहात असताना करत नाही का. यावर उद्या विचार करूया. तोपर्यंत नाम घेत रहा, कार्यसिद्धी मिळेल हे नक्की.

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लाभलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. त्याचबरोबर भोग आणि ईश्वर भाग २ चं काम पण सुरू आहे. त्याची सुद्धा घोषणा लवकरच करण्यात येईल.

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.

©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१४/०८/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...