Skip to main content

अध्यात्म विराम १८७

अध्यात्म विराम १८७

कालच्या विषयाला पुढे नेऊया. विवेक म्हणजे योग्य अयोग्य याची जाण आणि सारासार विचार. पण हा विवेक अनेक प्रकारचा असतो. व्यावहारिक विवेक हा व्यवहार ज्ञान,अनुभव इत्यादीं मुळे जागुत होतो व अभ्यासात, कार्यात असलेल्या व्यक्तींचा व्यावहारिक विवेक तोपर्यंत जागृत राहतो. म्हणजेच हा ज्ञान आणि अनुभव म्हणजे कर्म या दोन मार्गांनी जागृत करता येतो. व्यावहारिक अनुभव व्यक्तीला व्यावहारिक विवेक जागृत करून देतो. त्याच्या उपयोगाने मनुष्य उत्तम व्यवहारी होतो आणि असतो. खूप वेळा आपण काही व्यक्तींना खूप लहान वयात उत्तम व्यवहारी व्यक्ती म्हणून ओळखतो किंवा जाणतो. 

पण या विवेकाचा फक्त व्यवहाराशी अर्थात जगताशी संबंध असतो. तो उत्तम धन, ऐश्वर्य व व्यावहारिक कीर्ती प्राप्त करून देऊ शकतो. अश्या व्यक्तीकडून अविवेकी वागणूक व्यवहारात सहसा होत नाही. पण हा एक विवेक झाला. या शिवाय नाते संबंध आणि व्यक्ती व्यक्ती मधील संबंध या बाबतचा विवेक सुद्धा असतो. अश्या व्यक्ती व्यवहार उत्तम करू शकतील की नाही ते सांगता येणार नाही. पण संबंध स्थापित करणं, त्याची जोपासना करणं आणि त्यांना कायमस्वरूपी सांभाळणं हे काम अश्या विवकी व्यक्ती करतात वा करू शकतात. 

तिसरा विवेक म्हणजे ईश्वराच्या प्राप्तीच्या मार्गाकडे जाण्याचा. अर्थात भक्तिमार्ग विवेक. म्हणजे व्यवहार व नातेसंबंध यांचा विवेक असेल किंवा नसेलही, पण भक्ती मार्ग जोपासण्याची इच्छा, सद्बुद्धी, व त्या मार्गावर चालण्याची ऊर्जा, प्रेरणा व शक्ती या विवेकाने प्राप्त होते. आयुष्यात, जीवनात क्षणोक्षणी, पदोपदी येणारे अनुभव, चटके, दुःख, दैन्य, भोग व सुख समृद्धी यांचे दिवस या सर्वात, अश्या विवेकी लोकांची विचार नौका डगमगत नाही आणि जरी थोडी डगमन झाली तरी, मनातील विवेक, त्यातून सावरून इप्सिताच्या साधण्या साठी पुन्हा मार्गस्थ होतो.

म्हणजे विवेक माणसाला विचारात ठेवून, त्या त्या क्षेत्रात मार्ग भ्रष्ट होण्यापासून परावृत्त करतो. याचा अर्थ विवेक हा एकप्रकारे आधार, खांब, ध्रुव किंवा axis सारखा कार्य करतो. विवेक माणसाच्या मनात विचारांची, आचारांची, तत्वांची, बंधनांची, मर्यादांची स्थिरता निर्माण करतो व राखतो. ज्यामुळे माणूस कोणतंही कर्म करताना पूर्ण विचार करून मग निर्णय घेतो आणि त्यानंतर आचरणात आणतो. सहसा चुकीचे निर्णय किंवा चुकीची कर्म विवेकी व्यक्तींकडून होत नाहीत. त्या त्या क्षेत्रात विवेकी व्यक्ती वेगळ्याच उंचीवर जाण्याची शक्यता अधिक असते. 

मायेचा फेरा, विचारांची, तत्वांची, कल्पनांची, गफलत यामधे अश्या व्यक्ती अडकत नाहीत. व्यावहारिक दृष्ट्या विवेक जितका उपयोगी तितकाच तो पारमार्थिक मार्गा साठी सुद्धा अत्यंत गरजेचा आहे. किंबहुना व्यवहारात चुकलेला मनुष्य, आर्थिक नुकसानीत जाईलही, तरीही नंतर पुन्हा बाहेर येऊ शकेल. पण पारमार्थिक मार्गात, अश्या अविवेकी चुका अनेक जन्माच जमा असलेलं,पुण्य रिकामं करून टाकू शकतात. म्हणजेच अनेक जन्मांची संचितात जोडलेली पूंजी, एखाद्या चुकीच्या अविवेकी कृत्याने, शून्य होऊ शकते. 

या विवेकाला जागृत करण्याचे व जागृती नंतर तो तसाच सतत जागृत अवस्थेत राहील, याचे ज्ञान, वैराग्य, कर्म आणि भक्ती हे मार्ग आहेत. यातील भक्तिमार्गी व्यक्तींना विवेक जागृत ठेवण्याचा सहज सोपा मार्ग म्हणजे सद्गुरू वा ईश्वर शरण. यावरच उद्याच्या चिंतनात चर्चा करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१८/०५/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...