अध्यात्म विराम १८२
कालचाच विषय पुढे नेऊया. मुळात हा मानवी देह फक्त आणि फक्त भोग / उपभोग यातून पुढे जाऊन, ईश्वराच्या मूळ निर्गुण स्वरुपाकडे जाण्यासाठीच निर्माण केला आहे. त्याचसाठी या देहात दहा इंद्रिये, अनेक अवयव, वाचा, त्यामधे वाणी, बुद्धीसाठी खाद्य ज्ञान, श्रवणासाठी श्रुती, त्यांनी ऐकलेलं मेंदूपर्यंत पोचण्याची व्यवस्था, त्याचं पृथक्करण आणि विश्लेषण करून आकलन करून देणारा मेंदू आणि त्यात बुद्धीची पटलं, त्या बुद्धीने उमज लेलं समजून, त्याचे योग्य ते भाव, अंतरीच्या आत्म्याला समजावेत यासाठी मन व त्या मनात जाणीवा, इतकी सर्व, संगणकापेक्षा गुंतागुंतीची व्यवस्था, ईश्वराने किती खुबीने, व्यवस्थित स्थापित करून, काळाच्या कोणत्याही पटलावर स्थिर व टक्कर देऊन राहण्यासाठी निर्माण केली आहे.
या व्यवस्थेची निर्मिती करताना, ईश्वराला फक्त एकच विचार ज्ञात असेल असं म्हणता येणार नाही. याच मनाने, योग्य व अयोग्य, चुकीचे व बरोबर, सकारात्मक व नकारात्मक असे परस्पर भिन्न भाव प्रकट करून, त्या भावा नुसार वागण्याची मुभा दिली. खरतर यातूनच लोक शाहीची कल्पना येऊ शकते. कुठेही कसलीही घटना नाही, कायदा नाही की न्याय नाही, असं भासू शकतं. परंतु एकूण व्यवस्था पूर्णांशात अर्थात वैकुंठापासून ते भुलोका पर्यंत अभ्यासली तर लक्षात येईल की, घटना म्हणजेच निती, विचार, योग्य वागणूक, शांती, दया, क्षमा, सद्गुण हे नियम निर्माण केले
त्यानुसार वागण्यासाठी वेद, पुराण, शास्त्र, इत्यादी लिखित स्वरूपातील ज्ञान, त्याचं योग्य आकलन करून देण्यासाठी ऋषी मुनी, संत, सज्जन यांची निर्मिती करण्याची ज्ञानरूपी, आत्म शुद्धी व्यवस्था, त्यातून मार्गस्थ झालेल्यांना पुण्यप्राप्ती, प्रगती, त्यातून आत्म चिंतन होत राहून पुढे शेवट मोक्षाकडे जाण्याची व्यवस्था, मोक्षप्राप्ती हे अंतिम ध्येय असल्यामुळे, त्याआधी संचित पुण्यसाठी स्वर्गादीं व्यवस्था हे सर्व निर्माण करूया दिलं. या मार्गावर चालण्यासाठी कर्म फल ही स्वयंचलित व्यवस्था निर्माण करून, स्वतःचा हस्तक्षेप होणार नाही याचीही काळजी घेतली आहे. म्हणजे या देहाच्या निर्मिती तच खरी लोकशाही ईश्वराने युगानयुगे आधीच स्थापित केलेली आहे.
लोकशाहीची तत्वप्रणाली इथपर्यंत बरोबर जुळल्यानंतर आता कायदा सुव्यवस्था काही निर्माण केलं आहे का ते पाहू. मुळातच कर्माबद्ध व्यवस्था असल्यामुळे आणि स्वयंचलित असल्या कारणाने, उत्तम कर्म केल्यास उत्तम फलप्राप्ती व चुकीचं कर्म केल्यास त्यानुसार कर्मगती हा आलेख आखून दिलेला असल्या मुळे, मानवाला यानुसार त्याची फळं भोग आणि उपभोग या स्वरूपात मनुष्याला भोगावी लागेल व चाखायला मिळेल. या संकल्पनेवर आधारित जग सुरळीत चालावे आणि मनुष्य याचा आनंद नित्य घेत रहावा म्हणून माया निर्मिती केली
ही माया जीवाला या जगतात बद्ध करून ठेवते आणि कर्म व्यवस्था सुरळीत चालेल याची देखील काळजी घेते. पण यातून अनेक पेच वेळोवेळी निर्माण होतात. पण त्यांच्या सुटण्याची व्यवस्था सुद्धा याचं मायारुपी कर्मफल व्यवस्थेतून होत राहील, अशी कायदेशीर व्यवस्था सुद्धा ईश्वराने निर्माण केली. म्हणजे चुकीच्या कर्माचं फल त्या व्यक्तीला प्राप्त झाल्यावर, त्यातून सुधारून, योग्य कर्म करण्यासाठी माणूस प्रवृत्त होईल हा, या व्यवस्थेचा कणा आहे. पण या खेळात मनातील सुप्त शत्रू मनात अनेक प्रकारची विष कालवून, अज्ञान पसरवून, वाम मार्गाला नेतात व वाममार्गला लागलेला जीव, अजून पथ भ्रष्ट होत जातो.
पण तो स्वतः जर एकटाच पथ भ्रष्ट झाला तर त्याचे परिणाम एकट्याने भोगले असते आणि ते कर्मफल व्यवस्थेनुसार न्याय संगत झाले असते. पण ज्यावेळी असे नीच अधमी जीव, आपल्या मतीच्या, अहमच्या आणि गर्वाच्या मदात धुंद होऊन, पूर्ण व्यवस्था व इतर जीव यांना विनाकारण त्रास देतात आणि एकप्रकारे ईश्वरी न्यायाला आव्हान देतात, त्यावेळी निर्गुणात रममाण असलेलं ईश्वरी तत्त्व जागृत होऊन, सगुणात येऊन आपला कार्यभाग पूर्ण करते.
म्हणूनच त्या ईश्वरी व्यवस्थेत त्याला समर्पक भूमिका घेऊन, त्याच्या तत्वांशी बांधील राहून, आत्मप्रगती साधायची का आणि ती कशी यावर उद्याच्या भागात चिंतन करूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१२/०५/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment