Skip to main content

अध्यात्म विराम १७५

अध्यात्म विराम १७५

कालचा विषय पुढे नेताना आपण विचार करूया की, एकदा एक क्षण घेतलेल्या मन:शांतीचा अनुभव नित्य, निरंतर येण्यासाठी काय साधन व सहाय्य आवश्यक आहे. इथे एक लक्षात घ्या मी साधन व सहाय्य असं जोडून म्हटलंय. याचाच अर्थ असा आहे की, साधन आणि सहाय्य हे दोन्हीसुद्धा अत्यंत गरजेचे आहेत आणि परस्पर पूरक आहेत. आता ते साधन म्हणजे नित्य ईश्वर स्मरण अर्थात नामाचं सतत, नित्य आणि अविरत उच्चारण करणं. आता नित्य अविरत म्हणजे काय, तर अक्षरशः श्वासागणीक स्मरण.याचं कारण म्हणजे कोणत्या क्षणी आपल्याला बेसावध गाठून,माया आपल्या मनाचा ताबा घेईल आणि आपल्याला मार्ग भ्रष्ट करेल हे, ईश्वर सुद्धा सांगू शकणार नाही. 

म्हणून हे नित्य आणि श्वासासह अविरत स्मरण करत राहणं, याला कोणताही दुसरा पर्याय नाही. मी नाम घेणं या शब्दापेक्षा नामाचं स्मरण करणं हा शब्द योग्य मानतो. याचं कारण म्हणजे, घेणं या शब्दात आणि क्रियेत देहाचा संबंध जास्त येतो. पण याउलट स्मरणात मनाचा संबंध, मनाची एकाग्रता आणि मनाच्या लहरींची एकात्मता ही अपेक्षित आहे आणि तिचाच सहभाग कार्यास येतो. आपण स्मरणात आणा की एखादा जुना मित्र, मागील आठवण किंवा विसरलेली एखादी मनाला भावणारी किंवा मनाला चटका देणारी गोष्ट आठवणाता,अश्या सर्व वेळी आपल्या मनाचा त्यामध्ये सहभाग हा जास्त किंवा पूर्ण असतो.

देहाचं त्यात असणं हा गरजेचा उपचार असतो. पण मुख्य कार्य मनात घडून येत. आता दुसरी, तितकीच महत्वाची, आवश्यक व अनिवार्य गोष्ट म्हणजे सद्गुरू. सद्गुरुंचा आपल्या परमार्थिक जीवनात सहभाग किंवा अस्तित्व हे स्मरणाप्रमाणे श्वासा समवेत असावं. कारण भौतिक आणि मर्त्य जगतात जडदेह, बुद्धी यांच्या वाटे, मनाच्या पुढाकाराने आणि इच्छा वासना यांसह केलेली कर्मे, फेडायला जन्म जन्म घ्यावे लागतात. पण आत्म्याची शुद्धता आणि उन्नती व उद्धार यांसाठी सद्गुरू चरण आणि शरण याशिवाय दुसरा उपाय नाही. 

सर्व गुरुतत्वाचे आद्य श्रीदत्तात्रेय दत्तगुरु यांनीसुद्धा आपल्या आयुष्यात अनेक गुरू केले. म्हणजेच गुरूंच्या माउलींना जिथे, गुरू करावे लागले, या एका तत्वात आपल्या सर्व प्रश्नांचं आणि शंकांचं समाधान होतं, असं मला वाटतं. स्मरणात नित्य जागृती राहून, त्यातून आत्मोन्नत्ती होण्यासाठी, येणारी विघ्न, संकटं, भव बाधा इत्यादी सर्व पार करून पुढे जाता येणं, हे ईश्वराच्या असीम कृपेचा परिणाम आहे. ती कृपा प्राप्त व्हावी आणि हा स्मरणाचा योग नित्य, क्षणोक्षण घडत रहावा, हे साध्य मानवी प्रयत्ना बाहेरील कार्य आहे. 

साधनेची पराकाष्ठा साधून, त्यामधे नित्य रत राहून, भक्तीचे योग साधण्यासाठी अनेक जन्मांची पुण्याई आणि आपल्या आराध्याची असीम कृपा असावी लागते. परंतु हे कार्य एका जन्माचं नाही. त्यासाठी अनेक जन्म असा स्मरण योग घडून यावा लागतो. असा स्मरण योग नित्य, अविरत आणि जन्मोजन्मी घडून यावा, हे मानवाच्या नित्य कर्माच्या पलीकडील आहे. कारण कर्म फलाची साखळी तोडणं आणि योग्य कर्माचं योग्य फल, योग्यवेळी प्राप्त होणं, हा योग केवळ आणि केवळ सद्गुरू कृपेने घडून येतो. यासाठी सद्गुरू मिळणं आणि त्यांना शरण जाण्याची बुध्दी होणं, या दोन तितक्याच सद्गुरू कृपेच्या गोष्टी आहेत. 

याचं विषयावर आपण उद्याच्या भागात पुढे चिंतन सुरू ठेवूया. यात अजून एक विषय आधी घेऊन, मग पुढे जाऊ. मला अनेकदा असा प्रश्न किंवा शंका विचारली जाते की, आम्ही सद्गुरू केले नाहीत किंवा आम्हाला सद्गुरू नाहीत, तर आम्ही काय करावं, स्मरण करावं का आणि कसं करावं. यावर उद्या चिंतन करुन मगच पुढे जाऊया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०५/०५/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...