Skip to main content

अध्यात्म विराम १७३

अध्यात्म विराम १७३

अश्या सततच्या स्मरणाच्या लहरींमुळे,त्या मनात, हृदयात प्रभू स्मरणाची ओढ जागृत होते आणि ती आपलं कार्य करत राहते. ईश्वराच्या स्मरणात प्रचंड शक्ती असते. ती शक्ती प्राणिमात्रांच्या आत्मशक्तीला जागृत करते. या जागृतीमुळे पुढे घडणारं स्मरण हे पूर्ण जाणीवेने, जागृती तून आणि आत्मयज्ञ घडवून आणणारं असतं. या स्मरण यज्ञाने, चुकीच्या कर्मांचे पर्वत नष्ट होतात. जाणिवांची जागृती घडून येते आणि त्यानंतर प्राणी कोणतीही अनिष्ट कृती वा कर्म जाणीवपूर्वक करत नाही आणि अनाव धानाने घडलेल्या कर्मांना ईश्वरी स्मरणाच्या लहरींची शक्ती जाळून नष्ट करते.

चित्त शुद्ध होण्याकडे वाटचाल होते आणि चित्तशुद्धी नंतर आत्मशुद्धी घडते आणि आत्मतेज जागृत होतं. अश्या सतत नित्य घडणाऱ्या स्मरणाने, प्राणी एका वेगळ्या सुखाचा, शांतीचा अनुभव घेतो. या शांतीची सवय लागली की, आत्म्याला आलेली जागृती, फक्त स्मरण काळा पुरती न राहता ती नित्य जागृतीत परिवर्तित होते. याचा परिणाम म्हणजे देहाची ओढ, देहाचे चोचले आणि मायेचा भ्रम हळूहळू नष्ट व्हायला सुरुवात होते. जिथे माया हळूहळू पातळ होत जाते तिथे, अनेक दिव्यानुभव येतात. 

मनाची शक्ती हळूहळू वाढत जाते. माणूस जगातील कोणत्याही मोह, लोभ, प्रलोभनं, काम, क्रोध, मद, या शत्रूंना भुलत नाही. किंबहुना हे शत्रू आहेत आणि आपण त्यांच्या जाळ्यात अडकता कामा नये, ही जाणीव नित्य जागी असते. सतत ईश्वर स्मरण करत राहिल्यामुळे, चुकीच्या जाणीवा हळूहळू मृतप्राय होऊन, फक्त योग्य व इष्ट जाणीवा जागृत राहतात. प्राणी आपलं देहहीत आणि आत्महीत यात गोंधळ करत नाही. 

त्यामध्ये भेद लक्षात येऊन, देहहीत टाळून, आत्महित साधण्या साठी, मनाला सतत जागृत असावं लागतं, हे ज्ञान प्राप्त होतं. एकदा ज्ञानाची प्राप्ती झाली की, देह बुद्धी मागे पडून, आत्मशुद्धी कडे जीव जायला सुरुवात करतो.या काळात येणारे मोहाचे,मायेचे, लोभाचे, क्रोधाचे कामाचे, वासनांचे क्षण ज्ञात होतात आणि ते आले तसेच, कोरडे निघून जातात. त्यांच्या शुष्क जाण्याने, आत्मा विलक्षण आनंदानुभुतीचा प्रत्यय व प्रचिती प्राप्त करतो.

ही वाटचाल आणि वर सांगितलेले प्रगतीचे टप्पे, एकाच जन्माचे असतील, असा समज करून घेऊ नये. पण ही प्रक्रिया एकदा एखाद्या जन्मात सुरू झाली की, माणूस पुढील प्रत्येक देहात, त्या पुढच्या प्रगतीचा पल्ला गाठत राहतो. सहसा मागे येण्याचा प्रश्न येत नाही. पण इतका सगळा प्रवास,फक्त क्षणमात्र केलेल्या ईश्वराच्या स्मरणात साध्य होतो, असा गहन व गुह्य अर्थ माऊलींच्या एका ओवीचा आहे. याचं एक महत्वाचं कारण म्हणजे. जसे क्षण क्षण ही शृंखला, काळाचा खूप मोठा परीघ सहजी पार करते. 

त्याचप्रमाणे एक क्षण केलेलं नंमन, आपलं पुढील कार्य सिद्ध करत. याचं अजून एक महत्वाचं कारण वा यातील मूळ गृहितक असं आहे की, हा एक क्षण पूर्णपणे दिलेला आणि मनापासून ईश्वराला समर्पित केलेला असावा. म्हणजेच आत्मसमर्पण हे यात अध्यारुत गृहितक आहे. किंवा माउलींना तसच अपेक्षित असावं. याचं कारण कोणताही ईश्वर प्राप्तीचा मार्ग वा कोणतंही साधन हे स्व, ग आणि अहं राखून साधता येत नाही. माऊलींनी आपल्या अनेक ओव्यामधे ही खूण सांगितली आहे. तीच इथे अपेक्षित आहे. मुळात देवाचीये द्वारी, म्हणजे जिथे सर्व भाव, भावना, चिंता, व्यथा, मान अभिमान, गर्व, मोह, लोभ हे, या भुलोकीचे दुर्गुण त्यागून, शुद्ध आत्म स्वरूपाला देवापुढे अर्थात आत्म्याच्या गाभाऱ्यात स्थित ईश्वराच्या समोर, जाऊन उभ राहणं. 

विषय अजून बाकी आहे, त्यामुळे उद्याच्या भागात पुढे चिंतन सुरू ठेवूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०३/०५/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...