Skip to main content

अध्यात्म विराम १८६

अध्यात्म विराम १८६

माया काय करते हे आपण पाहिलं. आता आपण या सर्वात काय करतो याचा विचार करूया. मुळात माया फक्त कार्यकारण भाव आणि कर्ता यांना जवळ आणते. मनात भाव निर्माण झाला की माणसाला एखादी वस्तू, वास्तू, व्यक्ती किंवा गोष्ट हवी अशी इच्छा जागृत होते. त्यानंतर मन बुद्धीला, बुद्धी देहाला आणि देह इंद्रिय व अवयव यांना कार्याला जुंपतात. जुंपणं यासाठी म्हटलं की, एकदा एखादी वासना निर्माण झाली की ती इच्छेच्या केंद्रांना उद्दिपित करते. मग माणूस कर्मरत होतो. कर्म करतो किंवा करून चुकतो आणि मग फलाची बीजं पेरली जातात.

आता यातील मायेचा खेळ इतकाच की ती फक्त वासना, इच्छा, ओढ, आकस, मत्सर, द्वेष, क्रोध, काम इत्यादी मनातील सुप्त भाव भावना जागृत करण्याचं काम करते. यात फक्त हा शब्द यासाठी वापरला की, इतर प्राणी आणि मनुष्य यामधे जो मूलभूत भेद, ईश्वराने निर्माण करून ठेवला आहे, तो म्हणजे माणसाला बुद्धी, मन आणि मनात इतर भावांप्रमाणे सुप्त असलेला विवेक, ही अतुलनीय ईश्वरी देणगी दिलेली आहे. म्हणजेच मायेचा खेळ हा तुमच्या मनात जागृत भावातील, योग्य कोणते आणि अयोग्य कोणते, हे मनातील विवेक ठरवू शकतो.

हा विवेक मनाला स्तब्ध व शांत करून, विचारांना योग्य दिशा देतो. हाच विवेक अयोग्य विचारांना थांबवून, योग्य विचारांची पैदास करतो. अयोग्य विचार रोखले गेले की, नकारात्मक भाव उत्पन्न न होऊन, व्यक्ती सारासार विचार करू शकते. त्यानंतर बुद्धी योग्य दिशेने कार्य करते. कारण तिला मनातून सकारात्मक उर्जेचं पाठबळ व शक्ती प्राप्त होते. त्यानंतर घेतलेले निर्णय योग्य असतात, कर्म योग्य घडतात आणि अर्थातच योग्य त्या कर्मांची परिणती अत्युत्तम फलात होते. कॉम्प्युटर अर्थात संगणकीय भाषेत सांगायचं तर विवेक हा anti virus programm आहे, जो एक firewall निर्माण करतो. ज्यायोगे अयोग्य विचार येण्याआधी मन त्यावर विचार करायला सक्षम होतं. 

यातून लक्षात आलेली एक महत्वाची गोष्ट किंवा तत्व अथवा मुद्दा म्हणजे माया फक्त आपल्याला त्या बिंदुपर्यंत नेते, जिथे आपल्याला कार्य उद्युक्तीची चेतना मिळते. पण कर्म करण्याचं किंवा न करण्याचं अभूतपूर्व स्वातंत्र्य फक्त आणि फक्त मानवी देहाला, ईश्वराने वरदान स्वरूपात दिलेलं आहे, त्याचा पाया विवेक, बुद्धी हा आहे. विवेक म्हणजे योग्य अयोग्यतेची जाण. आता हा विवेक मुळात असतो की तो प्राप्त करता येतो, याचा विचार करूया. 

विवेक मुळात प्रत्येक मनुष्यमात्रांच्या ठायी, ईश्वराने, आत्मा ब्रम्हांडात पाठवताना मूळ तत्व किंवा आत्म्याचा गाभा म्हणून स्थापित केलेला असतो. तो ज्ञान, भक्ती, कर्म आणि वैराग्य या मार्गाने जागृत करता येतो. सर्व साधारणपणे विवेक जागृत झालेली व्यक्ती सहसा चुकीचे निर्णय व चुकीची कर्मे करत नाहीत. सहसा यासाठी म्हटलं की माया ही अत्यंत घातक आहे. आत्म्याच्या उन्नत व शुद्ध अवस्थेत असताना किंवा त्या यात्रेत सुद्धा, माया कधी विवेकाला चकवा देऊन, अविवेकी निर्णय व कर्म घडवून आणेल, याचा भरवसा नाही. 

म्हणजे विवेकी मनुष्याने सुद्धा सतत जागृत असायला हवं, असाच बोध यातून मिळतो. पण विवेक जागृती कशी व्हावी किंवा करवून घ्यावी आणि जागृत विवेक अविरत, सतत, नित्य, अष्टौप्रहर कसा जागृत राहील, यासाठी काय आवश्यक आहे आणि मुळात ते आपल्याला हातात आहे का, हे पुढील भागात पाहू. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१७/०५/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...