भोग आणि ईश्वर १९१
काल आपण पाहिलं की,ज्ञानी माणूस ज्ञानाच्या सहाय्याने आत्मोन्नती साधत अंती आत्मउध्दार साधतो. ज्ञानाने त्याच्या जाणिवा प्रगल्भ होतात, मनाच्या कक्षा रुंदावतात सत् असत् याचा बोध झालेला असतो. मोह माया, काम क्रोध यांचा प्रत्यय आलेला असतो, भगवंताचं सतस्वरूप जाणलेलं असतं. त्यामुळे साधायचं काय आणि सोडायचं काय, याची जाण आलेली असते. मुमुक्षत्व प्राप्त झालेलं असतं.
उन्नती आणि अधोगतीचे मार्ग आणि खाचाखोचा माहिती असतात. मनःचक्षु उघडले असल्या कारणाने काय पाहायचं आणि काय न पाहता पुढे जायचं, हे समजलेलं असतं, मर्यादा आणि शक्तीस्थान, जाणिवा आणि उणिवा माहिती असतात. भरकटायचं का नाही आणि भरकटल्यास काय परिणाम होणार, हेदेखील समजलेलं असतं.
हे ज्ञानी माणसाबद्दल झालं. आता कर्ममार्गी माणूस कर्तव्य आणि कर्माच्या मर्यादा यांनी बद्ध असतो. तो मुमुक्षु व ज्ञानी माणसाप्रमाणे प्रगल्भ नसला तरीही, कोणतं कर्म श्रेष्ठ व कोणतं कनिष्ठ यांना समजून असतो. आपल्या कर्माच्या कोणत्या हिश्श्याने आपण बद्ध होऊ आणि कोणते कर्म करूनही आपण अबद्ध राहू हे ओळखून, तो एखाद्या ज्ञानी माणसासम कर्मफल त्याग करून सत्कर्माच्या मार्गाने मार्गक्रमण करत, प्रत्येक जन्मात आपले हित साधत, पुढे जातो. विधातासुद्धा प्राप्त फळातील याचा हिस्सा त्याला प्रदान करतो. पण कर्ममार्गी माणूस त्यातूनही आपलं हित ओळखून बद्ध न होता, प्राप्त फलाला दान म्हणून स्वीकारून मोक्षप्राप्ति कडे वाटचाल करत जातो.
परंतु खरा प्रश्न असतो तो मध्यममार्गी सर्वसामान्य जीवाचा. ज्याला मायेचा फेरा अडकवत जातो, कर्माची बद्धता जन्म जन्मांतरासाठी बांधत जाते, वासना, इच्छा, कामना यांची अतृप्तता, पुढील प्रत्येक जन्मांसाठीचं संचित प्रारब्धाच्या रुपात साठवत जाते, मोक्षमुक्ती या मैलोगणती दूर असतात, तिथपर्यंत वाटचाल करण्याचा विचारसुद्धा मनात येऊ शकत नाही, अशी प्रारब्धाची गती प्राप्त झालेली असते,मायेचे पाश, षड्रिपुंचे खेळ, संसारात गुरफटून राहण्याची मानसिकता, जन्मोजन्मींची बंधनं, हे एखाद्या शृंखलेप्रमाणे वाटेत बांधून ठेवतात. अश्या परिस्थितीत सापडलेल्या सामान्य जनांना पुनरपि जननम पुनरपि मरणम हाच एक मार्ग दिसत असतो.
अश्या अज्ञानी, मूढ, बद्ध जनांनी मोक्ष मुक्ती, फलाच्या बद्धते तून आपली सुटका कशी करावी, याला काहीच उपाय नाही का, की फक्त देह मानवाचा असूनही, भोग आणि उपभोग दोन्ही पशुसमान, असं आयुष्यच जगावं का. यावर काहीच मार्ग विधात्याने योजला नाही का. खरतर याच लोकांसाठी द्वैत अद्वैत या वादात न पडता, फक्त देवाचं नित्य स्मरण करत करत, आपलं कर्म करत राहण्याचा सर्वात सोप्पा, आचरण्यास उत्तम व विना सायास मोक्षाकडे घेऊन जाणारा हमखास भक्तीचा मार्ग भगवंतानी स्वतः सांगितला आहे.
आपलं कर्तव्य करत असताना, कर्माच्या गतीचा फेरा चालू असताना, भोगांच्या राशी संकट रुपात समोर असताना, संसाराच्या जाळ्यात अडकलेले असताना, काहीही न करता सर्व योग साधणारं साधन, फक्त आपल्या इच्छित देवाचं नाम घेऊन, त्याला स्मरून, कोणत्याही अद्वैत सिद्धांतात न पडता, अणुहून सूक्ष्म आणि आकाशाहून विशाल मन त्याच्या चरणी अर्पण करून, त्याच चरणांना लक्ष मानून, त्याच निर्गुण निराकार ईश्वराला, सगुण साकार रुपात कल्पून फक्त आणि फक्त त्याचं स्मरण करत, आपला सर्व भार त्याच्यावर सोपवून, आपण मिळालेल्या श्वासाचासुद्धा विचार न करता, फक्त या भक्तिमार्गात पडून राहायचं.
कर्तव्याची इतकी चिंता वाहिली आणि मन पूर्णपणे त्याला वाहून, त्याच्या स्वाधीन केल्यानंतर, आपण फक्त त्याच्या स्मरणाची चिंता करत क्षणाचा आणि श्वासाचा हिशोब त्याला वाहायचा. त्याबदल्यात आपलं योगक्षेम वाहून नेण्याची हमी तो घेणार हे ब्रीद वा वचन त्यानेच दिलेलं आहे. पण हे केल्या नंतर मुख्य अट ही की, जे होईल ते, त्याची चिंता आहे, ही मनाची स्थिती कायमस्वरूपी आणि अत्यंत विपरीत परिस्थितीत सांभाळणं, एवढंच आपलं इतिकर्तव्य आहे.
एवढं ज्याला समजलं त्याने जन्म साध्य केला, हे नक्कीच. पण आपल्याला हेसुद्धा जमायला कित्येक वर्षे वा जन्म जातात. म्हणूनच हाती योग साधण्याचं कसब असूनही आपण कोरडे राहतो. याचं महत्वाचं कारण म्हणजे आपण मनाने त्याचं स्मरणही करतो आणि त्याच मनात, मेंदूत सर्व चिंता काळज्या वाहतो.
एकदाच डोकं त्याच्या चरणांवर ठेवून, मोकळ्या मनाने त्याला सांगून मोकळे व्हा की, माझं सर्व कर्म आणि कर्मफल तुला अर्पण करतो, इथून पुढे माझ्या सर्व चिंता तुझ्याच चरणांवर वाहीन आणि फक्त तुझंच स्मरण करून पुढे जगेन. एकवार सांगून पहा, नक्कीच विधाता आपल्या योगक्षेमाची चिंता पाहिलं, तो नित्य सोबत आहे याचा प्रत्यय येईल, सुखात आणि दुःखात सुद्धा.
अजून पुढे विवेचन करूया उद्याच्या भागात. पण तोपर्यंत नाम अवश्य घ्या, सद्गुरू चरणी लीन रहा, आत्मसुखाचा मार्ग अवश्य सापडेल.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत आणि श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ हे लवकरच प्रकाशित होणारं, पुस्तक ज्यांना हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर मेसेज करून वा फोन करून संपर्क करावा आणि नोंदणी करून घ्यावी .
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०९/०६/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment