Skip to main content

भोग आणि ईश्वर २०५

भोग आणि ईश्वर  २०५
 
काल आपण संन्यासी, ब्रम्हाचारी आणि साधुपुरुष यांच्याविषयी विस्ताराने चर्चा केली. त्यांना निरुपाधिक राहून, साधनेवर कोणताही डाग लागणार नाही याची काळजी घेत, मार्गक्रमण करावं लागतं. यामध्ये त्यांचे सद्गुरू मार्गदर्शन करतात आणि वेळोवेळी परीक्षा पण घेतात. शिष्य आपल्या साधनेतील प्रगतीनुसार त्यात उत्तीर्ण वा अनुत्तीर्ण होतात, पण मार्गक्रमण सुरूच ठेवतात.

आता विचार करा साधनशुचिता पाळून, दीर्घ प्रयत्नां नंतर,  कष्टप्रद साधना करून, त्यात काही विकारी विघ्न येऊ नये म्हणुन सतत नियम व शास्त्र यांची तारेवरची कसरत करून उच्चपदी पोचण्याची तपश्चर्या, या मार्गा तील साधकांना करावी लागते. त्यानंतरही यश वा अपयश, काहीही फल पदरी पडू शकते.  मग तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जीवांची काय कथा. 

म्हणजे आपल्याला किती त्रास , कष्ट, मेहनत व नियमांची पराकाष्ठा करावी लागेल. पण मग आपल्याला या सर्व शास्त्र नियम यांच्या मार्गाने न जातासुद्धा अन्य काही मार्ग नाही का, ज्यायोगे आपण विधात्याप्रत पोचू आणि अंतरात्मा परमात्मा यांचा संयोग साधू शकू. नक्कीच असा एकच मार्ग जो या सर्व कर्मकठीण, नियम बद्ध मार्गाहून सहजसाध्य, सर्वसामान्य जीवांना अंतिम ध्येयाप्रत घेऊन जाणारा, व चारही युगात श्रेष्ठ असा, ईश्वर स्मरणाचा उत्तम असा सहजमार्ग आहे. 

आपल्या मनातील इष्टदेवतेप्रत जाण्यासाठी, संसाराचा ताप सहन करत, शास्त्र व नियमांचं फारसं बंधन न पाळताही अध्यात्मिक मार्गी होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे नामस्मरण. आपलं नित्य सांसारिक कर्म करताना,  त्यात व्यस्त असतानासुद्धा, आपलं आणि आपल्या जन्माचं हित साधण्यासाठी, श्वास व उच्श्वास यावाटे फक्त ईश्वराचं चिंतन, मनन, स्मरण करत राहून, सर्व योग साधण्याचा सर्वात सहज मार्ग, कोणताही सांसारिक जीव अवलंबू शकतो. 

त्यासाठी फक्त काही गोष्टी करायच्या, ज्या योगायागाचे नियम, बंधन याचा कोणताही त्रास, ब्रह्मचर्यत्वाचं कोणतंही बंधन, अष्टांग योग, ध्यान धारणा यांचा अभ्यास, कुंडलिनी जागृती, प्राणायाम यांच्या मार्गाला न जाता सुद्धा, योगमार्गाचा लाभ मिळवून देणारं साधन, जगतपित्याने स्वये उपलब्ध करून दिलं आहे. या मार्गालासुद्धा योग अशीच संज्ञा प्राप्त आहे. श्रीमद्भागवद्गीतेत त्याचा उल्लेख स्पष्टपणे भक्तियोग आहे. 

चराचरामध्ये वास करून असलेल्या परमेश्वराला जाणून, समजून, ओळखून,बत्याच्या हजारो नामातील एक नाम निवडून, आपल्याला जमेल अश्या सुलभतेने पण पूर्ण श्रद्धेने, प्राप्त सांसारिक परिस्थिती स्वीकारून, साधनांचा वा सुविधांचा अतिरेक वा बाऊ न करता, आत्मोन्नती, आत्मउद्धार साधत, जन्ममृत्यूचं चक्र भेदून, आपला प्रत्येक क्षण फक्त विधात्याच्या स्मरणात घालवत, हा योग कोणताही सामान्य मानव साधू शकतो. 

ईश्वराला फक्त आपलं मन अर्पण करून, सर्व चिंता त्याच्या चरणी वाहून, विकार व वासना यांचं त्याच्या स्मरणात विस्मरण करून, मायेला ईश्वराधीन करत, आपलं सांसारिक कर्मबंधन सांभाळत करता येणारा हा योग अद्भुत विलक्षण आणि अत्यंत सोप्प्या मार्गाने, पद्धतीने जीवाला ईश्वरासमीप घेऊन जातो, जन्मजन्माची बंधनं तोडून, सर्व योग साध्य करून देतो. 

यासाठी ज्ञानी, योगी, काहीही असण्याची जरुरी नाही. हे विशेष महत्वाचं आहे. हा योग राजमार्ग, योगमार्ग व अन्य सर्व मार्गांचे लाभ बसल्या जागी प्राप्त करून देतो. हा योग साधण्यासाठी फक्त जिव्हा, श्वास, मन बुद्धी यांची एकसूत्रता साधता आली की काम झालं. तेही कठीण नाही. फक्त स्मरण करत जायचं आणि त्याची सवय जडवून घ्यायची, बाकी सर्व ईश्वराधीन सुपूर्द करायचं. 

या योगाबद्दल अजून चर्चा करूया परंतु उद्या. तोपर्यंत नामयोग साधत रहा, भक्तीच्या या सहजसोप्या मार्गात फक्त पडून रहा, सर्व योग प्राप्त होतील. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२३/०६/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...